प्रेमातला मी!!!

लग्न जमलं अन् त्या नंतर माझ आयुष्यच बदलून गेल आहे. मनमौजी पणे भटकणारा मी टोळभैरव आता जरा जबाबदारीने वागायला लागलो आहे . .( म्हणजे खूप असा नाही पण थोडा थोडा). . .सगळ्यात मोठा बदल म्हणजे माझा दिनक्रम बदलला आहे.

इथून मागे दिवसाची सुरूवात घड्याळाच्या गजराने व्हायची ( बिचारा कोकलून कोकलून जीव द्यायचा अन् त्यानंतर आमची स्वारी जागी व्हायची) आता मात्र दिवसाची सुरूवात मात्र गुड मौर्निंग च्या मेसेजने होते. सकाळी नाश्ता केला का?? केला नाही तर थोडस रागावण असत पण ते ही प्रेमाने. मग दुपारी पुन्हा एखादा मेसेज किंवा फोन. जेवण झाल का?? काय करतोय?? काम खूप आहे का?? अस खूप काही. . .( सार लिहियालाच हव का??? समजून घ्या की) अस थेट रात्री झोपेपर्यंत चालू असत.

तुम्हाला सांगतो सुरुवातीला हे सार जरा जडच गेल. . अहो हे पहिलच प्रेम आहे ना?? इथून मागे आयुष्यात कॅड, रेवीट, सिवील ३डी अशे सगळे सॉफ्टवेअर अन् त्यांचे प्रॉब्लेम होते. त्यामुळे ह्या नवीन बदलामुळे थोड अजीर्ण झाल पण आता ठीक आहे. पुर्वी मी माझ्या धुंदीत जगायचो.वाटेल तेव्हा जेवण, वाटेल तेव्हा भटकणे. मनाला जे वाटेल तेच करायचो.

तुम्हाला सांगतो हाफिसात असताना जर मला फोनवर कोणी काय करतो आहे अस विचारल तर मी त्याला अगदी पुणेरी उत्तर द्यायचो पण आता उत्तर असत " काही नाही तुझ्या फोनची वाट पाहत होतो" , " तुझाच विचार करत होतो ई. उत्तर देतो". :) ( द्यावी लागतात अशी उत्तर. . .आता शिकलो आहे मी पण!!!)

तसा मी शुद्ध शाकाहारी पण माझ्या मोबाईलचा इनबॉक्स मात्र शुद्ध मांसाहारी. त्यामुळे सुरुवातीला आमची मेसेज पाठवायची बोंब होती. पण ह्यावेळी पण नेहमी प्रमाणे आपला गुगल बाबा मदतीला आला. चांगले मेसेज शोधून दिले गुगल बाबाने. आता इनबॉक्स बराचसा शाकाहारी झाला आहे.

ह्या २-३ महिन्याच्या अनुभवातून मी एक गोष्ट अगदी खात्री ने सांगतो. . . बायको ने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणे याहून अवघड काही असूच शकत नाही. जो कोणी अगदी बायकोला आवडेल अशी म्हणजे तिच्या दृष्टीने योग्य अशी उत्तर देईल तो जगातील कोणतीही पझल सोडवू शकतो.

आता आमच्या मधील काही प्रश्नोत्तर सांगतो.

१. सध्या घराच काम चालू आहे त्यामुळे खर्च भरपुर चालू आहे. त्यावरील प्रश्न

ती: आपल्या घराच काम चालू आहे खूप खर्च झाला असेल ना???
मी: हो झाला. . .करावा तर लागणार नाही तर घर कस होईल.

आता तुम्ही मला सांगा इथे मी काय चुकीच उत्तर दिल?? तिच्या नुसार ह्या प्रश्नाच उत्तर म्हणजे किती पैसे खर्च झाला हे मी सांगाव. आता मी गरीब बिचारा हेच लक्षात ठेवल...खर्च खूप झाला असेल ना?? असा प्रश्न आला की सरळ रक्कम सांगुन द्यायची. अन् त्याप्रमाणे काही दिवसा नंतर असा प्रश्न आल्यावर मी प्रामाणिक पणे रक्कम सांगुन टाकली तर म्हणे मी तुला हिशोब थोडी विचारला आहे, तू असा का वागतोस, इ.इ.

आता काय बोलाव कपाळ??

२. ती: (बोटातील एंगेजमेंट रिंग दाखवत) कशी दिसते आहे???
मी: छान आहे.

आता याहून वेगळ काय बोलू शकतो मी?? या नंतर तिच्या दृष्टीने मला कौतुक करता येत नाही. मी व्यवस्थित प्रतिक्रिया देऊ शकत नाही किंवा मला रिअॅक्ट करायला जमत नाही. यापासून धडा घेतला अन् पुढच्या वेळी अगदी चांगल भर भरून कौतुक केल पण ते जरा जास्तच झाल. यावर माझ काय झाल असेल ते आता तुमच्या लक्षात आलच असेल.

३. ती जर म्हणाली ह्या इथे आईस क्रीम छान मिळत हं आपण येऊ या एकदा . . .तर आपण समजून घ्यायच आता आईस क्रीम खायचा मूड आहे. म्हणजे हे फक्त मी उदाहरणादाखल दिल अशे खूप सारे प्रसंग असतात आता तिथ समय सूचकता दाखवून रिअॅक्ट कस व्हायच ते ही अगदी बायकोच्या मनासारख. . .इथेच तुमच खर कौशल्य आहे.

थोडक्यात काय तर सध्या माझा अभिमन्यू झाला आहे!!!

( पण खर सांगु यात पण मजा आहे. . . फक्त ती मजा आपण घ्यायला शिकल पाहिजे.)

14 comments:

हेरंब said...

हा हा हा.. 'मोबाईलचा इनबॉक्स मात्र शुद्ध मांसाहारी' हे जाम आवडलं.

बाकी यापुढच्या प्रश्नोत्तरांसाठी (मुख्य म्हणजे योग्य उत्तरांसाठी) शुभेच्छा!!!

davbindu said...

मस्त झाला आहे लेख...
मला वाटते हा अनुभव सर्वानाच येत असेल.
बघुया आमच्या नशीबात काय लिहल आहे ते...

अपर्णा said...

मस्त झालीय पोस्ट...माझे जुने दिवस आठवले...पण आमच्या बाबतीत मी अगदीच ही म्हणजे काय ते अरसिक असणार असं मला आता वाटतंय पण काय करणार मेषेचे मेंढे सरळ टकराच देतात...ही ही...बायकोची रास पाहुन घे मग तुला प्रश्नांची बरोबर उत्तर कुठलं ते कळेल...त्यापेक्षा सरळ राशीभविष्यचा एखादा प्रयोग पाहा किंवा तुला फ़क्त तयारीसाठी हवंतर ऑनलाइन पाहुन घे...बघितलं सरळ टक्कर इथे काही रसिकपणाचा मामलाच नाही...जाऊदे पोस्ट तुझ्या प्रेमाची आहे आम्ही काय करतोय इथे मोठी उत्तरं लिहुन....

good luck...

संगमनाथ खराडे said...

puNeri uttar aawaDal...:)

आनंद पत्रे said...

हा..हा..हा...
अवघड आहे...

मीनल said...

’तीने’ ही पोस्ट वाचल्यावर आणि ’मी असं कुठे वागते? काहीही लिहतोस तू ’असं म्हटल्यावर काय उत्तर द्यायचे ठरवले आहेस नां?

आशिष देशपांडे said...

Sunder lekh! Mandani atishay chaan zaliye...'Stricha mann jyala kalala, tyala jeevnacha rahasya kalala'

JAI MAHARASHTRA

Pankaj - भटकंती Unlimited said...

अभिमन्यू होण्यातही एक मजा असते. प्रत्येक खरेदीला हे तिला आवडेल का असाही विचार येतोच ना तुझ्या मनात? येत असेल तर तू एकदम ट्रॅकवर आहेस.

Yogesh said...

@ हेरंब, दवबिंदु धन्यवाद!!!

Yogesh said...

@ अपर्णा ताई....मस्त आयडीया आहे. . . बघतोच आता राशी भविष्य चा प्रयोग.

Yogesh said...

@ संगमनाथ, आनंद धन्यवाद!!!

Yogesh said...

@ मीनल तीला ब्लॉग लिहतोय हेच माहित नाही म्हनून तर पोस्ट लिहली आहे.

@ आशीष धन्यवाद!!!

Yogesh said...

@ पंकज़ अगदी बरोबर असाच विचार येतो यार. . .चला मार्ग बरोबर आहे.

सौरभ said...

:D धम्माल... आवड्या :D