विचार"जंत"...


दिसागणिक सारं काही बदलत चाललयं.मानवजातीने आपल्या बुद्धीच्या सामर्थ्यावर दिवास्वप्न वाटणार्‍या संकल्पना सत्यात साकार केल्या. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर अवघ जग मुठीत सामावुन टाकल. जगाच्या दोन विरुद्ध टोकाला असणार्‍या समुदयांमध्ये विचारांची देवाण घेवाण सुरु झाली.प्रत्येकाला आप आपलं मत मांडण्यासाठी "सोशल नेटवर्कींग" च्या रुपाने माध्यम मिळालं अन यातुनच एक नवा जंत जन्माला आलाय .... तो म्हणजे "विचारजंत".

कुठेही जा हा तुम्हालाच भेटणारच.जळी, स्थळी, काष्ठी सर्वदुर याचा वावर आहे.विशेषतः फ़ेसबुक, टिव्टर यावर यांचा सर्वात जास्त वावर. इथे गेलात की हमखास भेटणारच. त्यानंतरच दुसर ठिकाणं म्हणजे चॅनेल - पॅनेल. कोणतही वृत्त्वाहिनी सुरु करा...चार पाच विचारजंतवादी एकत्र येउन टाळ कुटत बसलेलेच असतात.
मला ह्या विचारजंताच एका गोष्टीच फ़ार नवल वाटत...ते म्हणजे...विषय कोणताही असो त्यावर यांची एक्सपर्ट प्रतिक्रिया असणारच. कला, क्रीडा, साहित्य, राजकारण, सामाजिक इ.इ. विषय कोणताही असो हे विचारजंतवादी सभा ठोकणार म्हणजे ठोकणारच. एक मराठी वाहिनीवर प्राईम टाईम मध्ये अशेच एक विचारजंती रोज म्हणल तरी चालेल असतातच. कोणताही प्रश्न असो एक्सपर्ट म्हणुन हे हजर असतातच. ह्या माणसाला दुसर काही काम आहे की नाही हाच मला प्रश्न आहे.

वृत्तवाहिनीवर तरी ते वाहिनीवाले ज्यांना बोलवतील त्यांनाच झेलायला लागतय. पण फ़ेसबुक अन टिव्टर वर या लोकांसाठी तर मोकळा मंगळवारच. आओ जाओ घर तुम्हारा. थोड कुठं खट्ट झाल की भिंती रंगावयला तयार. खर तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणल्यावर कोणी काहीही लिहु शकतो अथवा वागु शकतो पण त्याला थोड तरी तारतम्य असाव. प्रसंगानुरुप आपण काय बोललं पाहिजे किंवा एखाद्या घटनेवर प्रतिक्रिया देताना थोड तरी तारतम्य बाळगल पाहिजे.

बाळासाहेबांचा मृत्यु, आझाद मैदानावरील घटना, सचिन तेंडुलकरची निवृत्ती, दिल्ली बलात्कार प्रकरण अश्या खुप सार्‍या घटनांमध्ये ह्या विचारजंतानी जे अकलेचे तारे तोडले होते ते पाहुन संताप आला होता.अन यांच्या सोबत वाद घालण्यात काहीच अर्थ नसतो. त म्हणतात डुक्कराबरोबर कुस्ती करण्यात काहीच मजा नाही...कारण ते डुक्करच त्याला चिखलातच लोळायला आवडत.

खर सांगायच तर कधी कधी या सर्व गोष्टींचा नकळत स्वतःवर ही परीणाम होतो.खुपदा मनस्ताप पण होतो. कधी कधी या लोकांचं बौद्धिक इतक्या खालच्या पात्रतेला जातं की त्यावर कसं रिअ‍ॅक्ट व्हाव हेच कळत नाही.
शेवटी विचार पक्का केला अन स्वतःच सोशल लाईफ़ लिमिटेड करुन घेतल. टिव्टरवर फ़क्त ठराविकच लोकांना फ़ॉलो केल बाकी सर्वांना अनफ़ॉलो केलं. फ़ेसबुकवर पण ठराविक मित्रांचेच अपडेट्स ला सबस्क्राईब केलं.एका ठराविक वेळेलाच फ़क्त सोशल साईटस वर जातो. अन सर्वात महत्वाच म्हणजे न्युज चॅनेल अन न्युज पेपर दोघांनाही राम-राम ठोकलाय. तसही आजकाल बातम्या पाहुन किंवा वाचुन ज्ञानात काही भर पडेल अस वाटत नाही.

मी तरी ह्या "विचारजंतांपासुन" मुक्ती मिळवली आहे....मस्त वेळ मिळतो आहे...चांगली पुस्तक वाचतो आहे. डोक्याला शॉट नाही.

उद्याचे "अराजक"....

काही महिन्यांपुर्वीच बहिणीने एक शाळेत शिक्षक म्हणुन जॉईन केलं. सध्या ती ५ ते ७ वी ला सध्या शिकवते. तिने सांगितलेले हे दोन अनुभव .सध्या त्यांच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी निरनिराळे उपक्रम राबवले जातात. याच उपक्रमा अंतर्गत मागील आठवड्यात ६वी च्या मुलांसाठी त्यांनी एक स्पर्धा ठेवली की ज्या मध्ये त्यांना एक काल्पनिक कथा लिहायची होती. त्यासाठी कोणताही विषय असा देण्यात आला नव्हता विद्यार्थ्याने त्याला आवडेल त्या विषयावर लिहायच होत.त्याचा निकाल असा होता.

नकारात्मक कथा - ९०%
सकारात्मक कथा - १०%

नकारात्मक कथा म्हणजे हिंसक तर सकारात्मक म्हणजे सामाजिक संदेश देणारी किंवा प्रेरणा मिळावी अशी गोष्ट.

अजुन एक अनुभव....हा मात्र ७वी च्या मुलांबाबत.मराठी च्या चाचणी मध्ये अपुर्ण म्हणी पुर्ण करण्यासाठी होता त्याची उत्तर पाहा
१. ज्याची खावी पोळी त्याला घालावी गोळी.
२. घरोघरी हीच बोंब
३.उथळ पाण्याला घागर नळाला.

सुरुवातीला जेव्हा ताई ने मला सांगितल तेव्हा मला यात फ़ारस विशेष अस काही जाणवल नाही. पण नंतर लक्षात आल उद्याच्या पिढीचं मानसिकतेचं प्रतिबिंबच या गोष्टींमधुन दिसतय. उद्याच्या पिढीची मानसिकता कुठे तरी नकारात्मक अन हिंसक होते आहे का? सध्या बालगुन्हेगारीच वाढलेलं प्रमाण पाहता कुठे तरी ह्याची जाणीव होते.पुण्यामध्येच खंडणीसाठी वर्गमित्रांनी केलेला खुन, एकतर्फ़ी प्रेमातुन दहावीतल्या मुलीची केलेली हत्या.हे सारचं मन सुन्न करणार आहे.

अचानक अस झालय तरी काय त्यामुळे अस घडतय. याला मुख्यतः आपणच जबाबदार आहोत. आपलं बालपण अन आजच्या पिढीचं बालपण किती फ़रक आहे? आपल्यावर झालेले संस्कार अन आजच्या मुलांवर होणारे संस्कार. संस्कार करणारे घरामधील वडीलधारी माणसचं आजच्या चौकोनी कुटुंबातुन गायब झाली आहेत. आई-बाबा दिवसभर ऑफ़िसात अन मुलगा पाळणाघरात अशी सध्याची परिस्थिती आहे.त्यामुळे मुलांबरोबरचा संवाद बराचसा कमी झालाय.

सध्याच सामाजिक जीवनमान बिघडवणारी मुख्य गोष्ट  म्हणजे "इडीयट बॉक्स" अर्थात टी.व्ही. आज घराघरात टी.व्ही म्हणजे जीवनाश्यक गोष्ट झाली आहे.अन टी.व्ही. वरुन सध्या असत तरी काय....त्याच त्या साचेबद्ध मालिका. सहजच तपासुन पाहा अशा किती मालिका आहेत की ज्यांच्या माध्यमातुन संस्कारक्षम अशे विचार आपल्यापर्यंत पोहचले जातात. सतत सासु,सुना,प्रेम प्रकरण नाही तर कुठला तरी रिएल्टी शो हेच सुरु असत. एक तर टी.व्ही. नाही तर मग कंप्युटर किंवा मोबाईल हेच मनोरंजनाची साधन झाली आहेत.


मैदानी खेळ,संस्कार वर्ग हे सार भारत ते इंडीया हे संक्रमण होताना नामशेष होतय की काय अशी भिती वाटायला लागली.बालपणात जर तुम्हाला बहुतांश वेळा जर अशे संस्कार मिळणार असतील तर पिढी नकारात्मकच घडणार.


सरसकट सर्वांना एका चष्म्यातुन नाही पाहता येणार ....सर्वच पिढी नकरात्मक अथवा हिंसक होते आहे अस नाही पण अशी भावना असणार्‍यांची संख्या दुर्लक्ष करण्याएवढी कमी पण नाही. गरीब, मध्यम वर्ग,उच्च मध्यम वर्ग अन श्रीमंत सर्व प्रकारच्या समाजातील मुलांमध्ये अशी भावना आहे.

जगण्याच्या या शर्यतीमध्ये धावताना ज्यांच्या साठी हे आपण करतोय तेच जर ही उद्याची ही जगण्याची शर्यत हारणार असतील तर आमच्या धावण्याला अर्थ तो काय?????



मी येतोय...


बाप्पा : मुषकराव चला तयारी झाली का पुर्ण....उद्या आपल्याला निघायच आहे....उद्यापासुन दहा दिवस पृथ्वीतलावर आपला मुक्काम असणार आहे.

मुषकराव : बाप्पा, तयारी तर झाली आहे....पण ह्या वर्षी मनात जरा धाकधुक आहे.

बाप्पा: का रे बाबा....काय झाल तुला? आता कसली धाकधुक वाटते आहे?

मुषकराव: बाप्पा, क्षमा असावी पण तुमच्या नकळत मी मागील आठवड्यात पृथ्वीची चक्कर मारुन आलोय. ह्या वर्षी तुमच्या स्वागताची तयारी कशी केली आहे हे पाहण्यासाठी गेलो होतो.

बाप्पा : (स्मित हास्य करत...) अरे मुषकराव तुम्ही तर फ़ार हुषार निघालात द्या बर वृतांत...जरा मला पण कळु द्या ....यावर्षी तयारी कशी झाली आहे ते.

मुषकराव: बाप्पा....काय सांगु अन कस सांगु....सुरुवात कशी करावी तेच समजत नाही. अहो महागाई,भ्रष्टाचार,गुन्हेगारी यात सर्व जनता होरपळते आहे.रोज एक नवीन घोटाळा अन महिन्यागणिक होणारी भाववाढ. राजा तुपाशी अन जनता उपाशी अशीच काहीशी परिस्थिती आहे. सामान्य चाकरमान्याला घरखर्चाची जुळणी करता करता नाकीनऊ आलयं. हे सार काही कमी होतं ,त्यात वरुणदेव यावर्षी नाराज झाले त्यामुळे दुष्काळाची परिस्थिती आहे. आत्ता बाप्पा....सांगा...ह्या अश्या परिस्थिती मध्ये कोण तुमचं दणक्यात स्वागत करेल?

बाप्पा: मुषकराव......तुम्हाला काय वाटतय मला ह्या परिस्थिती मला माहित नाही का? मी हे सर्व जाणुन आहे. पण तुला माहित आहे का?? हे सारं असुन ही माझा भक्तगण  माझ स्वागत नेहमीप्रमाणेच तितक्या धुमधडक्यात करणार. सिलेंडरच्या किंमती वाढु दे किंवा डिझेल वाढु दे....माझ्या सेवेत ते कोणतीच कमी पडु देणार नाही हा मला विश्वास आहे अन मी पण त्यांच्या वर कृपादृष्टी मध्ये कोणतीच कसर ठेवणार नाही हा त्यांचा विश्वास आहे. हा आमचा एकमेकांवरील विश्वासचं आमच नातं दृढ करतो आहे. अरे फ़क्त "बाप्पा येतोय...." म्हणलं की सर्व कशे उत्साहात येतात बघ. हे दहा दिवस म्हणजे माझा उत्सव नसुन त्यांच्या जगण्याचा उत्सव आहे. संपुर्ण वर्षभरासाठीचा असणारा सुख, समृद्धी अन आनंदाचा ठेवा आहे. या दहा दिवसात माझ्या सेवेत काही पण कमी पडु नये म्हणुन प्रत्येक जण हा अहोरात्र झटत असतो. सर्व भक्तगण आप आपल्या चिंता ,दुःख सार काही विसरुन फ़क्त माझ्या सेवेत मग्न असतो. अन राहिल बाकी महागाई,भ्रष्टाचार इ.इ. गोष्टी....यासर्वांसोबत लढण्याची शक्तीच त्यांना या श्रद्धेतुन मिळते. अखेर लढाई तर त्यांनाच लढायची आहे पण यासर्वात त्यांच्या पाठीशी फ़क्त माझ असणं हीच त्यांची ताकद आहे.

मुषकराव: बाप्पा....माझ्या मनात आता कोणताही किंतु नाही...तुमच्या या बोलण्यातुनच माझ्या सर्व शंका निरसन झालं. चला आता थोडी विश्रांती घेउ या उद्या सकाळी लवकर पोहचायच आहे, आपल्याला उशीर व्हायला नको.

                                     ॥गणपती बाप्पा मोरया॥
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हो...हो...बस्स एकच दिवस....येतोय...तुमचा आमचा सर्वांचा बाप्पा येतोय........सुख, समृद्धी,चैतन्य, आनंद सारं काही घेउन येतोय..... स्वागताला तयार आहात ना तुम्ही ???