यक्ष प्रश्न ?


यक्ष प्रश्न म्हणजे नक्की काय असत अस मला नेहमी वाटायच.यक्ष प्रश्न कसा असु शकतो याचा प्रत्यय मला माझ्या भाचीने दिला.आता सुट्टी आली तेव्हा सतत नवीन प्रश्न अन त्यांची उत्तर देता देता माझी नाकी नऊ आली होती.एवढ सुचत तरी कस ते देव जाणो.

रोज एक नवीन गोष्ट सांगावी लागायची.गोष्ट सांगताना पण अगदी विचार करुन बोलाव लागायच कारण प्रत्येक गोष्टीतुन इतके “का” निर्माण व्हायचे की बस्स. त्या “का” ची समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत माझा पिट्टा पडलेला असायचा.

या सर्वातुन सुटका व्हावी म्हणून म्हणलं चला हिला आपण मराठी मुळाक्षर शिकवु या.त्यासाठी कार्यालयातुन येताना मराठी मुळाक्षरांच पुस्तक घेउन आलो.आज गोष्ट नको त्याऐवजी आपण मुळाक्षर शिकु या अस म्हणुन तिला मुळाक्षर कस गिरवायच हे सांगितल अन मी आपल उर्ध्वपटामध्ये डोक खुपसल. हुश्श...आज बाकी आपली सुटका झाली अश्या अविर्भावात असतानाच उर्वीने भलामोठ्ठा बॉम्ब टाकला.


उर्वी: मामा, अ च्या डोक्यावरच का रेष द्यायची?

मी:बेटु, असच लिहतात.,तिथ पुस्तकात वर बघ त्यांनी अ च्या फ़क्त डोक्यावरच रेष दिली आहे नं. (च्यायला आजपर्यंत मला हा कधीच प्रश्न पडला नव्हता त्यामुळे याच उत्तर माहिती असण्याचा प्रश्नच नव्हता. याला म्हणता “आगीतुन फ़ुफ़ाट्यात पडणे” )

उर्वी: त्यांनी अस का लिहल ? त्यांना कोणी सांगितल?

मी:पिल्लु,सर्वजण असच लिहतात अन बघ त्याच्या डोक्यावर रेष दिली की अक्षर छान दिसत. असच लिहायच बर आता.

(मी शक्य तितक समजवायचा प्रयत्न करत होतो.पण भाची ने अस काय यॉर्कर टाकला होता की माझी दांडी गुल झाली होती)

आता मी अस बोलल्यावर बिचारी काही न बोलता गुपचुप मुळाक्षर गिरवायला लागली. मला पण हायसे वाटले.चला सुटलो एकदाचा अस म्हणुन मी परत माझ्या कामाला लागलो.

पाच-दहा मिनीटांच्या शांततेनंतर पुन्हा आवाज आला मामाSSSSSSSSSSS…

उर्वी: मामा, हे बघ मी खाली पण रेष दिली आहे अन हेच सुंदर दिसतय.

मी: नाही बेटु पण अस नाही लिहीत फ़क्त अक्षराच्या वरच रेष द्यायची असते.

उर्वी: नाही...मी खाली पण देणार तेच मला आवडलय.

मी: बर ठीक आहे तसच लिहुन काढ.

पांढर निशाण दाखवुन मी माघार घेतलेली असते.पण कुठे तरी मनात याच उत्तर काय असु शकते हाच विचार मनात घोळत असतो.त्या विचारात असतानाच परत पुन्हा एकदा आवाज येतो अन छातीत पुन्हा धस्स होत कारण परत एकदा यॉर्कर आहे हे माहितच आहे त्यामुळे हा आता टोलवता येणार की पुन्हा दांडी गुल हे येणारा प्रश्नच ठरवणार होता.
 
उर्वी: मामा अरे मी A,B,C लिहताना तर नाही देत रेष मग अ, आ,इ  लिहताना का बर द्यायची?

आता मात्र मला उर्वी मध्ये मलिंगा दिसु लागतो.त्याच्याहुन भारी यॉर्कर टाकणार कोणी असेल तर हीच अशी माझी खात्री पटलेली असते.ह्या पण प्रश्नाच उत्तर नसल्यामुळे वेळ मारुन नेण गरजेचं असतं.

मी: मला नाही माहित,मी एक काम करतो उद्या माझ्या टीचरला विचारतो अन तुला सांगतो .ठीक आहे.

यादरम्यानच बोलता बोलता उजव्या हाताने लिहता लिहता नकळतच तिने डाव्या हाताने लिहायला सुरुवात केलेली असते.आता या प्रश्नापासुन सुटका करायची म्हणुन..

मी: उर्वी, डाव्या हाताने लिहु नये उजव्या हाताने लिहीत जा बर.
 
उर्वी: का बर? डाव्या हाताने का लिहायच नाही....लिहील तर काय होईल?

आजपर्यंत नेहमी काही चांगल असेल तर उजवा अन वाईट असेल तर डावा असाच समज...दोघांमध्ये भेद हा चुकीचा आहे हे माहीत असुन ही उजव्याचाच हट्ट का हे मात्र मलाही माहित नाही. 

आता तुम्हाला जर या  प्रश्नांची उत्तर मिळाली तर मला जरुर कळवा.

१.     मराठी मुळाक्षर लिहताना त्याच्या डोक्यावरच रेष द्यायची?
२.     इंग्रजी अक्षरांच्या वर रेष का नाही द्यायची?
३.     आपण नेहमी उजव्यालाच का प्राधान्य देतो?

प्रिय आफ़्रिदी...

प्रिय आफ़्रिदी,

दोन दिवसांपुर्वी तु मायदेशात दाखल झाला तेव्हा तु मिडीयासमोर दिलेली मुलाखत पाहुन मला आश्चर्याचा धक्काच बसला होता.....हे अस कस शक्य आहे....तो बोलणारा नक्की तुच आहेस का??? एवढा संवेदनशील अन परीपक्व तु कसा होऊ शकतो....पण असो तुझ्या कालच्या मुलाखतीने मनावरील शंकाचे सर्व ढग दुर झाले...अन पुन्हा एकदा दाखवुन दिल की तु बदलेला नाहीच मुळी तु जसा आहे तसा आहेच...ते म्हणतात सुंभ जळाला तरी पीळ जात नाही.

सरड्याप्रमाणे रंग बदलत अवघ्या दोन दिवसात तु तुझी दोन वेगवेगळी रुप दाखवली...अर्थात तु हे जे काही केल हे स्वतःला वाचवण्यासाठीच...पण नेहमी एक लक्षात घे स्वतःचे अवगुण लपवण्यासाठी किंवा स्वतःच अपयश झाकण्यासाठी दुसर्‍याला बदनाम करायची काही एक गरज नसते.

तुझा पहिला आक्षेप आहे की भारतीय खेळाडु मोठ्या मनाचे नाहीत....पण एक लक्षात घे पंचाच्या निर्णयाची वाट न पाहता स्वतःहुन पॅव्हेलियनचा रस्ता पकडणार्‍या तेंडुलकरचा हा संघ आहे.....अस एक उदाहरण तरी आहे का तुझ्या संघात?? तुमच्या बकबकीला नेहमीच आम्ही आमच्या खेळातुन उत्तर दिल आहे. मग तो तेंडुलकर असो, गंभीर असो किंवा व्यंकटेश प्रसाद.इतिहास काढायचा झाला तर तुम्ही मैदानात केलेल्या पराक्रम सर्वश्रुत आहेच....अरे तुम्ही प्रामाणिकपणे हारला तरी आहात का??

आमचा संघ हा एकसंध आहे...त्यांची एकजुट तु विश्वचषक जिंकल्यानंतर पाहिलच असशील. आपल्या सहकर्‍यांना शिव्या घालण्यात धन्य मानणार्‍यांनी मनाच्या मोठ्यापणाच्या गप्पा करु नयेत.

आता आक्षेप दुसरा....गंभीर बद्दलचा....त्याने हा विजय २६/११ च्या शहिदांना समर्पित केला तर तुझ्या का बा पोटात कळ आली?? कसाब तुझ्या देशाचा आहे म्हणुन? आमच्या देशात होणारे दहशतवादी हल्ले,अतिरेकी कारवाया याचे कर्ते करविते कोण आहेत हे जगाने पाहिलच आहे.जेव्हा जेव्हा आम्ही मैत्रीचा हात दिला तेव्हा तेव्हा तुम्ही आमचा विश्वासघातच केला...एका बाजुला मैत्रीसाठी बोलणी करायची अन दुसर्‍या बाजुला आमच्या देशात अतिरेकी घुसवायचे हे अगदी साळसुदपणे चालु आहे. २६/११ च्या हल्ल्यात आम्ही काय गमावल आहे हे तुझ्या सारख्यांना संवेदना नसलेल्यांना नाही कळणार.

आता आक्षेप तिसरा...आमची मिडीया.....तुझ्या माहिती साठी सांगतो आमच्या देशात लोकशाही आहे...लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य....तुला ही व्याख्या झेपणार नाही हे माहित आहे तरी पण प्रयत्न केला...तर..आमच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणुन माध्यमांकडे पाहिल जात...सध्या काही वाईट प्रवृत्ती आल्या आहेत पण त्यामुळे सारीच प्रसार माध्यम वाईट होत नाही. जेसिका लाल की जिला आमच्या प्रसारमाध्यमांमुळे न्याय मिळाला...आमच्या देशात व्यक्तीस्वातंत्र्य आहे...अशा अनेक विधायक गोष्टी आहेत की ज्यांना आमच्या देशातील प्रसारमाध्यमांनी जगापुढ आणल आहे.आमच्या देशात प्रसारमाध्यमांचा आदरयुक्त दरारा आहे...तुमच्या माध्यमांमध्ये काय चालत हे मी काही नव्याने सांगायची गरज नाही.

आमचा देश हा कलाकार अन त्यांची कला याचा सन्मान करणारा आहे म्हणुनच तुझ्या देशातील कितीतरी कलाकार इकडे येण्यास उत्सुक असतात. नुसरत फ़तेह अली खान,राहत फ़तेह अली खान,शकील यासारख्या ्कलाकारांना प्रसिध्दी,पैसा,मान मरातब हा आम्हीच मिळवुन दिला आहे.एवढच काय तर सा रे ग म प सारख्या स्पर्धेतुन तुझ्या देशातील नवोदित गायकांना व्यासपीठ मिळवुन दिल. कारण आम्ही कलेचे सन्मान करण जाणतो एवढा आमचा मनाचा मोठेपणा आहे.

अरे तुम्ही तुमच्या कलाकरांना जे देउ शकला नाही आमच्या देशाने दिले आहे. आमच्या देशाने तुम्हाला काय नाही दिले...सार काही आमच्या देशाने दिले आहे अगदी तुमच्या अस्तित्वा पासुन ....

आमच्यासाठी आमची मातृभुमी कोणत्याही जात,पात अन धर्म याहुन मोठी आहे.आमच्या ह्र्दयामंध्ये फ़क्त प्रेम आहे ते ही कोणत्या धर्माच्या रेषेशिवाय. इथे प्रत्येक जण हिंदु,मुस्लीम, शीख, ख्रिश्चन असण्याअगोदर भारतीय आहे. म्हणुनच की काय २६/११ चा हल्ला असो किंवा क्रिकेटचा विश्वविजय प्रत्येक क्षणी इथे प्रत्येक जण फ़क्त भारतीयच आहे अन भारतीयच राहणार.

तु म्हणतो त्या प्रमाणे जर भारतीय चुकुन कधी संकुचित झाले तर जगाच्या नकाशावरुन एक देश कमी होइल हे लक्षात घे.

जयहिंद

-एक सामान्य भारतीय.

हिंदु नववर्षाच्या हार्दिक शुभे्छा....

सर्व वाचकांना अन मित्रपरीवाराला हिंदुनववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.


हे नवीन वर्ष आपणास सुख समृद्धी, यशदायी, आरोग्यदायी जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना.

शुभेच्छा पत्र चित्रकविता वरुन साभार

आणि बुद्ध हसला....

तब्बल २८ वर्ष ह्या क्षणाचा करोडो लोक वाट पाहत होते...अखेरीस तो आज पुर्णत्वाला गेला.

आपला सचिन गेली दोन दशक ज्याने विक्रमांचे डोंगर रचले.ज्याच्या झोळीत आज पर्यंत असंख्य विक्रम आहेत तरी पण एका गोष्टीची कमतरता होती ती म्हणजे "विश्वचषक". जस एखाद्या पांढ्र्‍या शुभ्र कागदावर एक लहानसा काळा डाग असावा अन त्या डागाच अस्तित्व संपुर्ण पांढर्‍या शुभ्र कागदला झाकोळुन टाकत.तसच काहीस सचिनच्या बाबतीत झाल होत.गेली दोन दशक त्या डागाच ओझ मनावर होत...सचिनच्या अन प्रत्येक सचिनच्या चाहत्यावर.आज अखेरीस ते दडपण दुर झाल.

कालच्या सामन्यात सचिन खेळला नाही याच नक्कीच दुःख आहे पण दुसर्‍या बाजुने विचार केल्यावर वाटत एका दृष्टीने बर झाल आजपर्यंत ज्याने आपल्या खेळाने प्रत्येकाला भरभरुन दिल.अनेक कठीण प्रसंगी देशाचा तारणहार झाला.त्याला जर याचा परतावा द्यायचा असेल तर काल आपल्या टीम ईंडीया ने ज्या रितीने परतावा केला याहुन अमुल्य असा परतावा होऊच शकत नाही. गेली दोन दशक ज्या हातांना फक्त दान देणं एवढच ठाउक होत त्या हातांनी काल प्रथमच काही घेतल आहे.

मायभुमीमध्ये मिडीया, रवी शास्त्री सारखे विघ्नसंतोषी लोक व चाहत्यांच्या अपेक्षांच ओझ अशा प्रचंड दडपणात टीम इंडीया ने जो खेळ केला आहे त्याला मनापासुन सलाम करावासा वाटतो आहे.

चक  दे इंडीया......

टीम इंडीया तुमचे खुप खुप आभार....आयुष्यातील खुप अविस्मरणीय अशे क्षण दिले आहेत....कोणी काही बोलो आम्हाला तुमचा अभिमान आहे.

लहान तोंडी मोठा घास...

मागील सप्ताहात मराठी पाउल पडते पुढे हा कार्यक्रम पाहण्यात आला.नितीन देसाइ यांची निर्मिती असल्यामुळे तो भव्यदिव्य असणारच यात काही शंका नव्हती.

एकंदरीत कार्यक्रमाच स्वरुप आलेले कलाकार त्यांचे सादरीकरण एकाहुन एक सरस आहेत अर्थात काहींचे अपवाद वगळता.या कार्यक्रमात मुग्धा गोडसे ला परीक्षक म्हणुन घेण्याच प्रयोजन काही लक्षात आल नाही.
मराठीमध्ये उत्तोमत्तम अन गुणी कलाकार उपलब्ध असताना हिला का घेतल हा यक्ष प्रश्न आहे.

असो ...मला जरा दुसर्‍या विषयावर बोलायच आहे.

मागील आठवड्यातील भागात नागपुरच्या सुमेधा नावच्या एका लहानगीने अतिशय छान अशी गोष्ट सांगितली.तिच पाठांतर,गोष्ट सांगण्याची पद्धत सार काही लाजवाब होत.एवढ्या लहानवयात तिच्या मध्ये असणारा सभाधीटपणा, आत्मविश्वास याला मनापासुन दाद द्यायला हवी.

ती गोष्ट सांगत असताना तिने एक वाक्य म्हणल अन....अगदी सुग्रास जेवणात खडा लागल्यानंतर कस वाटत तस वाटल .ती शायिस्तेखानाची गोष्ट सांगत होती...त्यात तिने अस म्हणल की लालमहालावरुन जे काही सुरु आहे त्यावरुन आता तुम्हीच ठरवा मराठी पाउल पुढे पडते की आहे की मागे???

वैयक्तीकरित्या मला तरी हे पटल नाही.त्या वादाचा इथे संदर्भ देण्याच प्रयोजन काही समजल नाही.लिहणार्‍याने हे जाणीवपुर्वक लिहल असेल यात शंका नाही.यात कदाचित प्रामाणिक हेतुही असेन पण मी अशा प्रकारांच्या विरोधात आहे. तुम्ही चुकीच्या गोष्टींचा निषेध जरुर करा पण तो व्यक्त करण्यासाठी त्याच माध्यम पण योग्य तेच निवडा.

ह्या असल्या वादांपासुन आपण आपली भावी पिढी लांबच ठेवली पाहिजे.कारण यानंतर त्यांना पडणार्‍या प्रश्नांना आपण समाधानकारक उत्तर देउ शकणार आहोत का??

उदाहरणार्थ....समजा सुमेधा ने जर अशे प्रश्न विचारले तर उत्तर काय देणार...

जात म्हणजे काय??

ब्राम्हण म्हणजे कोण??

मराठा म्हणजे काय???

सर्व माणस तर सारखीच दिसतात मग ते वेगळे कसे??

कदाचित याहुन पण अधिक प्रश्न पडु शकतील. आपण या सर्व प्रश्नांना तिच समाधान होइल अशी उत्तर देउ शकणार आहोत का??आम्ही आमच्या भावी पिढीलाही पुन्हा जात/धर्म याच बाळकडु बालपणातच देणार आहोत का??

यावरुन मला मागील ३ महिन्यापुर्वी आमच्या सोसायटीत घडलेला प्रसंग आठवतोय.आमच्या सोसायटीमध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम होता त्यामध्ये साधारण आठ वर्षाच्या मुलीने "आजचा भारत" यावर भाषण केल म्हणजे कोणीतरी लिहलेल ते तिने सादर केल.या कार्यक्रमाला आमच्या परीसरतील एक नगरसेवक हजर होता.त्यामुळे त्या भाषणामध्ये भारत राहिला दुर, त्या नगरसेवकाच्या पक्षाचेच गोडवे गायले होते.त्या नगरसेवकाचा पक्ष किती चांगला आहे,तो नगरसेवक किती आदर्श आहे.पुण्यात बी.आर.टी.पासुन ते उड्डाण पुलांच्या कामांमध्ये कोणी किती भ्रष्टाचार केला इ.इ.बरचस अस बोलत होती.यासगळ्यात वाइट म्हणजे तिच्या प्रत्येक वाक्यावर सर्वजण टाळ्या पिटत होते.

त्या नगरसेवकाला खुष करण्यासाठीचा केविलवाणा प्रयत्न पाहुन डोक्यात तिडीक आली होती.त्या मुलीच्या वक्ततृत्वाचा किती वाईट रितीने वापर केला गेला होता.अन यात कोणालाच गैर वाटत नव्हत हे दुर्दैव होत.ज्या लोकांना त्या पक्षाचा एवढा कनवाळा होता तर त्यांनी त्याला खुष करण्यासाठी दुसरा मार्ग शोधायचा होता.

याच नगरासेवकाला या कार्यक्रमानंतर काही आठवड्यातच एका गुन्ह्याखाली अटक केली गेली होती.आता त्या लहान मुलीवर या सगळ्याचा परीणाम झालाच असेल ना??? तिला पडलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे
तिला मिळाली असतील का??

आजकालच्या पालक वर्गाला झालय तरी काय?? का ते आपल्या मुलांच बालपण त्यांच्यापासुन हिसकावुन घेत आहेत??अजाणत्या वयातच त्यांना प्रसिध्दी देण्यासाठी अपेक्षांच ओझ त्या कोवळ्या जीवांवर लादत आहेत.

सगळेच नाही पण बहुतांश पालक हे त्यांच्या मुलांमधील नैसर्गिक कला गुणांऐवजी त्यांना स्वतःला जे हव ते करायला लावतात...त्या कोवळ्या कळ्यांना नैसर्गिक रित्या उमलु द्या त्यांना कृत्रिमरित्या फ़ुलवण्याचा प्रयत्न करु नका. नाही तर अजाणत्या वयातच त्याच आयुष्य कोमेजुन जाइन.

"लहान तोंडी मोठा घास देउ नका ".....नाही तर भावी पिढी आपल्याला माफ़ करणार नाही.असा "आदर्श" घेतील का???

लालबहादुर शास्त्री...आपल्या देशाचे माजी पंतप्रधान...एक अशी व्यक्ती की जिने बोलण्यापेक्षाही आपल्या वागण्यातुनच एक आदर्श निर्माण केला.ही घटना आहे ते पंतप्रधान असतानाची....ते जेव्हा पंतप्रधान पदावर कार्यरत होते तेव्हा त्यांच्या वापरासाठी "इम्पाला" ही  कार  सरकारने देउ केली होती.

त्यांच्या मुलाला या कारविषयी प्रचंड आकर्षण होतं. एके दिवशी त्याने शास्त्रीजींच्या नकळत चालकाला सांगुन कार काढली व त्यातुन एक मस्त रपेट मारुन आला.शास्त्रीजींच्या  दररोजच्या प्रवासाची नोंद ठेवली जायची.त्यामुळे त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली.त्यांनी त्यांच्या सचिवाला सांगुन मुलाने चालवलेल्या १४ कि.मी.ची वेगळी नोंद करुन ठेवायला सांगितली.महिन्याच्या शेवटी त्यांनी त्या १४ कि.मी.च्या इंधनाचा खर्च त्यांनी स्वतः दिला.

हे वाचल्यावर आज प्रश्न पडतो.....शा्स्त्रीजी पंतप्रधान असलेला देश नक्की हाच का???

आजच्या घडीला असा नेता शोधुनही सापडणार नाही.आम्ही इतिहासाकडे नक्की कोणत्या दृष्टीकोनातुन पाहतो?? त्यातुन शिकण्याऐवजी फ़क्त आपल्या स्वार्थासाठी आपल्या सोयीने त्याचा वापर करत राहणार आहोत का?? अस असेल तर "आदर्श" सारखे अनेक आदर्श उभे राहतील.

"साधी राहणी उच्च विचारसरणी" हे फ़क्त पुस्तकातच वाचायच अन प्रत्यक्षात मात्र "उच्च राहणी साधी विचारसरणी" अस वागायच.

हे बदलेल का कधी???

शास्त्रीजींसारखं नेतृत्व आम्हाला लाभेल का कधी???

सारथ्य "माणुसकीचे"

हजारो कोटींची उलाढाल असलेल्या उद्योगपतीच्या ड्रायव्हरचे निधन झाल्यानंतर त्या उद्योगपतीची प्रतिक्रिया काय असेल....त्याला दुःख होईलच,पण आपल्या हातातील कामकाज सोडुन त्याच्या अंत्यविधीसाठी पुण्याकडे हेलिकॉप्टरने पुण्याकडे धाव घेणारा आणि ड्रायव्हरने तीस वर्षे सेवा केली म्हणून त्याच्या शेवटच्या प्रवासाचे ड्रायव्हिंग आपण स्वतः करणारा उद्योगपती नुकताच पुणेकरांनी पाहिला.

आजच्या कलीयुगात जिथे पैसा म्हणजे सर्वस्व झाल आहे तिथे पैशाहुन ही माणुसकी मोठी असते याचा प्रत्यय आपल्या कृतीतुन देणारे हे उद्योगपती आहेत झवेरे पुनावाला.त्यांच्याकडील गंगादत्त या ड्रायव्हरचे नुकतेच निधन झाले.त्याचे निधन झाले तेव्हा पुनावाला मुंबईला महत्वाच्या कामासाठी गेले होते.गंगादत्त यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांनी आपल्या सर्व मिटींग रद्द केल्या.त्याच बरोबर मी येइपर्यंत गंगादत्त यांचे अत्यंसंस्कार करु नये अशी विनंती गंगादत्तच्या कुटुंबयींना करण्याचा निरोपही दिला.त्यांना अत्यंसंस्कारांसाठी उपस्थित राहयचे होते.त्यांनंतर त्यांनी खाजगी हेलिकॉप्टरने पुण्याकडे धाव घेतली.

पुण्यात आल्यानंतर त्यांनी गंगादत्त जी लिमोझीन चालवायचा ती फ़ुलांनी सजविण्यास सांगितली.ती लिमोझीन पुनावाला यांनी विकत घेतल्यापासुन गंगादत्त यांनीच चालवली होती.त्यामुळे गंगादत्त याची अंत्यंयात्रा याच गाडीतुन व्हावी ही पुनवाला यांची इच्छा होती.गंगादत्त यांच्या कुटुंबीयांनी याला मान्यता दिल्यानंतर पुनावाला या अत्यंयात्रेत सहभागी झाले.

ज्याने आपल्यासाठी आयुष्यभर गाडी चालविली त्याच्या शेवटच्या प्रवासामध्ये आपण गाडी चालवुन आदरांजली वाहिली पाहिजे या भावनेतुन त्यांनी गंगादत्त यांच्या घरापासुन स्मशानभुमीपर्यंत गाडी चालवली.

यावर झवेरे पुनावाला यांची प्रतिक्रिया होती.... "पैसे तर सगळेच कमवितात पण ते कमविताना ज्यांच्या जोरावर आपण ते कमवितो त्यांच्याविषयी आपण कृतज्ञता बाळगणे आवश्यक असते."

काल ही बातमी पुणे म.टा.मध्ये आली होती...आजच्या जगात जिकडे तिकडे स्वार्थ,भ्रष्टाचार,गुन्हेगारी माजलेली असताना मिट्ट काळोखात मिणमिणता प्रकाश दिसावा..असाच हा प्रसंग आहे...

पं.भीमसेन जोशी यांना भावपुर्ण श्रध्दांजली....


स्वरभास्कर भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांना भावपुर्ण श्रध्दांजली....

स्वर पंढरी आज पोरकी झाली.... :( :(
पंडीतजींचा फ़ोटो जालावरुन साभार.

मोदींचा गुजरात...

साधारण एक तीन वर्षापुर्वी कंपनीच्या कामानिमित्त अहमदाबादला राहण्याचा योग आला होता.तेव्हा नरेंद्र मोदी यांच्याविषयी प्रसारमाध्यमातुन दोन प्रकारच्या प्रतिमा रंगवल्या जात होत्या काहींना ते "मसीहा" वाटत होते तर काहींना ते "खलनायक" वाटत होते.त्यामुळे नरेंद्र मोदी ह्या रसायनाविषयी मनात कमालीची उत्सुकता होती.अहमदाबादला विमानतळावर उतरलो तेव्हा हॉटेलवर घेउन जाणार्‍या चालकाला सहज मोदींविषयी विचारलं....

"अरे भैय्या, आपके ए नरेंद्र मोदीजी कैसे इन्सान है?? आपको क्या लगता है??"

यावर त्याच उत्तर होत..

"साब, थोडे दिन में गुजरात के घर घर में मोदीजी तस्बीर होगी.बडा सच्चा इन्सान है।"

एका सामान्य माणसाच्या नजरेतुन ही मोदींची प्रतिमा होती. नुकतच "वायब्रंट गुजरात" झाल त्यातुन गुजरात मध्ये येणारे उद्योजक सर्व उद्योजकांनी मोदींबद्दल काढ्लेले गौरवोद्गार....हे सगळ पाहिल्यावर मला त्या चालकाची आठवण आली त्यावेळी त्याने काढलेले उद्गार नक्कीच खरे झाले आहेत.अभिमान वाटावा अशीच कामिगिरी नरेंद्र मोदींनी करुन दाखवली आहे.तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल तर तुम्ही काय करु शकता हेच मोदींनी दाखवुन दिल आहे.

विरोधक आज मोदींच्या नावाने कितीही कंठशोष करीत असले तरी सत्य परिस्थिती लपुन राहत नाही.आज मोदींवर सामान्य नागरिकापासुन ते मोठ्यातल्या मोठ्या उद्योगपती पर्यंत प्रत्येकाचाच मोदींवर विश्वास आहे.याच सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे मोदींच्या फ़क्त एका एस.एम.एस.वर नॅनो प्रकल्प गुजरातमध्ये आला.

हा विश्वास एका रात्रीतुन आलेला नाही त्यामागे मोदींची विकासाची दुरदृष्टी, त्यांनी घेतलेले कष्ट. त्यांचे विकासासाठी केलेले नियोजन,कुशल नेतृत्व हे सार काही आहे.राज्यामधील मुलभुत गरजांवर केलेला विकास.

मोदी सत्तेवर आल्यानंतर प्रथम त्यांनी "ज्योतीग्राम" योजनेच्या माध्यमातुन संपुर्ण राज्य भारनियमन मुक्त केल.गुजरातमधील वीजचोरी रोखली.सामान्य शेतकर्‍यापर्यंत पोहचले त्यांचे मुद्दे पटवुन दिले अन महत्वाच म्हणजे सर्वांना ते पटल त्याचचं फ़ळ त्यांना मतपेटीतुन मिळाल.

त्यानंतर सरदार सरोवराच्या माध्यमातुन पाण्याचा प्रश्न सोडवला. सरदार सरोवराच्या विरोधात असणार्‍या पर्यावरणवाद्यांना ते पुरुन उरले.नर्मदेच्या पाण्याचा अगदी योग्य पद्धतीने नियोजन अन उपयोग करुन पाण्याचा प्रश्न सोडवला.

दळणवळणाचा प्रश्न हाती घेतला.गुजरात मधील रस्ते जर पाहिले तर एकदम चकाचक.अगदी खेड्यातील रस्ते सुद्धा व्यवस्थित आहेत.थोडक्यात काय तर मोदींनी ज्या मुलभुत गरजा आहेत म्हणजे रस्ते,वीज अन पाणी यावर अगदी नियोजनबध्द काम केल. पण हे सार करताना सर्व कामगार अगदी पारदर्शक कुठे सुद्धा भ्रष्टाचाराचा लवलेश नाही.

उद्योजकांना फ़क्त सुविधाच नाही तर पारदर्शक कारभाराचा विश्वास पण दिला त्यामुळेच कोणतही काम किंवा योजना लालफ़ितीच्या कारभारात अडकत नाही.संपुर्ण शासकीय यंत्रणेवर मोदींचा वचक आहे.त्यामुळे सर्व काम कशी फ़टाफ़ट होतात.

आजमितीला नरेंद्र मोदी खरोखर "विकासपुरुष" झाले आहेत.

हे सगळ पाहताना माझ मन नकळत महाराष्ट्रात काय चालु आहे याचाच विचार करत होत.गुजरात ज्या वेगाने पुढे जात आहे त्याच वेगाने आपली अधोगती चालु आहे.भ्रष्टाचार,जाती-पातीच राजकराण,भाषावाद,बाबुगिरी यासगळ्यात महाराष्ट्र भरडला जात आहे.जे मोदींना गुजरात मध्ये शक्य आहे ते महाराष्ट्र मध्ये एकाही नेत्याला किंवा पक्षाला शक्य नाही.स्वतःच्या तिजोर्‍या भरण्यात मश्गुल असणारे नेते ह्या स्वराज्यात निपजले आहेत हेच महाराष्ट्राच दुर्दैव आहे.

काही दिवसांपुर्वीचा एक घटना आठवते आहे....जेव्हा आदर्श अन इतर गोष्टींवरुन महाराष्ट्रातल्या राजकारण्यांमध्ये कलगीतुरा चालु होता तेव्हा मोदी मुंबई मध्ये गुजरातसाठी एक रोड शो करुन गेले होते.त्याची साधी दखल सुद्धा आपल्या नेत्यांनी घेतली नव्हती.तेव्हा महाराष्ट्रात चालु असणार्‍या घडामोडींबद्दल एकही टिप्पण्णी केली नाही...ते आले...त्यांनी पाहिल...अन ते जिंकले.यातुनच ते किती धुरधंर राजकारणी आहेत हे दिसुन येत.

महाराष्ट्रालाही असाच एक नरेंद्र मोदी लाभो हीच सदिच्छा.

जाता..जाता...खाली दोन दुवे देत आहे ते जरुर पाहा...पहिला आहे गुजरात राज्य सरकारचा अन दुसरी महाराष्ट्र सरकारचा...मग मी जे वर म्हणलोय ते नक्की पटेल.

गुजरात राज्य सरकार :
http://www.gujaratindia.com/index.htm

महाराष्ट्र राज्य सरकार:
http://maharashtra.gov.in/

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा...

सर्व ब्लॉगर्स मित्र, वाचक अन त्यांच्या परीवारास मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...
तिळगुळ घ्या गोड गोड बोला.


शुभेच्छा पत्र चित्रकविता वरुन साभार.

पहिल बक्षीस..

दोन ऑक्टोबर ...गांधी जयंती....प्रथेप्रमाणे शाळेत सर्वजण जयंती साजरी करण्यासाठी जमले होते.मुख्याध्यापकांच्या हस्ते गांधीजींच्या प्रतिमेची पुजा झाली.त्यानंतर शाळेने भाषण स्पर्धा आयोजित केली होती.या स्पर्धेमध्ये सर्वात छोटा स्पर्धक मीच होतो.माझ नाव पुकारल्यानंतर मी भाषणासाठी उठलो अन ते पाच ते सात ओळींच भाषण ठोकुन आलो.भाषण पण अगदी टिपीकल होतं...

"अध्यक्ष महोदय,गुरुजन वर्ग अन जमलेल्या बंधु भगिनींनो मी जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती.म.गांधीचे पुर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते.त्यांचा जन्म २ ऑक्टोबर रोजी पोरबंदर येथे झाला.प्रेमाने त्यांना सर्वजण बापु म्हणत.एवढे बोलुन मी माझे भाषण संपवतो.जयहिंद.जय महाराष्ट्र."

हे आयुष्यातील माझ पहिलं भाषण.आजही हे भाषण माझ्या कस लक्षात आहे हे मला पण ठावुक नाही.

यानंतर निकालाच्या वेळी माझ नाव पुकारण्यात आल...माझा नंबर आला होता.... मला बक्षीस मिळाल होत...आयुष्यातील मला मिळालेलं पहिल बक्षीस...किती होत माहित आहे का??? २५ पैसे.अन हे बक्षीस मला मुख्याध्यापकांच्या हस्ते मिळाल होत त्यामुळे जाम खुष झालो होतो.कारण तेव्हा मुख्याध्यापक म्हणजे एकदम सगळ्यात भारी अन त्यांनी बक्षीस दिल म्हणजे कॉलर टाईट.

मला अजुनही आठवतय ते २५ पैसे मिळाल्यानंतर मला मी जगातील सर्वात श्रीमंत माणुस वाटत होतो.मी कितीतरी दिवस ते तशेच जपुन ठेवले होते.घरी कोणी आल की मी माझ बक्षीस दाखवायचो.

त्यानंतर जसा मोठा होत गेलो तसा बर्‍याच वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला बर्‍याच वेळा बक्षीस मिळवली पण २५ पैश्याच्या बक्षीसात जी मजा होती ती कशालाच नाही.

आजही त्या पहिल्या बक्षीसाच मुल्य होऊच शकत नाही. :)

????

लेखाच शीर्षक पाहुन तुम्हाला थोड आश्चर्य वाटल असेल ना....पण हा मला पडलेला प्रश्न आहे. (यात काय नवीन ते तर नेहमीचचं आहे)

आज संध्याकाळी "सकाळ" (हो सकाळ संध्याकाळीच वाचतो) वाचायला घेतला तर "राजीव गांधीं राष्ट्रीय पारितोषिक" याची मोठी जाहिरात दिसली.मग सहज विचार केला आपल्या देशात सरकारची कोणती पण योजना ही फ़क्त राजीव गांधी,इंदिरा गांधी अन पंडीत नेहरु या तीन नावांभोवतीच का घुटमळते???

जरा हे पहा...
१.राजीव गांधी राष्ट्रीय पारितोषिक योजना
२.राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना
३.राजीव गांधी उद्योग मित्र योजना (लघु उद्योजकांसा्ठी)
४.राजीव गांधी श्रमिक कल्याण योजना
५.राजीव गांधी शिल्पी स्वास्थ्य विमा योजना
६.RAJIV GANDHI NATIONAL CRÈCHE SCHEME FOR THE CHILDREN OF WORKING MOTHERS
७.Rajiv Gandhi Scheme for Empowerment of Adolescent Girls
८.इंदीरा आवास योजना
९.इंदीरा गांधी राष्ट्रीय पेन्शन योजना
९.जवाहरलाल नेहरु रोजगार योजना
१०. जवाहरलाल नेहरु नागरी पुनर्निमाण योजना

ह्या उदाहरणादाखल दिलेल्या काही योजना आहेत.या योजनांमध्ये करोडो रुपये ओतले जातात ते पण तुम्ही आम्ही भरणार्‍या करातुनच.याचा खर्‍या गरजुंना किती लाभ होतो याबद्द्ल शंकाच आहे.असो तो वेगळाच मुद्दा आहे त्यावर वेगळीच पोस्ट होऊ शकते.


तर मी काय म्हणत होतो ...राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार जेव्हा कधी योजना जाहीर करतात ती या तीन नावांच्या पलीकडे कधीच जात नाही.भगतसिंग,राजगुरु किंवा लालबहाद्दुर शास्त्री यांच्या नावाने कधी कोणती योजना ऐकली आहे का हो??(माझ्या तरी ऐकण्यात नाही एखादी असेल तर जरुर सांगा)

ह्या तीन व्यक्ती सोडल्या तर भारतात अशी एक पण लायक व्यक्ती झालीच नाही का??

सरकारी योजना तर सोडाच रस्ते, उड्डाणपुल,सरकारी दवाखाने, विमानतळ,जलाशय,संग्राहलये, उद्याने काही असो यांची नाव असलीच पाहिजे.सगळीकडे यांच्याच नावाचा उदो उदो करुन सरकारला नक्की साधायच तरी काय आहे??

 आज भारतातल्या खेडोपाडी मुलभुत सुविधा पोहचल्या नाहीत पण ह्या तीन नावांच्या रुपाने कोणती ना कोणती योजना मात्र नक्कीच पोहचली आहे.यामागच राजकारण न समजण्या इतपत  भारतीय मुर्ख आहेत का???फ़क्त योजना जाहिर करुन मुलभुत गरजा अन विकास साधता नाही.खरोखर विकास साधायचा असेल तर तो वातानुकुलीत खोलीत चर्चा झोडुन साधता येत नाही त्यासाठी खेडॊपाड्यात पोहचुन काम करण्याची गरज आहे हे ज्या दिवशी राजकारण्यांना कळेल तेव्हाच याच उत्तर मिळेल.

विरोध हा नाव देण्याला नाही तर त्याच्या मागुन केल्या जाणार्‍या राजकारणाला आहे.

संदीपची कविता....

संदीप खरे.....बस्स नाम ही काफ़ी है...

तशी संदीपची प्रत्येक कविता आवडते पण ही एक मला प्रचंड आवडणारी कविता.

आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो
नेमके ते हरवले जे मी जपाया लागलो...

शोधले माझेच पत्ते आत मी माझ्या किती
जग हरवलो तेव्हाच कोठे सापडाया लागलो...

ठरवले हे पाहीजे, ते पाहीजे , ते ही हवे
मागण्या ताज्या तवान्या मी थकाया लागलो...

मी सुखाला पाळले बांधून दारी माझीया
ते सुखाने झोपले मी गस्त द्याया जागलो...

गीत माझ्या लेखणीचे इतुके भिनले तिला
ती लिहाया बैसली अन मी सुचाया लागलो...

मज न आता थोडकी आशा कुणी की म्हणा
आज मी माझ्याच साठी गुणगुणाया लागलो...

काय हे आयुष्य माझे , काय हे जगणे तरी
मला सोडून मी सर्वा आवडाया लागलो...

-संदीप खरे.