2009 मधील सर्वात अविस्मरणीय घटना म्हणजे माझी विकेट पडली. नाही समजलात अहो जिच्या शोधात जे काही भन्नाट
कांदे पोहे पचवले ती अखेरीस सापडली.दिवाळी पाडव्याच्या दिवशीच आमची विकेट पडली अन् ती ही अगदी नाट्यमयरीत्या. तशी ही पोस्ट मी त्या दरम्यानच करणार होतो पण म्हणल एवढी महत्वाची ही घटना वर्षाअखेरीस ब्लॉगवर टाकु या. (
महेन्द्र काका कस वाटल ब्लॉग न लिहीण्याच कारण ?? :) )
दिवाळी ला समस्त कामगार वर्ग सुट्टी ला गेल्यामुळे स्लॅबवर पाणी मारण्याच काम माझ्याकडे आल होत. दिवाळी पाडाव्याच्यादिवशी अभ्यंग स्नान झाल्यावर नेहमीप्रमाणे पाणी मारण्यासाठी मी साईटवर पोहचलो, तोच ताई चा फोन आला " तू तिथेच थांब तुला घ्यायला माई (माझी मोठी बहीण)व जीजु येत आहेत अन् त्याच्यासोबत तुला मुलगी पाहायला जायचाय."मी काही प्रतिक्रिया देइपर्यंत पुढील वाक्य अस बाबानी सांगितलय. बस तीर्थरुपांचा आदेश म्हणल्यावर काय बोलणार आम्ही??? बाबा कुठे आहेत विचारल तर ते पुढे गेलेत तुम्हाला ते तिथेच भेटतील. . .आता मात्र जाण्याशिवाय काही पर्याय नव्हता.
स्लॅबवर पाणी मारायला आलो असलो तरी पण योगा योगाने जरा ठीक ड्रेस होता त्यामुळे अवतार जरा बरा होता.थोड्याच वेळात जीजू आले अन् आम्ही निघालो. साइटपासुन साधारण 15 की.मी. वर तीच गाव होत. आम्ही तिथे जाण्यागोदर रस्त्यात बाबा अन् काका ( ज्यानी हे स्थळ सुचवल ते ) हे भेटले, त्यांच्याकडुन समजल की अजुन अर्धा तास थांबाव लागेल कारण तिथे अगोदरच दुसरे पाहुणे पाहण्यासाठी आलेले होते. थोड्या मिस कम्युनिकेशन मुळे हा गोंधळ झाला होता.त्यांना पण खूप चुकीच वाटत होत पण ते तरी करणार काय?? ते पाहुणे गेले की सांगा मग आम्ही येतो अस सांगुन आम्ही आमच्या परीचयाचे एक स्नेही तिथे जवळच राहतात तिकडे गेलो.
बाबा थोडे बाजूला जाताच ,आमचा मराठी बाणा जागा झाला. माई जवळ थोडासा राग म्हणजे निषेध व्यक्त केला (कसा केला असेल ते समजून घ्या). मी जातो, तुम्ही बघून घ्या, माझा मूड गेलाय, मी नकारच देणार ई.ई. . . .अस माझ चालू होत तोच आमचे तीर्थरुप आले फक्त त्यांनी माझ्याकडे पाहील अन् विचारल काय झाल काही अडचण आहे का?? थोडा समजूतदारपणा दाखव. . .बस्स संपल पुन्हा एकदा बोलती बंद, ढान्या वाघाच मांजर झाल होत!!!
तब्बल पाउन तासाने त्यांचा फोन आला मग आम्ही निघालो. तो पर्यंत ब्लॉगवर यावर काय खरडायच याचाच विचार करत होतो.ह्या मुलीला नकार द्यायचा असा दृढ निश्चय करून निघालो. फक्त केलाच नाही तर तो माई अन् जीजू जवळ बोलून पण दाखवला.
शेवटी आम्ही त्यांच्या घरी पोहचलो माझा मूड नसल्यामुळे मी अगदी शांत होतो. सुरुवातीला कश्यामुळे गोंधळ झाला, तसदीबद्दल क्षमस्व,आमची ओळख परेड इ. झाल. त्यानंतर मग मुलीला बोलवल. . .आलोच आहे तर बघू या. . . .अश्या प्रामाणिक हेतूने एक चोरटा कटाक्ष टाकला. . बस्स काय झाल माहीत नाही लेकीन आपून के दिल की घंटी बजी!!!
मनातून अस वाटल यार हीच ती!! जिला आपण शोधतोय ती हीच. . .(आता झाली का गोची!!! :)) आयुष्यात पहिल्यांदा अस फिलींग आल होत.
बाबा अन् जीजू यांनी थोडे प्रश्न विचारले, आता वेळ होती माझी. . .मी काय विचारू?? अगदी भोळा भाव दाखवून मी म्हणालो ( मनातून तर मला फक्त तिच्याशीच बोलायच होत) शेवटी तुम्ही दोघे बोला आम्ही सगळे बाहेर जातो अस सांगुन सर्व जण बाहेर पडले. . मनातून तर लाडू फुटत होते. . चला आता बोलता येईल अस वाटल. . . पण हा आनंद फार काळ नाही टिकला. . कारण तिचा भाउ अन् तिचे काका हे समोरच येऊन बसले अन् त्यानंतर ही आली.
आता काय बोलणार?? तिच्याशी बोलण्याअगोदरच बंधुराज सुरू झाले काय करता, डिग्री कुठे झाली. कॅड मॅनेजर आहे म्हणल्यावर मग आमच्या त्यावरच जास्त गप्पा झाल्या.तिच्याशी फक्त एकदाच बोललो. साधारण 15-20 मिनिटानी आमच्या गप्पा संपल्या अन् ते ही तिच्याशी काही न बोलता.
आम्ही बाहेर पडताना माझा दृढ निश्चय अगदी कोलमडून पडला होता. बाबा, माई, जीजू गालातल्या गालात हसत होते कारण आता त्यांना मी सापडलो होतो.निघाल्यानंतर थोड्यावेळाने तीर्थरुप म्हणाले तर मग काय नकार कळवुन टाकतो. तू तर तेच ठरवल होत ना?? यावर मी शांत झालो खाली मान खालून आपला गप्प बसलो. . .काही बोलाव म्हणून वर पाहील तर सगळेजण हसत होते. . . माझी विकेट पडली होती!!!
साधारण 2 दिवसांनी त्यांचा पण पसंतीचा फोन आला. त्याच वीक मध्ये मला कैरोला निघायच होत त्यामुळे माझी गडबड होती म्हणून तुम्ही बोलणी करून घ्या फक्त फायनल निर्णय होण्यापूर्वी मला मुली ला भेटायचाय, त्यानंतरच आपला निर्णय द्या अस मी बाबांना सांगुन दिल.
मला कैरो ला लगेच जायच होत त्यामुळे भेटायच कस हा प्रश्न होता कारण ती मुंबईत मी पुण्यात . . . भेटणार कस?? सुट्टी मिळणं पण अवघड. ह्या सगळ्यात शेवटी जाताना विमानतळावर भेटू या अस ठरवल.
माझी सकाळी 9.00 ची फ्लाईट होती त्यामुळे पुण्याहून मी रात्रीच निघणार होतो. पहाटे 5.30 ला भेटू या अस नक्की झाल. ठरल्याप्रमाणे मी 5.30 मी टर्मिनल 2 ला पोहचलो. पण अजुन ही लोक काही पोहचली नव्हती. एकटी येते की सारा परीवार घेऊन येते, काय बोलू, काय विचारू,वेळेवर येईल का?? खूप सारे प्रश्न मनात येत होते.
शेवटी 5.45 ला तिचा भाउ अन् ती आले अन् मी सुटकेचा निश्वास सोडला. चला आता तरी किमान मी बोलू शकेन अस वाटत होत. पण बाहेर उभ राहून कस बोलणार ?? म्हणून मी चेक इन करून तर ही दुसर्या गेट ने अरायव्हल ला येईल मग तिथे बोलू या अस सांगुन मी अरायवलला गेलो. तिथे जाउन पाहतो तर काय. . .तिथे मध्ये बॅरीकेड होत त्यामुळे. मी टर्मीनल 2 मधून अरायवल ला जाउ शकत नव्हतो. झाल पुन्हा एकदा पोपट!!!
ती पलीकडे अन् मी अलीकडे अश्याच आम्ही गप्पा मारल्या. अन् त्या बॅरीकेडच्या साक्षीणेच मी तिला लग्नासाठी विचारल.
आमच्या दोघांचा पण निर्णय झाला. तेवढ्यात तिचा भाउ सॅण्डविच घेऊन आला ते खाउन आम्ही निरोप घेतला.लगेच बाबांना फोन करून निर्णय देऊन टाकला. अन् त्यांनतर 2 आठवाड्याने आमच लग्न नक्की झाल.
त्या दिवशी निघताना मी संदीप खरेचं " हे भलते अवघड असते. . . . " हे गान मी फील करत होतो. मुंबई विमानतळावरील तो अरायवल सेक्शन आम्ही दोघेपण कधीच विसरू शकणार नाही.
हे कशे योगा योग असतात ना??? पाहा. . . मी नकार द्यायचा अस ठरवून गेलो होतो त्या मुलीलाच होकार दिला.अन् सर्वात महत्वाच सांगायच राहिलं, "मी मुंबईच्या मुलीशी कोणत्याही परीस्थीतीत लग्न करणार नाही अस ठरवल होत पण शेवटी मला मुंबईचीच मुलगी मिळाली." (समस्त मुंबईकर मुलींची माफी मागून. . .होणारी बायकोसुद्धा आली त्यात!!)
चला अजुन 5 महिने तरी बॅचलर लाइफ जगून घेतो.!!!