लहान तोंडी मोठा घास...

मागील सप्ताहात मराठी पाउल पडते पुढे हा कार्यक्रम पाहण्यात आला.नितीन देसाइ यांची निर्मिती असल्यामुळे तो भव्यदिव्य असणारच यात काही शंका नव्हती.

एकंदरीत कार्यक्रमाच स्वरुप आलेले कलाकार त्यांचे सादरीकरण एकाहुन एक सरस आहेत अर्थात काहींचे अपवाद वगळता.या कार्यक्रमात मुग्धा गोडसे ला परीक्षक म्हणुन घेण्याच प्रयोजन काही लक्षात आल नाही.
मराठीमध्ये उत्तोमत्तम अन गुणी कलाकार उपलब्ध असताना हिला का घेतल हा यक्ष प्रश्न आहे.

असो ...मला जरा दुसर्‍या विषयावर बोलायच आहे.

मागील आठवड्यातील भागात नागपुरच्या सुमेधा नावच्या एका लहानगीने अतिशय छान अशी गोष्ट सांगितली.तिच पाठांतर,गोष्ट सांगण्याची पद्धत सार काही लाजवाब होत.एवढ्या लहानवयात तिच्या मध्ये असणारा सभाधीटपणा, आत्मविश्वास याला मनापासुन दाद द्यायला हवी.

ती गोष्ट सांगत असताना तिने एक वाक्य म्हणल अन....अगदी सुग्रास जेवणात खडा लागल्यानंतर कस वाटत तस वाटल .ती शायिस्तेखानाची गोष्ट सांगत होती...त्यात तिने अस म्हणल की लालमहालावरुन जे काही सुरु आहे त्यावरुन आता तुम्हीच ठरवा मराठी पाउल पुढे पडते की आहे की मागे???

वैयक्तीकरित्या मला तरी हे पटल नाही.त्या वादाचा इथे संदर्भ देण्याच प्रयोजन काही समजल नाही.लिहणार्‍याने हे जाणीवपुर्वक लिहल असेल यात शंका नाही.यात कदाचित प्रामाणिक हेतुही असेन पण मी अशा प्रकारांच्या विरोधात आहे. तुम्ही चुकीच्या गोष्टींचा निषेध जरुर करा पण तो व्यक्त करण्यासाठी त्याच माध्यम पण योग्य तेच निवडा.

ह्या असल्या वादांपासुन आपण आपली भावी पिढी लांबच ठेवली पाहिजे.कारण यानंतर त्यांना पडणार्‍या प्रश्नांना आपण समाधानकारक उत्तर देउ शकणार आहोत का??

उदाहरणार्थ....समजा सुमेधा ने जर अशे प्रश्न विचारले तर उत्तर काय देणार...

जात म्हणजे काय??

ब्राम्हण म्हणजे कोण??

मराठा म्हणजे काय???

सर्व माणस तर सारखीच दिसतात मग ते वेगळे कसे??

कदाचित याहुन पण अधिक प्रश्न पडु शकतील. आपण या सर्व प्रश्नांना तिच समाधान होइल अशी उत्तर देउ शकणार आहोत का??आम्ही आमच्या भावी पिढीलाही पुन्हा जात/धर्म याच बाळकडु बालपणातच देणार आहोत का??

यावरुन मला मागील ३ महिन्यापुर्वी आमच्या सोसायटीत घडलेला प्रसंग आठवतोय.आमच्या सोसायटीमध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम होता त्यामध्ये साधारण आठ वर्षाच्या मुलीने "आजचा भारत" यावर भाषण केल म्हणजे कोणीतरी लिहलेल ते तिने सादर केल.या कार्यक्रमाला आमच्या परीसरतील एक नगरसेवक हजर होता.त्यामुळे त्या भाषणामध्ये भारत राहिला दुर, त्या नगरसेवकाच्या पक्षाचेच गोडवे गायले होते.त्या नगरसेवकाचा पक्ष किती चांगला आहे,तो नगरसेवक किती आदर्श आहे.पुण्यात बी.आर.टी.पासुन ते उड्डाण पुलांच्या कामांमध्ये कोणी किती भ्रष्टाचार केला इ.इ.बरचस अस बोलत होती.यासगळ्यात वाइट म्हणजे तिच्या प्रत्येक वाक्यावर सर्वजण टाळ्या पिटत होते.

त्या नगरसेवकाला खुष करण्यासाठीचा केविलवाणा प्रयत्न पाहुन डोक्यात तिडीक आली होती.त्या मुलीच्या वक्ततृत्वाचा किती वाईट रितीने वापर केला गेला होता.अन यात कोणालाच गैर वाटत नव्हत हे दुर्दैव होत.ज्या लोकांना त्या पक्षाचा एवढा कनवाळा होता तर त्यांनी त्याला खुष करण्यासाठी दुसरा मार्ग शोधायचा होता.

याच नगरासेवकाला या कार्यक्रमानंतर काही आठवड्यातच एका गुन्ह्याखाली अटक केली गेली होती.आता त्या लहान मुलीवर या सगळ्याचा परीणाम झालाच असेल ना??? तिला पडलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे
तिला मिळाली असतील का??

आजकालच्या पालक वर्गाला झालय तरी काय?? का ते आपल्या मुलांच बालपण त्यांच्यापासुन हिसकावुन घेत आहेत??अजाणत्या वयातच त्यांना प्रसिध्दी देण्यासाठी अपेक्षांच ओझ त्या कोवळ्या जीवांवर लादत आहेत.

सगळेच नाही पण बहुतांश पालक हे त्यांच्या मुलांमधील नैसर्गिक कला गुणांऐवजी त्यांना स्वतःला जे हव ते करायला लावतात...त्या कोवळ्या कळ्यांना नैसर्गिक रित्या उमलु द्या त्यांना कृत्रिमरित्या फ़ुलवण्याचा प्रयत्न करु नका. नाही तर अजाणत्या वयातच त्याच आयुष्य कोमेजुन जाइन.

"लहान तोंडी मोठा घास देउ नका ".....नाही तर भावी पिढी आपल्याला माफ़ करणार नाही.