खा...खा..खादुवासी!!

 माथा टीप: सदर लिखाण हे केवळ काल्पनिक आहे. यातील व्यक्तींचा जिवंत,मृत,तृप्त,  अ-तृप्त अश्या कोणत्याही व्यक्तीमत्वांशी दुरान्वये संबंध नाही. तस असल्यास तो केवळ योगा योग समजावा.


संपुर्ण जगाला एका नवीन जमातीच्या शोधाने अचंबीत केल आहे.या जमातीमधील मानव सदृश्य व्यक्तींच वैशिष्ट म्हणजे यांची "पचन शक्ती".या जमाती मधील व्यक्तींच्या पचन शक्तीने संपुर्ण जगातील शास्त्रज्ञ अचंबीत झाले आहेत.ही जमात  दृश्य व अदृश्य,घन,द्रव,वायु,नैसर्गिक,कृत्रिम कोणत्याही प्रकारच्या वस्तु खाउ शकतात.यांना खाण्यासाठी कोणत्याही प्रकारच पथ्य नाही. त्याहुन महत्वाच म्हणजे त्या अतिशय उत्तमरित्या पचवु शकतात.या जमातीला बद्ध्कोष्टता,अपचन इ. रोग की जे पचनाशी संबधीत आहे याचा कोणताही प्रकारचा त्रास होत नाही.

ही जमात प्रामुख्याने आशिया खंडातील "भारत" देशी सापडते.या जमातीमधील व्यक्तींना ओळखण्याची सर्वात सोपी खुण म्हणजे यांच्या चेहर्‍यावरील साळसुदपणाचा भाव.ह्या जमातीमधील लोक भारत देशातील काना कोपर्‍यात आढळतात.उदारनिर्वाहासाठी यांचा मुख्य व्यवसाय म्हणजे "समाजसेवा".समाजसेवेच्या माध्यमातुन ते इतर समुदायातील लोकांच प्रतिनिधीत्व करुन स्वतःच व कुटुंबाच पोट भरतात."एका मेका सहाय्य करु अवघे धरु सुपंथ" या उक्ती प्रमाणे या समुदायातील लोक एकमेकांना सतत सहकार्य करत आयुष्य कंठीत असतात.महाभारतात ज्याप्रमाणे अर्जुनाला लक्ष्य भेद करताना फ़क्त पोपटाचा डोळा दिसत होता अगदी त्याप्रमाणेच यांना हे जिथे जातील तिथे फ़क्त त्यांच "खाणे"एवढच एक लक्ष्य असतं.जगातील शास्त्रज्ञानी या जमातीला "खादुवासी" असे नामकरण केले आहे.या जमातीमधील तीन प्रतिनिधींचा जगभरातील शास्त्रज्ञानी प्रातिनिधीक संशोधनपर अभ्यास केला त्याचा तपशील खालील प्रमाणे.

सर्वप्रथम अभ्यास केलेला प्रतिनिधी सध्या खेळाच्या माध्यमातुन समाजाची सेवा करतो.अत्यंत साध राहणीमान,चेहर्‍यावर तोच गरीबपणाचा साळसुद भाव.अन इतका गरीब की दाढी करावयास सुद्धा सध्याच्या महागाइच्या काळात याला परवडत नाही.याच्या उर्ध्व ढेकराच्या गंधाचा (सहसा खाउन झाल्यानंतर ही जमात कधीच उर्ध्व किंवा अर्ध्व ढेकर देत नाही कधी तरी चुकुन सापडले जातात) नमुना तपासला असता त्यामध्ये खेळाची मैदाने,खेळासाठी लागणारी साधने,सुविधा अश्या खुप सार्‍या गोष्टी आढळल्या.अजुन दीर्घ तपास केला असता बी.आर.टी. नावाचा एक संपुर्ण प्रकल्प, रस्ते, उड्डाण पुल अस खुप काही आढळल.पण सदर प्रतिनिधी ने हे सर्व थोतांड असुन आपण अस काही खाल्लच नाही असा दावा केला आहे.

यानंतरचा प्रतिनिधी हा "विहार" या अत्यंत गरीब प्रदेशातुन आलेला होता.अतिशय गोंडस अन मिश्कील अस हे व्यक्तीमत्व.नावाजलेल्या संस्थांमधुन हे व्यवस्थापनाचे धडे देतात.यांच्या उर्ध्व ढेकरातुन गुरांच्या चार्‍याचा अगदी घमघमाट होता की शास्त्रज्ञाना त्याचा अभ्यास करण सुद्धा अवघड झाल.चार्‍यासारखी गोष्ट पचवण्यासाठी हे नक्की काय करतात हे मात्र एक गुढच राहिल आहे.यांच्या अभ्यासाठी गेलेले शास्त्रज्ञ हे सध्या "म्हशी व त्यांचे कुटुंबनियोजन" यावरील संशोधनात व्यग्र असल्याने हा तपशील नेहमीप्रमाणे अपुर्ण राहिला.

सर्वात शेवटी आलेल्या व्यक्तीमत्वाचा अभ्यास करताना शास्त्रज्ञांच्या कौशल्याचा कस लागला.गरीब शेतकरी कुटुंबातील सर्वांचा "जाणता राजा" असलेला, गोर गरीब जनतेचा कैवारी, भाग्यविधाता....अस खुप काही.अत्यंत शांत,मृदु,मितभाषी....न बोलताच आपला पराक्रम गाजवणारा.यांच्या मनात काय चालु आहे कोणीच अगदी स्वतः ते पण सांगु शकत नाही.यांचा अभ्यास जेव्हा चालु केला तेव्हा शास्त्रज्ञांपुढे अभ्यास कसा करावा हा यक्ष प्रश्न होता. कारण हे खातात कधी हे समजतच नाही,कोणत्याही प्रकारचा अर्ध्व किंवा उर्ध्व ढेकरही देत नाही.फ़क्त हे खात आहेत हे जाणवत...त्याचा आभास होतो. यांनी खाल्लय हे साक्षात ब्रम्हदेव जरी आला तरी त्याला सिद्ध करण अशक्य आहे.या समाजसेवेचं अनुग्रह त्यांनी त्यांच्या सर्व क्षेत्रातील शिष्यांना दिला आहे. शिक्षण,बांधकाम,आरोग्य,उद्योग,शेती,खेळ (सर्व प्रकारचे मैदानी व बैठे) या सगळ्या क्षेत्रात यांचे अनुयायी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत.सगळीकडेच यांच्या खाण्याचा अदृश्य असा अस्तित्वाचा ठसा आहे.

सरतेशेवटी यांच्या अभ्यासासाठी शास्त्रज्ञानी नवीन प्रगत अशा तंत्राच्या साहय्याने नवीन यंत्र तयार केल की ज्या द्वारे यांनी काय काय खाल्लय हे पाहता येउ शकत होत.हे यंत्र जेव्हा या "साहेबां"ना लावल तेव्हा क्षणातच संगणकावरील सर्व गुप्तनीय माहिती गायब झाली व संगणकाच्या पडद्यावर काळोखाच्या पार्श्वभुमीवर "Permanat Error" चा संदेश झळकला.

यानंतर सर्व शास्त्रज्ञ बेशुध्द व "साहेब" व्यक्तीमत्व गालातल्या गालत स्मित हास्य करत होत!!!

11 comments:

हेरंब said...

यवगेशा, कसलं भन्नाट लिहिलं आहेस !!!!!!

जाम आवडलं.. बेष्ट वर्णन.. प्रत्येक परिच्छेदाच्या पहिल्या ओळीतच ते ते साळसूद दिसणारे चेहरे उभे राहिले डोळ्यापुढे !!

माथा टीप भन्नाट आहे.. तृप्त, अतृप्त ... हा हा हा हा

रोहन... said...

आधी वाटले अस्सल खाण्यावर म्हणजे खादाडी वर पोस्ट आहे... पण हे तर खादुगिरी वर निघाले. अर्थात समाजसेवा करून ते करण्यात धन्यता मांडणार्या सर्वच अतृप्त लोकांना कायमचे 'वर' पाठवून दिले पाहिजे... :)

भानस said...

जबरीच रे.मलाही आधी वाटले की काहीतरी आम्हाला जळवायला टाकले आहेस. पण ही तर जगन्मान्य समाजसेवी खादुगिरी... वाटून खातात हं का पण. उगाच कैच्याकाई आरोप नाय करायचे बरं का.:P

गरीब शेतकरी कुटुंबातील सर्वांचा "जाणता राजा"..... स्पेशली हे तर एकदम पटेश.:D आणि विहारवासीयांची तर बातच और...

Yogesh said...

हेरंबा...धन्यु रे!!

Yogesh said...

सर्वच अतृप्त लोकांना कायमचे 'वर' पाठवून दिले पाहिजे... +१

रोहणा...अगदी सहमत!!

Yogesh said...

श्री ताइ...ठांकु!! :) :)

THEPROPHET said...

जबराट भावा! मस्तच झालीये पोस्ट!

Yogesh said...

विभि...धन्यु रे!!

आनंद पत्रे said...

आयला जबरी! एकदम बेस!

सौरभ said...

जब्बरदस्त... चांगलेच शालजोडीतले फटके दिलेत.

Yogesh said...

सौरभ....स्वागत व प्रतिक्रियेबद्दल आभार.

आप...धन्यवाद.