आठवणीतले खेळ -१

रोज मी हाफ़िसातुन घरी येतो त्यावेळी आमच्या सोसायटीमधील बच्चे कंपनी खाली जमलेली असतात (अर्थात मम्मी पण सोबत असतेच) अन क्रिकेट खेळणे किंवा घोळका करुन कसल्या तरी गप्प ठोकत बसणे हेच चालु असत.मी जेव्हा त्या मुलांकडे पाहतो तेव्हा खर तर खुप वाईट वाटत....ते त्यांच बालपण हरवुन बसली आहेत याची प्रकर्षाने जाणीव होती.त्यांचे खेळ,त्यांची मस्ती सार काही कोमेजुन गेलय.....त्यांनी अकाली प्रौढत्व आलय अस वाटत....बालपण कस अवखळ,अल्लड,दंगेखोर असल पाहिजे....योग्य त्या वयात योग्य तेच कराव... (आवरा...आवरा...बाबागिरी सुरु झाली...पोस्ट भरकटते आहे)

त्यांच्याकडे पाहुन मला माझ बालपण आठवल...बालपणीच्या अश्याच काही हरवलेल्या खेळांविषयी खरडणार आहे....की ज्यांची उणीव मला नेहमीच भासते....लहानपणी प्रत्येक खेळाचा एक सिझन असायचा ...जसा मौसम बदलायचा त्याप्रमाणे खेळ पण बदलायचा.

असाच एक प्रचंड आवडीचा खेळ : विट्टी दांडु.
विट्टी-दांडु चा मौसम आला की तयारी चालु व्हायची ती म्हणजे तो तयार करण्यापासुन...आम्ही राहत असलेल्या वाड्यासमोरच लाकडाची वखार होती...तिथले औटी बाबा म्हणजे आमच हक्काच माणुस...फ़क्त त्यांना जाउन सांगायच ...आम्हाला विट्टी दांडु करायचा आहे लाकुड द्या...(म्हणजे अगदी तीर्थरुपांचीच वखार आहे असा अविर्भाव असायचा)...अर्थात हे सगळ चकटफ़ु असायचं...(विट्टी दांडुला लाकुड विकत घ्यायच म्हणजे ही त्या काळात अशक्य वाटणारी कल्पना होती)... त्यानंतर बाळु मिस्त्री होताच....त्याला एवढा त्रास देउन पण बिच्चारा आम्हाला असला भन्नाट विट्टी दांडु करुन द्यायचा की बस्स...तेव्हा तो जगातला सगळ्यात भारी माणुस वाटायचा...

वि्ट्टी दांडु मधील कोली अन रिंगण-रिंगण हे दोन प्रकार आम्ही सर्वात जास्त खेळायचो...रिंगण-रिंगण मध्ये जर एखाद्यावर राज्य तंगला की तो कधी कधी दोन दोन दिवस चालायचा....शाळेत विट्टी दांडु घेउन जायच म्हणजे सर्वात मोठ दिव्य असायच ...जर चुकुन सरांच्या नजरेस पडल तर मग काही खैर नसायची वर घरापर्यंत बातमी पोहचायची...त्यामुळे शाळेच्या मैदानाजवळ (आमची शाळा गावाबाहेर असल्यामुळे मैदानाच्या आजुबाजुला सगळ माळरानच होत) असलेल्या झुरीत आम्ही लपवायचो...मग काय दुपारच्या सुट्टीत तेवढ एकच काम.

कोली खेळताना भिडुने कोललेली विट्टी झेलताना खुपदा हाताच्या बोटांना जखम व्हायची...अन हाताची जखम घरी लपवायची म्हणजे अशक्यातली अशक्य गोष्ट...ते लक्षात आल की घरात मग काय आमच्या नावाने सत्यनारायणच व्हायचा. .  . . मग यापासुन वाचण्यासाठी  आम्ही गांधी टोपीचा वापर करायला लागलो (पांढरा शर्ट, अर्धी खाकी चड्डी अन गांधी टोपी हा आमचा गणवेष होता)....गांधी टोपीचा आजतागायत तरी कोणी असा वापर केला नसेल . :)

असा हा विट्टी दांडु फ़ीवर विट्टी -दांडु पाणी तापवायच्या बंबात गेल्याशिवाय उतरायचा नाही.....म्हणायला तो पर्यंत आमच मनोसक्त खेळुन झालेल असायचं त्यानंतर मौसम असायचा "गोट्यांचा".

विट्टी दांडु हा खेळ आता जवळपास नामशेष झाला आहे...शहरात सोडा गावाकडे पण आता कोणी हा खेळ खेळताना दिसत नाही...हा खेळ सध्या तरी इतिहास जमा झाल्यासारखाच आहे.

27 comments:

हेरंब said...

मी तर फार क्वचित खेळलो आहे विटी दांडू.. पण तेव्हाही आवडला होता..

रच्याक, गांधीटोपीवाला बाल-योमुं कसा दिसत असेल याचा विचार करत होतो ;)

THEPROPHET said...

यार... मी कधीच विटी-दांडू खेळलो नाही...
पण आमचे लहानपणचे निरुपद्रवी विषामृत (आम्ही असाच एकत्रित उच्चार करायचो), लपाछपी.. जाम मिस करतो मी! :(

स्वप्ना said...

लहान पाणी खेळायचे खेळ सध्या मुले विसरत चालली आहेत हे सत्य आहे.फक्त विटी-दांडू च नाही तर लगोरी,अप्पारप्पी,मधला कावळा,जोड साखळी,शिरापुरी,लपाछपी,विषामृत,आंधळी कोशिंबीर वगैरे सारखे खेळ नामशेष झालेत.
याच गोष्टीवर तारक मेहता का उलटा चष्मा या कार्यक्रमात एक २-३ भाग सदर केले गेले होते.सगळ्या मुलांचे आई-बाबा हे सगळे खेळ खेळतात आणि मुलांना खेळायला प्रवृत्त करतात .हेच करायची आता गरज आहे पालकांनी!!!!!!!

Anonymous said...

खरच आपल्या लहानपणीचे असे खुप खेळ आता नामशेष होत चालले आहे...छान सदर सुरु केलस.
तळ्यात मळ्यात, संत्र लिंबू,पकडा-पकडी,सोनसाखळी, लपाछूपी,गोट्या, आंधळी कोशिंबीर, डोंगराला आग लागली, आम्ही तुमच्या पाण्यात, रंग रंग कोणता रंग, आबादुबी, खांबापकडी वैगेरे...खुप मिस करतो यार मी....ते 'टॅम्प्लिज' वैगेरे बोलण आठवते का ...

Anonymous said...

विटी दांडू. त्याला आम्ही गिल्ली दांडू म्हणायचो. सूर पारंबी पण मस्त खेळ होता. लगोरी खेळतांना किती वेळ जायचा हे समजायचंच नाही. ’मी शिवाजी’ पण आवडता खेळ होता. जुने दिवस आठवले..

sanket said...

आठवण ताजी झाली. गिल्ली- दंडा असेच म्हणायचो आणि आजही म्हणतो.:-D . मी फ़ारसा खेळला नाही.(पण जेव्हा खेळलोय तेव्हा खूप enjoy केलं.).त्यामुळे या खेळातले उपप्रकार आठवत नाही आता.गिल्ल्या आणि दंडा आम्ही स्वत:च बनवायचो.लाकडाची कमी कधीच भासली नाही.
आमच्या भागात दांडूने अंतर मोजतांना वोकट, रेंड, मूड, नाल.... असे मोजायचे.नंतर खंडी वगैरे प्रकार..असो प्रतिक्रिया खूप लांबत चाललीये. इथेच वेगळा लेख होऊन जायचा. Nostalgia... अजून काय.
आपली लेखमाला चालू ठेवा. सगळे खेळ पुन्हा वाचतांना मजा येइल. आता कोणीच हे खेळ खेळत नाही.

नागेश देशपांडे said...

छान आहे पोस्ट,

मी लहानपणी, विटी-दांडू, गोट्या, लपंडाव, पावसाळ्यात गज खुपसी असे खेळ खेळलो.
मात्र सगळ्यात आवडता खेळ होता. "सिनेमा"
http://blogmajha.blogspot.com/2010/03/blog-post_9482.html
(कृपया माझा ब्लॉग पहा.)
त्याच प्रमाणे, धप्पाकुट्टी (रबरी चेंडूने मारामारी) ही खेळायचो मात्र कोणाला चेंडू लागला तर आम्हाला मार बसत असे म्हणून हा थोडा कमी खेळलो.

आजच्या पिढीला हे विनाखर्च खेळ तर माहितच नाही

सचिन उथळे-पाटील said...

मनमौजी दादा मी लय खेळलोय रे विटीदांडू. मस्त जाम मजा यायची.

पण सगळ्यात आवडता खेळ म्हणजे हुस्के.....
तुमी काय म्हणता माहीत नाही.

tanvi said...

होय रे योगेश ते विटी दांडू, दगड का माती, जोडीची शिवाशीवी, साखळी सगळे हरवलेय ..... तरिही परिस्थिती अगदीच निराशाजनक सध्या तरी नाही वाटत रे मला, निदान माझ्या मुलांबाबत तरी, विषामृत ही मुलं ice and water म्हणून खेळतात, ईतरही खेळांची नावं वेगळी तर काही खेळच वेगळे .... :)

अर्थात आपले बालपण मिस केले जातेच :)

Yogesh said...

हेरंब...बाल योमुं...ख्या...ख्या...ख्या.. :) :)

Yogesh said...

विभि...विषामृत अन लपाछपी हे तर ऑल टाईम हिट आहेत...विट्टी दांडुची मजाच काही और आहे.

Yogesh said...
This comment has been removed by the author.
Yogesh said...

स्वप्ना...धन्यवाद...या मालिकेविषयी ऐकल आहे पण पाहिली नाही कधी...बघीन आता.

Yogesh said...

देवा...टॅम्प्लीस..कच्च लिंबु...सार आठवत रे...अन मिस पण करतो.

Yogesh said...

काका...लगोरी आम्ही त्याला लिंगोरचा म्हणायचो त्यातही...जाम मजा यायची.. :) :)

Yogesh said...

संकेत धन्यवाद...

Yogesh said...

नागेशजी ब्लॉगवर आपल स्वागत व आभार..

Yogesh said...

सपा... हुस्के...नाही माहीत ..कदाचित मी वेगळ्या नावाने ओळखत असेल.

Yogesh said...

तन्वी ताय ठांकु...खरच आपल्या सारख बालपण नाही मिळत आहे सध्याच्या मुलांना..

mynac said...

मित्रा,
फार वर्षा नंतर विटीदांडूची आठवण करून दिली नि फडक्यांच्या उदयने वाड्यात विटी दांडू खेळतांना मारलेली विटी माझ्या डोळ्यावर बसल्याची आठवण झाली.फार मस्त खेळ आहे रे खरा पण आता वाघ-सिंहा प्रमाणेच हळू हळू नामशेष झालाय.
कालाय तस्मै नमः,दुसर काय!

mynac said...

ओंकार,
अप्पारप्पी म्हणजेच आबाधाबी,डबड ऐसपैस,भवरा, लंडन लंडन लंडन,गोट्यान मधले हाडकी,बन टर,तीन गल्ली,पतंग,मांज्या,पेच,काटाकाटी सगळंच आठवलं नि बालपणात गेल्याच समाधान मिळाल.मजा आली.धन्यवाद.

Anonymous said...

भोवरा, गोट्या, लगोरी अहाहा!!!! काय मस्त खेळ होते नै आपले. मी इथे मुलांचे जमेल तसे घेते..... ते हि मजा करतात पण मोठ्या माणसांनी शिकवून करणे वेगळे आणि आपल्या सवंगड्या
बरोबर खेळणे हेच खरे!!! छान आठवण करून दिलीत. पोस्ट आवडली.

अपर्णा said...

मागे एकदा मी मराठी मंडळाच्या समितीवर होते तेव्हा आम्ही पिकनिकला असे विसरलेले खेळ ठेवले होते...अरे इथल्या मुलांनाही लगोरी, खो खो इ. खेळायला सॉलिड मज्जा आली...आणि अर्थात आम्हालाही

Sagar Kokne said...

हा विषय तर बरेच दिवस माझ्या मनात आहे...
अजुन कागदावर उतरला नाही एवढेच....आपल्या लहानपनीचे खेळ आता किती दुर्मिळ झाले आहेत...
असो जमल्यास मीच टाकतो एक पोस्ट....

मीनल said...

आमचेही जुने खेळ आठवले रे..
बिट्ट्या, लपाछपी, घर-घर..
त्या खेळात मजा यायची, पण आता खरे घर-घर सांभाळ्ताना तारांबळ उडते.

Unknown said...

दगड का माती , डोंगर का पाणी हे खेळ कसे खेळतात कोणी सांगू शकेल का?

Unknown said...

दगड का माती , डोंगर का पाणी हे खेळ कसे खेळतात कोणी सांगू शकेल का?