तुम्हाला कं ची बाधा झाली आहे का??? किंवा रोज तेच साचेबद्ध जीवन जगून वैताग आलाय. . . अन् तुम्हाला आयुष्यात काही तरी बदल किंवा थ्रिल हव आहे का??? ( अगदी मुझे चेंज चाहिये स्टाइल!!! :)) तर यावर अगदी रामबाण उपाय सांगतो. . . तो म्हणजे एक संपुर्ण दिवस किंवा जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे "उनाडक्या" करा.
उनाडक्या म्हणजे काही प्लॅन करायचा नाही. . . काही ठरवायच नाही त्या क्षणी मनाला जी गोष्ट करावीशी वाटते ती करायची म्हणजे थोडक्यात सांगतो "आली लहर केला कहर". यात बघा खादाडी, बाइकवर फिरण , चित्रपट पाहण , आवडत्या व्यक्तींना सरप्राइज देण, मनसोक्त खरेदी, विंडो शॉपिंग ई. येत. आपल्या मनाला वाटेल अन् ज्या गोष्टीतून आनंद मिळेल अशी कोणती पण गोष्ट करायची पण ती ही अगदी अचानक.
मला "कं" ची बाधा ही फार पटकन होते. त्यामुळे माझ्या उनाडक्या ह्या सतत चालूच असतात. अन् हे आता पासून नाही करत अगदी शाळेत असल्यापासून करतोय. मला अस वाटत रोज रोज ते एक सारख जगात राहिला तर आयुष्यातील थ्रिल निघून जात. जर आयुष्यातील थ्रिल अनुभवायच तर मग किमान एक दिवस तरी जरा वेगळ जगून बघा मग जाणवेल आयुष्य खूप सुंदर आहे.
आता माझ्या थोड्या उनाडक्या सांगतो. माझ शालेय शिक्षण सगळ ग्रामीण भागात झाल. माझ्या सोबटचे मित्र मंडळ होते ते बहुतेक सगळे बागाईतदार शेतकरी. त्यामुळे सुट्टी असेल त्या दिवशी आमच घोड चौखूर उधळायच. दिवसभर कोणाच्या तरी शेतावर आम्ही पडीक असायचो. त्या दिवशी अगदी मनसोक्त हुंदडायच. जेवणाला सुट्टी देऊन फक्त रान मेवा चरायचा. काय खायच ते सीझनवर अवलंबुन असायच बोर, चिंचा, कैर्या, चिकू, शिताफळ, जांभळ, उस याचा फडशा पडायचा. द्राक्ष सीझन मध्ये तर आम्ही बागेत बसूनच द्राक्ष खायचो. कधी तरी मग कोणाही मित्राच्या शेतावर गेल की त्यांच्या घरीच जेवण व्हायची. मेनु म्हणजे चुली वरची भाकरी अन् काळ्या मसाल्यातील कोणतीही भाजी (आमच्या बोली भाषेत "कालवन" अन् ग्रामीण भाषेत "कोड्यास"). तुम्हाला सांगतो या मेनुची सर कशालाच नाही. संध्याकाळी तिथेच गुळाचा चहा व्हायचा. तुम्हाला सांगतो तुम्ही जर चहाचे चाहते असाल तर आयुष्यात एकदा तरी गुळाचा चहा प्या तो ही चुलीवरचा. (आहा हा. . आता आठवूनच इच्छा झाली आहे.)खाण्याबरोबरच आम्ही शेतीची पण काम करायचो (अर्थातच जीवाला झेपतील अशीच) त्यात मला शेतीला पाणी द्यायला खूप आवडायच.
जसा मोठा झालो तसा हे सार माग पडल. इंजिनिअरिंगला गेल्यानंतर मग गावी जाण कमी झाल गेलो तरी सुट्टीमध्ये ते पण ४-५ दिवसच. हॉस्टेलला आल्यानंतर सुद्धा उनाडक्या करत राहिलो पण फक्त स्वरूप बदलल.
हॉस्टेलला असताना आम्ही "निशाचर" या गटात गणलो जायचो. आमचा दिवस हा रात्री ८ नंतर सुरू व्हायचा. तेव्हा भूत ह्या प्रकाराविषयी खूप क्रेझ होती.खुपदा या विषयावर गप्पांचे फड जमायचे. एकदा रात्री अशीच चर्चा रंगली होती तेव्हा किरण ह्या आमच्या मावळ्या कडून समाजल की हॉस्टेलच्या पाठीमागे दूरवर असणार्या खडी मशीनच्या परीसरात भुताचा वावर आहे. बस हे समजल अन् त्या क्षणाला आम्ही १० जण कपांउड वॉलवरुन उड्या मारुन भूत पाहिला गेलो होतो. वेळ होती मध्यरात्री २.००ची. रात्रभर भटकलो भूत तर काही मिळाल नाही पण भटक्या कुत्र्यांनी मात्र चांगल पळवल होत.
रोज कॉलेज, कट्टा याचा एकदा जाम "कं" आला होता .हॉस्टेलला पण जावस वाटत नव्हत. म्हणून मी अन् राहुल्या सिक्स सिटरला बसलो अन् बारामातीला गेलो. पिक्चर ला जायचा पण मुड नव्हता काय कराव ह्या विचारात एस.टी. स्टॅंड ला जाउन बसलो. थोडा वेळ तिथे टी.पी. केला. त्यानंतर मी सहज राहुल्याला म्हणालो मला आता झोपावसं वाटतय. . .साहेबांनी क्षणाचाही विलंब ना करता मला एस.टी. स्टॅंड वरील बाकडा दाखवला म्हणाला " जा झोप." तुला कोण ओळखणार आहे. विचार पटला. . . एस.टी. स्टॅंडवरच मी चक्क १तास निवांत ताणून दिली होती. मी झोपलो म्हणून राहुल्याने पण समोरच्या बाकावर ताणून दिली होती. त्यानंतर भिगवन चौकात जाउन मिसळ चापली. इकडे तिकडे बागडलो अन् परत हॉस्टेलला आलो.
पुण्यात आल्यावर नोकरी लागली. . .स्व कमाइवर उनाडपणा करण्यात मजा काही औरच आहे. . .आता ह्या उनाडक्या थोडक्यात सांगतो.
१. मे महिन्यात भर दुपारच्या उन्हात बाइकवर बर्मुडा अन् टी शर्टवर हेम्याच्या घरी तासगावला हापूस आंबे खाण्यासाठी.
२. एका रविवारी सकाळी लवकर (अर्थात आंघोळ न करता) सोलापूर हाय वेला मिसळ खायला.
३. मध्यरात्री एक वाजता मी, हेम्या आणि सच्या आम्ही दीड डझन आंबे चापले होते
४. मुसळधार पावसात लोहगड आणि निलकंठेश्वरचा ट्रेक तो पण बर्मुडा अन् टी शर्टवर
५. क्रेडीट कार्ड वर एकावेळी ३०,००० ची खरेदी. . .(ज्याचे व्याजासहित ४५,००० भरलेत. :( )
६. संध्याकाळी हाफिसातून कल्टी मारुन हडपसर वरुन दुर्गाला कॉफी मारायला.
७. हाफिसातून हाफ डे घेऊन बालगंधर्व च्या कट्ट्यावर टी.पी किंवा पिक्चरला.
८. कधी तरी फक्त भेळ, पाणी पुरी, वडा पाव, एस.पी.डी.पी यावर दिवस काढायचा.
९. लक्ष्मी रोडला संध्याकाळी फक्त भटकायच ते पण कोणतीही खरदीए न करता.
१०. सार्वजनिक पेपर वाचनालय़ असत तिथे जाउन सगळे पेपर वाचून काढायचे.
अस खूप सार. . . जे आपल्या मनाला आवडेल ते. . .ते अगदी क्षणार्धात. . .कोणताही विचार ना करता. . .( फक्त क्रेडीट कार्ड वापरताना विचार करा!!!)
ज्या दिवशी तुम्ही अस वेगळ काही तरी कराल त्यानंतर पाहा आपोआप तुमचा मूड अगदी मस्त होऊन जाईल.
एक गोष्ट लक्षात ठेवा
"आहात तरुण, घ्या "उनाडक्या" करून
उद्या गेलात मरून तर टाकतील पुरून"काय म्हणताय मग. . .तर चला जास्त विचार न करता तुम्ही पण सुरू करा "उनाडक्या"!!!!!