सौजन्याच्या आयला ......

आजच्या युगात जर तुम्ही जास्त सौजन्य दाखवुन जर तुम्ही कोणाची कीव केली तर तुमचा जीव घेतील.असाच अनुभव मी दोन दिवसांपुर्वी घेतला.

घरी टी.वी. नसल्यामुळे तो खरेदी करायचा असा निर्णय झाला.कोण म्हणायच LED घे तर कोणी म्हणायच LCD घे.प्रत्येकाचा वेगवेगळा सल्ला.....शेवटी सर्वात म्ह्त्वाचा म्हणजे खिश्याचा सल्ला घेतला अन बजेट नुसार LCDच घेउ या असा निर्णय झाला.आता LCD कोणत्या कंपनीचा, किती इंची घ्यावा यावर काथ्याकुट सुरु झाला...(किती चिकित्सक...किती अभ्यास करतोय...किती शहाणं ते लेकरु...शाब्ब्बास)....कोणत्याही कंपनी शो रुमला जाण्याऐवजी इलेक्ट्रॉनिक्स मॉलला जाऊन घेउ या म्हणजे सर्व ब्रॅंड पाहता येतील ह्या हेतुने सातारा रोडवरील "विजय सेल्सला" गेलो.

तिथे प्रवेश करताच अगदी हसतमुखाने स्वागत झाले...(नवीन बकरा आला आहे...चला कापु या...असाच काहीसा अविर्भाव सेल्समनच्या चेहर्‍यावर होता...त्याबरोबरच काउंटवरील कन्या "आता ह्याच काही खर नाही सेल्समन याला बरोबर घेणार" या विचाराने गालातल्या गालात खदाखदा (गालातल्या गालात खदाखदा कस??? जेव्हा खरेदी जाल ना तेव्हा समजेल हे) हसत होती)प्रत्येक मॉडेलला तो चांगलच म्हणुन साधारण आमचा अंदाज घेत होता..म्हणजे हे फ़क्त वेळ घालवायला आले आहेत की खरोखर टी.वी. घ्यायचा आहे याची चाचपणी चालु होती.

त्यातच त्याने ललॉईड नावाचा एक भारतीय बनावटीचा LCD दाखवला...थोडे त्याचे गुणगान गाउन हाच टी.वी. सध्या किती उत्तम आहे हे पटवत होता...(च्यायला मेरे कु येडा समझ रहा था...उस कु क्या पता मैं भी बारा पिंपळ का मुंज्या है..)मग त्याला चांगलाच घेतला...हो सर थोडी पिक्चर क्वालीटी कमी...साउंड पण बरा आहे...उसबी चालत नाही..HD इनबिल्ट नाही...अरे मग आहे काय यात??

त्यांनतर सॅमसॅंग अन एल.जी.चे मॉडेल पाहयला सुरुवात केली...थोड्यावेळापुर्वी भारतीय बनावटीच्या LCDचे गुणगान गाणारा आता हेच LCD बेश्ट आहे हे पटवत होता...त्याची इतकी वटवट (आपला सत्यवान नव्हे) चालु होती...(आयला हा झोपेत पण हेच बरळत असणार)...मी आपला मनोभावे श्रवणभक्ती करत होतो...एवढ सार पाहुन म्हणजे ऐकुन मला मनासारखा LCD  मिळत नव्हता. जीजुंना मात्र सॅमसंगचा आवडला होता..

तुमच्या कडे सोनी चे टी.वी. नाही आहेत काय??? म्या पामराने त्याला प्रश्न केला....माझ्याकडे पाहुन आहे की पण त्यांच्या किंमती फ़िक्स आहेत तिथे कमी जास्त होणार नाही (हे अगदी हलक्या आवाजात)...चालेल मला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही दाखवा मला सोनी चे टी.वी....(अरे पावट्या कुठे बार्गेन करायच हे मला माहित आहे...ते तु नको शिकवु..हे मनात) अस म्हणुन आता सोनीच्या मॉडेल्सवर काथ्याकुट चालु केला...आता सेल्समन नी सोनीचे गुणगान सुरु केल...जिकडं खोबर तिकडं चांगभल...या म्हणीचा प्रत्यय तेव्हा आला....शेवटी सोनीच एक मॉडेल आवडल मग जास्त विचार न करता तेच अंतिम करुन टाकलं.

पेमेंटसाठी ५०% आता अन ५०% टक्के उद्या देतो अन टी.वी. आजच घेऊन जातो असा पर्याय मी ठेवला..हा ते मान्य नाही करणार हे माहित होत पण तरीही उगाचच आपला शहाणपणा करत होतो...इतका वेळ आमच्या मागे पुढे फ़िरणारा आमची सर्विस किती चांगली आहे...तुम्ही इथेच खरेदी करा यासाठी पटवणारा सेल्समन निर्णय अंतिम झाल्यावर गायब झाला होता....त्यानी त्याच काम साधल होतं.

आम्ही पेमेंट करुन संध्याकाळी ४ वाजेपर्यंत टी.वी.घरपोच मिळेल अस आश्वासन घेउन (सामान्य माणसाच्या पदरात नेहमी हेच मिळतं) आनंदातच घरी पोहचलो...घड्याळाचा काटा जसा पुढे जात होता तशी उत्सुकता वाढत होती...पाच वाजले तरी न त्यांचा काही फ़ोन आला नव्हता...त्यांनी दिलेल्या नंबरवरही कोणी फ़ोन घेत नव्हत...शेवटी खुप वेळाने फ़ोन घेतला...इकडे-तिकडे अस चार पाच ठिकाणी ट्रान्सफ़र होऊन शेवटी योग्य विभागात फ़ोन पोहचला. अर्ध्या तासात टी.वी. पोहचेल अस सांगुन मी काही बोलायच्या आत पलीकडुन फ़ोन आपटला गेला.

शेवटी एकदाचा सात वाजता विजय सेल्सचा माणुस टी.वी.घेउन पोहचला...बॉक्स पाहण्याअगोदर अगदी घाईत ओपन केला...फ़िटींग वगैरे सुरु केली...तेव्हाच काहीतरी गडबड आहे याची शंका आली...म्हणुन पीस पाहिला तर तो पुर्णतः धुळीने माखला होता...बाजुची पॅकींगची टेप निघालेली होती...नीट पाहिल्यावर कळल त्यांनी शो रुमचा लुज पीस नवा पीस म्हणुन पाठवला होता...च्यायला मुर्ख समजतात की काय?? डिलीवरी घेउन आलेल्या तो पीस न घेताच त्याला तिथुन पिटाळल अन मी शो रुमला निघालो...सकाळी हसुन स्वागत करणार्‍या सेल्समन आता मात्र त्रासिक मुद्रेने.... काय झाल??? डिलीवरी मिळाली ना??? मी शक्य तितक्या सबुरीने त्याला सगळ रामायण सांगितल....ते ऐकुन त्याने त्याच्या मॅनेजरला बोलावुन आम्हाला त्याच्याकडे स्वाधीन करुन कल्टी मारली...मी आपला तेवढ्याच कळकळीने झालेला प्रकार सांगितला...तर यावर अस होण शक्य नाही आम्ही नवीनच पीस दिला आहे...इ..इ..सुरु केल...शेवटी वाद नको म्हणुन मी आपली माघार घेतली अन त्याला म्हणल मला हा पीस नको दुसरा द्या...तब्बल अर्धा तास वाट पाहिल्यावर तो परत आला....आज दुसरा पीस देण काही शक्य नाही...उद्या नक्की देतो..चला एका रात्रीने काय फ़रक पडणार आहे असा विचार करुन मी तिथुन निघालो.

आता दिवस दुसरा....दुपार पर्यंत विजय सेल्स कडुन काहीच संपर्क झाला नाही...म्हणुन मग मीच त्या मॅनेजरला फ़ोन केला...एका तासात डिलीवरी नक्की मिळेल..काळजी नका करु...पाठवतो म्हणजे पाठवतो... टिपीकल बोलबच्चन टाकला...मी आपला बर बाबा ठीक आहे...दुसर काय करणार... अडला हरी गाढवाचे पाय धरी...एका तासाचे दोन तासात झाले तरी घरी डिलीवरी पोहचली नव्हती...या दरम्यान त्याला खुपदा फ़ोन केला पण त्याने काही अटेंड केला नाही....त्यात हाफ़िसात नेमका मेजर प्रॉब्लेम आला...मग अजुनच चिड चिड होत होती....अखेरीस सहाच्या दरम्यान त्यानेच फ़ोन केला....तुमची डिलीवरी पाठवत आहे...नवीन पीस आहे...व्यवस्थित पाहुन घ्या...मी हाफ़िसात अडकलो होतो त्यामुळे ठीक आहे अस जुजबी उत्तर देउन फ़ोन बंद केला..घरी फ़ोन करुन मावसभावाला टी.वी. व्यवस्थित पाहुन घे अस बजावुन मी आपला कामाला जुंपलो....हाफ़िसातलं काम संपवुन घरी निघालो तोच भावाचा फ़ोन आला आज पण कालचा पीस परत पाठवला आहे.... हे ऐकल्यावर मात्र संयम संपला त्याला तो पीस परत कर घेउ नकोस अस सांगुन मी थेट विजय सेल्स गाठल...ह्यांच्याशी आता सौजन्य सोडुनच बोलाव लागणार होत...मनातल्या मनात सगळ्या शिव्यांची रिवीजन केली..

दुकानात घुसल्याबरोबर मॅनेजरला गाठल....अन जे सुरु झालो की बस्स....क्षणात सगळ स्टोअर माझ्या बाजुने गोळा झाल होतं (राउंड टेबल झाल होत...मध्ये फ़क्त मी अन तो मॅनेजर होतो)...मी हाफ़िसाचा सगळा वैताग त्याच्यावर काढत होतो...हे किडमड काय बोलु शकतो??....एकदम पप्पु आहे...असा त्याचा समज होता...पण जेव्हा त्याने माझा तो रुद्रावतार पाहिला तेव्हा त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता...सोबत आलेला मित्र मला थांबवत होता...तो काय म्हणतोय ते तर ऐकुन घे....पण मी काहीच ऐकण्याच्या मनस्थिती मध्ये नव्हतो....मी आपला सुरुच होतो...शेवटी मित्राने मला बाजुला घेतल म्हणाला अरे थोडा शांत हो...तो काय म्हणतोय ते तरी बघु....मी केलेल्या राड्याचा योग्य तो परीणाम साधला गेला होता...आता सगळे सुतासारखे सरळ झाले होते...झालेली चुक मान्य करुन उद्याचा दिवस द्या ...उद्या तुम्हाला नवीन पॅक पीस देतो..तो नाही आवडला तर रिफ़ंड देईल या अटीवर मी तिथुन निघालो....जाम डोक दुखत होत....बाहेर पडल्याबरोबर जवळच्याच अमृततुल्य मध्ये चहा मारला.

तिसर्‍या दिवशी मी आज पुन्हा राडा करायचा अन पैसे परत घ्यायचे याची पुर्ण तयारी केली होती....संध्याकाळी हाफ़िसातुन थेट स्टॊअरवर पोहचलो....आज स्वागत मात्र अगदी सौजन्याने झाल...स्टोअर मधील सगळ्यांच्या नजरा माझ्यावर खिळल्या होत्या....अरे हा तो कालचाच रे...आता आज हा काय करतोय याकडेच लक्ष होत.....मॅनेजरने मला आलेला नवीन पीस दाखवला...आज मात्र अगदी नवीन अन व्यवस्थीत पीस होता....तो पाहिल्यानंतर मग खुष झालो.

पुन्हा व्यवस्थित पॅक करुन स्वतःच डिलीवरी घेउन आलो....तिथुन निघल्यावर तो मॅनेजर मला बाहेर पर्यंत सोडवायला आला...परत काही खरेदी करायच असेल तर अगदी निश्चिंत या...मी  म्हणल "घंटा" (मनात)

यातुन एक धडा घेतला जास्त सौजन्य दाखवल तर हे गेंडा कातडी लोक तुम्हाला दाद देणार नाही....अरे ला कारे केल की आपोआप वठणीवर येतात....कदाचित त्यांना खळ्ळ-फ़ट्याक ची भाषा अवगत असल्यामुळे सौजन्याचं अपचन होत असेल.

27 comments:

संगमनाथ खराडे said...

या असल्या लोकांची संख्या वाढत आहे म्हणून तर राज ठाकरे जन्माला येतो...!!!

लिखाण उत्तम, वाचताना मज्जा आली....:)

हेरंब said...

यवगेश दोन्ही हातात तलवारी घेऊन चौफेर हल्ले करतोय आणि गनीम जागच्याजागी गतप्राण होतोय असं दृश्य दिसलं. शेवटी तोफांचे आवाज कानी पडल्यावरच (वाचा टीव्हीच बॉक्स हाती पडल्यावरच) तलवार म्यान झाली.. ;)

अशांना खळ्ळ-फ़ट्याक हेच उत्तर :)

sanket said...

बरोब्बर बोललात. अशांना अशीच वागणूक हवी. हे दुकानाचं नाव लक्षात ठेवावं लागणार आहे.
सही लिहीलं आहे. मज्जा आली.

THEPROPHET said...

हे साले असलेच...आपल्यासारख्या पापभीरू माणसाचा गेम करायला जातात!
शेवटचा "घंटानाद" प्रचंड आवडला! :D

अपर्णा said...

kasale genda katadi loka aahe na??? Western country kadun aapan sarva shiky pan customer service, return policy etc aajabat nay.....

pan on a lighter note, post madhe pan solid sutala aahes yomya tu.......:)

ani ho navin TV changala chalawa hi sadicha....:)

भानस said...

योमू, ब्येस इंगा दाखवलास की. या लोकांशी सौजन्य सप्ताह काही उपयोगाचा नाही. एकदा का पैसे हातात पडले की गिर्‍हाईकाला फाट्यावर मारणारी टोळी आहे ही. ठोशास ठोसा मारत नाही तोवर वटणीवर येतच नाहीत. शाब्बास.

पोस्ट झकास. मलाही जरा खुमखुमी आलीये. आता कोणाशी वाद घालू बरं... :D

सचिन उथळे-पाटील said...

खळ्ळ फटाक.........


योगेश्वरा पण तुझे आणि मनेजर चे संवाद नक्की काय झाले ते कळल असत तर आम्ही पण अशीच तयारी करू.

Narendra prabhu said...

उद्धटाशी उद्धटच वागलं पाहिजे, सौजन्याने नाही हे तेच लोक आपल्याला शिकवतात. विजय सेल्सवाले सोनी टिव्ही विकण्याबाबत उत्सूक नसतात. डेल लॅपटॉपचं ही तसच आहे. असो चांगलाच इंगा दाखवलात.मस्त.

स्वप्ना said...

म्हणूनच सुरुवातीपासूनच माज दाखवायचा.....आपण खरेदी करतो म्हणून त्यांचा धंदा चालतो....हे आपल्या वागण्यातून त्यांना जाणवून द्यायचं......तरच आपल काम नीट होत.....
चला पण या निमित्ताने एक धडा तुम्हीही घेतलास आणि तमाम वाचकांना पण मिळाला........

Anonymous said...

चांगलीच वाजवलेली दिसते. आवश्यक आहे असंच वागणं..

Yogesh said...

@संगमनाथ...ब्लॉगवर स्वागत...प्रतिक्रियेबद्दल आभार.

Yogesh said...

हेरंबा...खी...खी...खी...धन्यवाद...जाम वैताग आला होता..मग दुसर काय करणार रे..

Yogesh said...

संकेत ब्लॉगवर स्वागत...चुकुनसुद्धा विजय सेल्सची पायरी चढु नको रे बाबा...एकदम वाईट अनुभव आलाय मला..

Yogesh said...

विभि बरोबर बोललास...त्यांना वाटल मी काही बोलणार नाही...गप गुमान देतील तो पीस घेईन...पण त्यांना काय माहित मी किती अवली आहे तो.. :) :)

Yogesh said...

अपर्णा...अरे खुप निर्लज्ज लोक आहेत ते...खोट बोला पण रेटुन बोला...असच वागण होत त्यांच...जेव्हा त्यांना जाणवल की हा माणुस माघार घेत नाही मग थोडे नरमले...मी जर सरळमार्गी वागलो असतो तर त्यांनी काहीच दाद दिली नसती.

Yogesh said...

श्री ताई...्भांडण करायच आहे काय...विजय सेल्स मधुन छोटीशी काही तरी खरेदी कर...तुला आपोपाप कारण देतील ते.. :) :)

Yogesh said...

सपा....तो संवाद खाजगीत सांगेल रे...ब्लॉगवर टाकला असते पण.......समजुन घे रे ...

Yogesh said...

नरेंद्र काका....ब्लॉगवर आपल स्वागत....सोनी मध्ये त्यांना कमीशन कमी मिळत असेल ना त्यामुळे ते विकत नाही...

Yogesh said...

स्वप्ना...ब्लॉगवर स्वागत व प्रतिक्रियेबद्दल आभार.

Yogesh said...

महेंद्र काका...हो चांगलीच वाजवली त्यांची... :) :)

Anonymous said...

हया लोकांना हीच भाषा समजते रे...पण हे लिहल छान आहेस, एकदम खुसखुशीत...

सागर said...

मी पण हेच करतो ...अन असाच कराव .
लिहिलास छान .रागीट योमू डोळ्यासमोर आला

Yogesh said...
This comment has been removed by the author.
Yogesh said...

देवा...धन्यवाद रे..

Yogesh said...

साबा ... :) :)

Anuja Khaire said...

Great Post!!मलाही अशा प्रकारचा अनुभव आला होता.. शांतपणे सांगुन, सौजन्याने वागुन काही कामं होतच नाहीत (काही लोक ऐकत नाहित!)अतिशय परिणामकारक पद्धतीने लिहीलं आहे!

मीनल said...

काय निर्लज्ज लोकं आहेत (ते दुकानवाले), सरळ बोललेली भाषा यांच्या लक्षात येत नाही.
बरोबर केलंस, त्यांना ओरडलास ते!