होळी : एक आठवण!!!
होळी म्हणलं की मला माळेगाव हॉस्टेल आठवते. हॉस्टेल लाइफ मधील त्या ४ वर्षातील प्रत्येक होळी आम्ही अगदी अविस्मरणीय अशी साजरी केली. त्या दिवसातील मजा काही औरच होती. तेव्हा आम्ही होळी, धुलीवंदन अश्या दोन्ही दिवशी रंग खेळायचो.

होळीच्या अगोदर आठवडाभर आमची तयारी चालू व्हायची. होळीच्या वेळी आमचे गट पडायचे त्यात प्रामुख्याने हॉस्टेल ग्रूप ( म्हणजे आमचा), तावरे कॉम्प्लेक्स, पिंक हाउस, L८, L१ अशे सारे असायचे सर्वांना मध्ये एक स्पर्धा असायची. कोणत्या ग्रुपला कस रंगवायच याच सार नियोजन व्हायच. अगदी युद्धाला जशी तयारी चालू असते अगदी तसच. बारामातीला जाउन वेगवेगळ्या रंगांची खरेदी व्हायची.

त्या दिवशी सकाळच्या आंघोळीला सट्टी देऊन पहिली मिटिंग व्हायची ती शिवा भाउ च्या टपरीवर. तिथे वडा पाव अन् चहाच्या सोबतीने सगळ्या ग्रुपला नियोजनाप्रमाणे सूचना दिल्या जायच्या. मग सगळे मावळे मोहीमेवर निघायचे.

एखाद सावज पुढे आल की शिकारी जसा तुटुन पडतो अगदी त्याप्रमाणेच आम्ही प्रत्येकावर तुटुन पदायचो.त्यात कोणाकडून विरोध झाला की अजुन धमाल यायची. काही जण रंगाची अॅलर्जी आहे, आजारी आहे अशी कारण सांगुन फक्त कपाळाला गंध लावल्यासारखा रंग लावा असा आग्रह करायचा. आम्ही पण त्याच्यावर उपकार करून त्याला फक्त गंध लावल्यासारखा रंग लावायचो पण गळे भेट घेताना नकळत डोक्यात रंगाची पूड सोडून द्यायचो. आम्ही निघताना त्याच्या चेहरा चला बुवा सुटलो असाच आविर्भाव असायचा. आमचा प्रताप मात्र त्याला सकाळीच आंघोळीला गेल्यावरच समजायचा.

अहो एकदा तर लहु म्हणून एक मित्र आहे आमचा, होळीच्या दिवशी भल्या पहाटेच तो गायब झाला तो थेट रात्रीच आला. तो पर्यंत आमच्याकडील रंग संपले होते. आता करायच काय??? त्याला रंगावायच तर होतच पण गेट बंद झाल्यामुळे आम्ही बाहेर जाउ शकत नव्हतो. खूप विचार करूनही काही मार्ग सापडत नव्हता. शेवटी मार्ग सापडला म्हणतात ना " इच्छा असेल तर मार्ग दिसेल." माझा रूम पार्टनर रोज सकाळी कच्च अंड खायचा. आम्ही ती अंडी घेऊन त्याच्या डोक्यावर एक अन् एक बर्मुडामध्ये फोडल. अन् अशाप्रकारे अंड्याने आमची मोहीम फत्ते केली होती.

आम्ही सकाळी जे बाहेर पडायचो ते थेट संध्याकाळीच परतायचो. प्रत्येक होळीला आमचा एक रिवाज होता रंग खेळुन झाला की संध्याकाळी शर्ट फाडण्याचा कार्यक्रम व्हायचा. म्हणजे संध्याकाळी परत येताना कॅम्पस मध्ये प्रवेश झाला की रंगाने भरलेले एकमेकांचे शर्ट फाडून ते आजूबाजूच्या झाडांवर लटकावयचे. दुसर्या दिवशी जर पाहील तर सगळ्या झाडांवर रंगी बेरंगी शर्ट लटकलेले असायचे.

आज पण जेव्हा ते आठवतो तेव्हा खूप बोअर वाटत. ते दिवस परत येणार नाही हे माहीत आहे पण आता तशी होळी खेळायच ठरवल तरी खेळता येत नाही. आताची होळी ही प्रोजेकटच्या रंगात खेळली जाते. खूप सार काम, सबमिशनच्या डेड लाईन्स, मिटींग्स, इश्युज यामध्येच इंजिनिअरींग नंतरच्या होळी खेळली आहे.

असो शेवटी काय. . ." सरले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी"

13 comments:

आनंद पत्रे said...

बापरे, भयंकरच होळी खेळायचे तुम्ही मित्र...
मला वाटायचे फक्त आंध्रात अंडी डोक्यात, पॅण्टमध्ये फोडतात.....
हे मात्र खरंय आता होळीची पुर्वीसारखी मजा नाही राहिली, कारण सर्व मित्र मंडळी पांगली आता... :(

Dr.Harish Rushi said...

Just great !

अपर्णा said...

होळीच्या आठवणी विशेष करुन मुलांच्या जरा जास्तच असतात मीही आता होळीचं लिहितेय..पण तसं काही विशेष नाहीच आहे...:)
होळी आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा

हेरंब said...

मस्तच.. धम्माल आली वाचताना. :-)

मनमौजी said...

@ आनंद,हरीश आभार!!!

मनमौजी said...

@ अपर्णा अगदी खर आहे. . . मुलांची होळी अगदी स्पेशल असते!! :)

मनमौजी said...

@ हेरंब . . .धन्यवाद!!!

davbindu said...

मस्तच खेळायचे होळी तुम्ही...आमची होळी सिंकदरासारखी असायची पहिल दोन-चार मुल जमायचो मग एका एका राज्यावर(घरावर) हल्ला करुन तेथिल राजाला(आमच्या मित्राला) हरवायचो मांडलिक करुन आमच्या सैन्यात सामिल करायचो आणी पुढे कुच करायचो.खुप मजा यायची...गेले ते दिवस...

tanvi said...

धमालच करायचे रे तुम्ही... मला फक्त एकच विचारायचे होते की हे माळेगाव नासिकजवळचे का??

मनमौजी said...

@ तन्वी. . नाशिक जवळ जे आहे ते मालेगाव. . .हे माळेगाव बारामती जवळ. . .साहेबांच गाव. . . :)

भानस said...

बापरे! जबरीच होती की तुमची होळी. माझी एक सखी आहे माळेगावची.साहेबांचे गाव.... हा हा....

मनमौजी said...

भाग्यश्री ताई तुम्ही आला होता की नाही माळेगाव कधी???

Rajat Joshi said...

वा! मस्तच.