Showing posts with label वाचनीय. Show all posts
Showing posts with label वाचनीय. Show all posts

वनवास

नुकतंच प्रकाश नारायण संत यांच "वनवास" पुस्तक वाचलं. लंपन नावाच्या एका शाळकरी मुलाचं भावविश्व यात रेखाटलं आहे.लंप्या म्हणजेच लंपन याच भावविश्व इतकं सुंदर उभं केलं आहे की वाचता वाचता तुम्ही अवघे लंपन मय होऊन जाता.

लंपन हा शाळेत जाणारा असून नुकताच पौगंडावस्थेत प्रवेश करतो आहे.त्यादरम्यान आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा त्याच्या नजरेतून घेतलेला धांडोळा म्हणजे वनवास हा कथासंग्रह आहे.हा प्रवास इतका अलगद आहे की त्याची प्रत्येक कथा तुम्हाला हरखून टाकते.

लंपन हा त्याच्या आजी आजोबां सोबत राहत असतो त्यामुळे रोजच्या जीवनात त्याला आईची वाटणारी उणीव.तिच्या बाबतीत त्याचं असणार हळवंपण....आईची आलेल पत्र वाचताना तो आईच्या विचारात त्याच हरखून जाणं हे सार खूप भावणार आहे.

बाबा ,आजी ,आजोबा ,त्याची लहान भावंड, त्याचे मित्र अशा त्याच्या बाजूला असणाऱ्या प्रत्येका सोबतच्या नात्यांचा प्रत्येक कथेमागे पदर उलगडत जातो अन सोबतच लंप्या सुद्धा.

यामधील सर्वात सुंदर जे वर्णन आहे ते लंप्या अन सुमी बाबत.सुमी ही त्याची खूप जवळची मैत्रीण आहे.सुमी बद्दल त्याच असणार आकर्षण. तो सुमी पुढे कधीच व्यक्त होत नाही पण तिच्यासाठी असणार ते सुप्त प्रेम,तिचा तो हवा हवासा वाटणारा सहवास हे सार कथेतून उलगडत.लंप्या च्या भाषेत सांगायचं झालं तर...."सुमीची आठवण आली की पोटात गडबड होते आहे....अस वाटायला लागतं"...तसच काहीस लंप्याच्या भावविश्वात गेलं की वाटत.

लंप्या च्या कथा जेवढं तुम्हाला सुख अन आनंद देतात त्यासोबत च एक हलकासा अस्वस्थ करणारा अनुभव पण देतात.

या कथा संग्रहाच सर्वात जास्त यश जात ते प्रकाश संत यांच्या लिखाणशैली ला.प्रत्येक कथा ही एक नव्या प्रकारे तुमच्याशी संवाद करते.अन संवादात तुम्ही सार विसरून केव्हा गुरफटून जाता हे समजत नाही...लंप्याच्या भाषेत सांगायचं झालं तर या मॅड सारख्या कितीही वेळा मी वाचू शकतो.