यक्ष प्रश्न ?


यक्ष प्रश्न म्हणजे नक्की काय असत अस मला नेहमी वाटायच.यक्ष प्रश्न कसा असु शकतो याचा प्रत्यय मला माझ्या भाचीने दिला.आता सुट्टी आली तेव्हा सतत नवीन प्रश्न अन त्यांची उत्तर देता देता माझी नाकी नऊ आली होती.एवढ सुचत तरी कस ते देव जाणो.

रोज एक नवीन गोष्ट सांगावी लागायची.गोष्ट सांगताना पण अगदी विचार करुन बोलाव लागायच कारण प्रत्येक गोष्टीतुन इतके “का” निर्माण व्हायचे की बस्स. त्या “का” ची समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत माझा पिट्टा पडलेला असायचा.

या सर्वातुन सुटका व्हावी म्हणून म्हणलं चला हिला आपण मराठी मुळाक्षर शिकवु या.त्यासाठी कार्यालयातुन येताना मराठी मुळाक्षरांच पुस्तक घेउन आलो.आज गोष्ट नको त्याऐवजी आपण मुळाक्षर शिकु या अस म्हणुन तिला मुळाक्षर कस गिरवायच हे सांगितल अन मी आपल उर्ध्वपटामध्ये डोक खुपसल. हुश्श...आज बाकी आपली सुटका झाली अश्या अविर्भावात असतानाच उर्वीने भलामोठ्ठा बॉम्ब टाकला.


उर्वी: मामा, अ च्या डोक्यावरच का रेष द्यायची?

मी:बेटु, असच लिहतात.,तिथ पुस्तकात वर बघ त्यांनी अ च्या फ़क्त डोक्यावरच रेष दिली आहे नं. (च्यायला आजपर्यंत मला हा कधीच प्रश्न पडला नव्हता त्यामुळे याच उत्तर माहिती असण्याचा प्रश्नच नव्हता. याला म्हणता “आगीतुन फ़ुफ़ाट्यात पडणे” )

उर्वी: त्यांनी अस का लिहल ? त्यांना कोणी सांगितल?

मी:पिल्लु,सर्वजण असच लिहतात अन बघ त्याच्या डोक्यावर रेष दिली की अक्षर छान दिसत. असच लिहायच बर आता.

(मी शक्य तितक समजवायचा प्रयत्न करत होतो.पण भाची ने अस काय यॉर्कर टाकला होता की माझी दांडी गुल झाली होती)

आता मी अस बोलल्यावर बिचारी काही न बोलता गुपचुप मुळाक्षर गिरवायला लागली. मला पण हायसे वाटले.चला सुटलो एकदाचा अस म्हणुन मी परत माझ्या कामाला लागलो.

पाच-दहा मिनीटांच्या शांततेनंतर पुन्हा आवाज आला मामाSSSSSSSSSSS…

उर्वी: मामा, हे बघ मी खाली पण रेष दिली आहे अन हेच सुंदर दिसतय.

मी: नाही बेटु पण अस नाही लिहीत फ़क्त अक्षराच्या वरच रेष द्यायची असते.

उर्वी: नाही...मी खाली पण देणार तेच मला आवडलय.

मी: बर ठीक आहे तसच लिहुन काढ.

पांढर निशाण दाखवुन मी माघार घेतलेली असते.पण कुठे तरी मनात याच उत्तर काय असु शकते हाच विचार मनात घोळत असतो.त्या विचारात असतानाच परत पुन्हा एकदा आवाज येतो अन छातीत पुन्हा धस्स होत कारण परत एकदा यॉर्कर आहे हे माहितच आहे त्यामुळे हा आता टोलवता येणार की पुन्हा दांडी गुल हे येणारा प्रश्नच ठरवणार होता.
 
उर्वी: मामा अरे मी A,B,C लिहताना तर नाही देत रेष मग अ, आ,इ  लिहताना का बर द्यायची?

आता मात्र मला उर्वी मध्ये मलिंगा दिसु लागतो.त्याच्याहुन भारी यॉर्कर टाकणार कोणी असेल तर हीच अशी माझी खात्री पटलेली असते.ह्या पण प्रश्नाच उत्तर नसल्यामुळे वेळ मारुन नेण गरजेचं असतं.

मी: मला नाही माहित,मी एक काम करतो उद्या माझ्या टीचरला विचारतो अन तुला सांगतो .ठीक आहे.

यादरम्यानच बोलता बोलता उजव्या हाताने लिहता लिहता नकळतच तिने डाव्या हाताने लिहायला सुरुवात केलेली असते.आता या प्रश्नापासुन सुटका करायची म्हणुन..

मी: उर्वी, डाव्या हाताने लिहु नये उजव्या हाताने लिहीत जा बर.
 
उर्वी: का बर? डाव्या हाताने का लिहायच नाही....लिहील तर काय होईल?

आजपर्यंत नेहमी काही चांगल असेल तर उजवा अन वाईट असेल तर डावा असाच समज...दोघांमध्ये भेद हा चुकीचा आहे हे माहीत असुन ही उजव्याचाच हट्ट का हे मात्र मलाही माहित नाही. 

आता तुम्हाला जर या  प्रश्नांची उत्तर मिळाली तर मला जरुर कळवा.

१.     मराठी मुळाक्षर लिहताना त्याच्या डोक्यावरच रेष द्यायची?
२.     इंग्रजी अक्षरांच्या वर रेष का नाही द्यायची?
३.     आपण नेहमी उजव्यालाच का प्राधान्य देतो?

12 comments:

श्रिया (मोनिका रेगे) said...

योगेश सर्वात पहिले तुझे पोस्ट वाचून मनात आले कि तुझी भाची खूप हुशार आहे हंका!तिचे प्रश्न खरच सॉलिड आहेत..आणि खरे आहेत.
कोणी ठरवले कि अक्षरांवरच रेष मारायची?आणि डावा उजवा हा फरक,डावखुऱ्या व्यक्तीकडे आजही एका वेगळ्या दृष्टीने पाहिले जाते.
मी देखील डाव्या हाताने पहिले लिहू लागले होते...माझी लेक ती देखील डाव्या हाताने लिहिते.पण मी जसे माझ्या आई बाबांनी माझे डाव्याचे उजवे लहानपणी केले तसे,तिचे मात्र बदलले नाही.आपल्या संस्कारात 'खाता हात'उजवा असावा असा सांगण्यात येते आहे...
आता राहिले रेषेचे तर देवनागरीत तसेच लिहित आलो आहोत.पण तुझी भाची म्हणते तसे अक्षराला दोन्हीकडे रेष मारली तर छान दिसते... :) अर्थात ते चालत नाही पण दिसते मात्र छान जणू काही २ रेषांमधल्या जागेत आपण शब्द टाकला आहे ...

अपर्णा said...

योगेश उर्वी आणि आरुष जत्रेत किंवा तुझ्या लग्नात (मला यायला जमले नव्हते तरी) भेटले होते का?? तारीख पे तारीख सारखं सवाल पे सवाल सुरु असतं आमच्याकडे पण नेहमी जवाब नसतो मग आम्ही डायव्हर्जन थियरम वापरतो..तुला अधीक माहिती हवी असल्यास मी आहेच...:)
पोस्ट तर भन्नाट झालीय...उर्वी आणि मामा जोडी डोळ्यासमोर आली....त्यातल्या त्यात तू एक नशीब समज "त्यांना असं कुणी सांगितलं?" नंतर "हे ते कोण?" म्हणून नाही विचारलं ते....:)

भानस said...

योमू, तुझी उडालेली भंबेरी मस्त पोचली रे. भाचीचे प्रश्न किती नैसर्गिक आहेत बघ की. आणि डाव्या हाताने लिहू देत की. उलट तिला दोन्ही हातांनी लिहीण्याची सवय करा. खूप फायदे होतात पुढे. मी कितीतरी वर्षे पेपर लिहीताना उजवा हात दुखला की डाव्या हाताने लिहीत असे. कालांतराने हाती लिहीणेच इतके कमी झाले की हात दुखेनासाच झाला. :(

मला आठवते त्यानुसार मुळाक्षरे शिकवताना दोन जाड रेघा मारून त्याच्या मधे ती गिरवली जात. पुढे पहिली ते चौथीही दुहेरी रेघेच्या वह्यांचाच वापर होत असे. मात्र पाचवीत गेल्यावर एकेरी रेघा व पेन यांचा वापर सुरू झाला की अक्षरांचे एकसारखे पण हरवू लागत असे.

Yogesh said...

श्रिया ताइ..
>>दिसते मात्र छान जणू काही २ रेषांमधल्या जागेत आपण शब्द टाकला आहे ..

हे अगदी मनातल बोलली आहेस.

Yogesh said...

अपर्णा...हे..हे..हे...भेट्ले असतील..डायव्हर्जन थेरम साठी नक्की विचारतो..गरजेचा आहे :)

Yogesh said...

श्री ताइ अगदी तसच झालय..तिला आता दोन्ही पण हाताने अगदी व्यवस्थित लिहायला यायला लागल आहे. हे भारीच आहे नं एक थकला की दुसर्‍या हाताने लिखाण सुरु :) :)

हेरंब said...

यवगेशसाई, एकदम मामाच केला की रे तुझा उर्वीने.. बापरे.. कसली सरबत्ती आहे प्रश्नांची.. भारी पोरगी आहे एकदम :) आमच्याकडे आत्ताच चालू असलेले प्रकार ऐकून डोकं दुखायला लागतं.. आगे आगे तर.... !! :)

Yogesh said...

@ हेरंब हे..हे...आगे आगे..और भी धमाल है मामु ;)

आनंद पत्रे said...

हाहाहा.. मामा, भाची खरोखर हुशार आहे बरं ;)
ही पिढीच किंबहूना हुशार आहे.. आपल्याला सांगितलेलं करायची सवय होती... ह्यांना प्रश्न पडताहेत.. गुड साईन ...

Anonymous said...

भाची लय हुशार हाय वो मनमौजीदादा... लहान मुलांचे प्रश्न खरेच 'यक्ष' प्रश्नासारखे असतात.त्यात कधी कधी त्यांना आपल म्हणन लवकर पटत पण कधी कधी सलग असे बाउंसर टाकले जातात कि प्रेत्येक बॉलला आपण क्लीन बोल्ड होत असतो... बाकी प्रसंग शब्दात मस्त उतरवला आहेस मलिंगाचा रेफरन्स पण आवडला.

Shriraj said...

मुलांमुळे बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात ना !!!

Rajat Joshi said...

हाहा... मस्तच!

Visit my blog, Rajat says it all - Here