कुलाचार,कुलधर्म,कुलदैवत या सर्व प्रकारांशी लग्नापुर्वी दुर दुर पर्यंत संबंध नव्हता.गुरुवारी "स्वामी समर्थ मठ" सोडला तर बाकी इतर कोणत्याच ठिकाणी मी काही फ़िरकत नाही.आइ बाबा जातात म्हणुन प्रत्येक नवरात्रात निमगिरी ला आमच्या कुलदेवीला जायचो.ते पण मला तो परीसर खुप आवडतो म्हणुन अन सर्वात महत्वाच म्हणजे घरचे सर्व जण एकत्र असतात त्यामुळे मस्त मजा येते.तुळजापुर, जेजुरी इथे लहानपणी कधी तरी गेल्याच आठवतय.
लग्नानंतर कुलधर्माप्रमाणे जेजुरी इथ जाण क्रमप्राप्त होत.आपण फ़क्त जेजुरी ला न जाता कडेपठारला पण जाउ या असा प्लॅन झाला.ठरल्याप्रमाणे पहाटे घरुन जेजुरीच्या दिशेने प्रयाण केल.सकाळी लवकरच आम्ही कर्हा नदीवर पोहचलो.स्वागताला पार्किंगची पावती घेउन उभा होता.
मी : हे पार्किंग देवस्थानच की सरकारच?
तो: हे खाजगी पार्किंग आहे.
मी: अरे पण हे तर नदी पात्र खाजगी कस?
तो:(च्यायला लय शहाण दिसतय...मनात) ओ तुम्हाला जायच असेल तर पावती फ़ाडावी लागेल नाही तर जाता येणार नाही.
एकंदरीत सर्वांचा राग रंग पाहुन गुपचुप पावती फ़ाडली.प्रश्न पैश्यांचा नव्हता पण याला फ़ुकट पैसे का द्यायचे हा होता.असो गरजवंताला अक्कल नसते.
नदी पात्रात अन परीसरात घाणीच साम्राज्य होत.प्रचंड प्रदुषण होत.अश्या पाण्यात आंघोळ करावी लागणार होती.बिलकुल चिडचिड न करता त्यातल्या त्यात बर्यापैकी स्वच्छ असणारी जागा शोधुन आंघोळ उरकुन घेतली.त्यानंतर लगेच गोंधळी तयारच होता ठरलेली पुजा, नैवेद्य इ. सोपस्कार उरकुन घेतले.आता वेळ आली दक्षिणा द्यायची.मी आपले रु.१०१ काढुन ठेवले (मला तर ते ही जास्त वाटत होते) पण रु.५०१ च्या कमी घ्यायला काही तयार होइना.त्याच गिर्हाइक वाढत होत त्यामुळ त्याला घाइ होती. "अहो भाउ लग्न एकदाच होत. ५०० नी तुम्हाला काय फ़रक पडणार आहे.खंडोबाच्या नावानं द्या की"..अस म्हणत त्यान मोर्चा बायकोकडे वळवला "अवो वहिनी तुम्ही सांगा की ऐकतील तुमच"....च्यामारी लय वांड दिसतय..(मनातल्या मनात)...चल घे बाबा ५०१ तर ५०१...अस म्हणुन ५०० ची नोट त्याच्या हातावर टेकवली...(घे लग्न करायची खुप हौस होती ना..अस उगीच कोणी तरी म्हणल्याचा मला भास झाला)
आता आम्ही कडेपठारच्या दिशेने निघालो.पायथ्याशी पोहचल्यावर कडेपठार पाहुनच खुप दमछाक होणार याचा अंदाज आला होता.आम्ही सर्व जण मस्त मजा करत हळु हळु गड चढायला सुरुवात केली उन्हाळा असल्यामुळे सकाळच्या कोवळ्या उन्हात पण त्याची तीव्रता भासत होती.नवीन लग्नाची जोडी म्हणुन आजु बाजुची जनता आमच्याकडे नवलाइने पाहत होती.मजल दरमजल करत आम्ही अखेर गडावर पोहचलो.गडाचा परीसर,मंद थंडगार वारा याने सगळा थकवा आपोआप गळुन गेला.थोडा वेळ आराम करुन मग आम्ही पुजेसाठी मंदीरात निघालो.मंदीर खुप सुंदर आहे.दीपमाळ, जुनं दगडी बांधकाम तर निव्वळ अप्रतिम आहे.
आम्ही जोडीने आत मध्ये प्रवेश करताच एखाद्या शिकार्याला सावज सापडल्यानंतर जसा आनंद होतो तसा काहीसा भाव मला तिथल्या पुजार्यांच्या चेहर्यावर वाटला.इथे पण आपल्याला कापणार आहेत याची मला नकळत जाणीव झाली.नवपरीणीत जोडप्यांसाठी असणारी पुजा अगदी सराइतपणे त्याने उरकुन घेतली.पुजा काय केली हे मात्र काही समजल नाही.तो काही तरी मंत्र पुटपुटत होता...काय ते त्यालाच त्याच माहित.(मी मंदीराच अंतर्गत बांधकाम न्याहळ्याणतच गुंग होतो अधे मधे तो काही तरी मंत्र बोलायला लावायचा तेवढे फ़क्त म्हणायचो) अखेरीस पुजेचे सोपस्कार पार पडले नेहमीप्रमाणे दक्षिणा देण्याची वेळ आली.मी पैसे देण्याअगोदरच त्याने रु.१००० ची मागणी केली. मी ऐकुनच हादरलो ...याने १००० रुपये देण्याइतपत अशी पुजा केली तरी काय? नेहमीप्रमाणेच मी आपला वाद विवादाला सुरुवात केली.शेवटी कसा बसा तो ५००वर तयार झाला.(च्यायला ४ वर्ष इंजिनिअरिंग करण्या पेक्षा पुजारी झालो असतो तर बर झाल असत.)
आता कडेपठार वरुनच जेजुरी गडावर जायच होत.अंतर खुप होत.जेजुरी गडावर जाइपर्यंत खुप दमछाक होणार होती.त्यात भाची कडेवर होती त्यामुळे हळु हळु चालाव लागत होत.शेवटी एकदाच जेजुरी गडावर पोहचलो.लग्न सराइ असल्यामुळे दर्शनासाठी प्रचंड गर्दी होती.रांगेत उभ राहिलो तर दर्शनासाठी ३ ते ४तास लागणार होते.त्यामुळे दर्शन पासाची काही सोय आहे का हे पाहयला गेलो.अवघ्या प्रत्येकी ५० रुपयात फ़क्त तीन मिनीटात दर्शन अस ट्रस्टच्या वतीने लावलेल्या बुथवर एकजण बोंब ठोकत होता.पटकन दर्शन होइल या अपेक्षेने मी आम्हा सर्वांचे पास काढले अन मंदीरात आत मध्ये गेलो तिथे पाहिल तर
पास असणार्यांसाठी वेगळी अशी रांग नव्हती.दर्शन रांग अन पास असणारे यांची सामाइकच रांग होती.तिथे असणार्या पुजार्याला या संदर्भात विचारल तर तो म्हणाला पास हा देवस्थान ट्रस्टचा आहे त्याच्याशी आमचा काही एक संबंध नाही तुम्हाला तक्रार करायची असेल तर ट्रस्टच्या कार्यालयात जा.शेवटी तब्बल अर्धा तास वाट पाहिल्यानंतर प्रचंड रेटा रेटीतुन आमचा नंबर आला.नवपरिणीत जोड्यांसाठी तिथे असणार्या पुजार्याने आम्हा दोघांना बाजुला घेउन कसली तरी पुजा केली, नाव घ्यायला लावली अन १०००रुपये दक्षिणा घेतली.तिथे वाद घालण्याची काही संधीच नव्हती कारण येणार्या प्रत्येक नव्या जोडप्याकडुन ते अश्याच रितीने पैसे घेत होते.ती पुजा आटोपुन निघतोय तोच अजुन एका पुजार्याने पकडले अभिषेक करावा लागतो म्हणुन त्याने ५००रुपये (इथे पण त्याने अभिषेकाचे रेट सांगितले होते...५०० हा सर्वात कमी रेट.) घेतले.ह्या लोकांची पद्धत अशी काही आहे की ते नवख्या लोकांना बचावाची काही संधीच देत नाही.
आतील दर्शन पुर्ण करुन बाहेर जात होतो तर तिथेच अजुन एक पुजारी भेटला, अहो बाशिंग उतरवल्याशिवाय जाता कुठे इकडे या असा जोरदार आवाज दिला.सुरुवातीला काय बोलतोय काही समजलच नाही.हा नक्की काय म्हणतोय हे पाहण्यासाठी त्याच्या जवळ गेलो.
पुजारी:लग्नात काय बांधल होत? मुंडावळी की बाशिंग
मी: बाशिंग
पुजारी: मग तुम्हाला बाशिंग उतरावयला लागेल.
मी: ते गृहप्रवेश झाल्यावरच उतरवलय
पुजारी: नाही तस नाही उतरवत ते इथच उतराव लागत.
मी: नाही उतरवल तर.
पुजारी: सांगितल ना कुलाचाराप्रमाणे ते इथे उतरावच लागत.
कुलाचार म्हणाल्यावर काय बोलणार??? उतरवल इथ बाशिंग (म्हणजे काही तरी पुजा केली...न समजणारे मंत्र म्हणाला) ....पुन्हा ५०० ला चंदन....मनातल्या मनात खुप चरफ़डत होतो पण करणार काय??? हे सार संपवुन झाल बाहेर आलो ...आता तरी सुटलो अस वाटत होत तोच तळी भरायची बाकी आहे..ती भरुन घेउ या...तीर्थरुपांनी आदेश दिला.त्यामुळे तळी भरायल गेलो.तिथे पण सगळीकडे भेटले तशेच तळी भरणारे तयारच होते. तळी भरली...(यांचे आत्ताच दोनाचे चार हात झालेत लवकरच सहा हात होऊ दे...असा आगाउपणा त्याने केला.)तळी,शिदा देणे अस मिळुन याने पण पाचशे घेतले.
अवघ्या काही मिनीटात मी ३५०० हजाराला कापलो गेलो होतो.खर तर या सगळ्या गोष्टींचा संताप येत होता.देवाच्या नावाखाली ढळढळीत लुट चालु होती पण यांना अडवणार कोणीच नव्हत.हाच आमचा खरा धर्म आहे का??एवढे पैसे घेउन पण गडावर सगळा आनंदी आनंद होता.चहु बाजुला प्रदुषण,सुविधांचा अभाव, भिकार्यांचा सुळसुळाट.सगळा भोंगळ कारभार आहे.दुर्दैवाने याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केलेल आहे.
या सगळ्यात मला देव कुठ भेटलाच नाही.मंदीरात गेल्यानंतर मनाला जे समाधान लाभत ते मात्र इथ आल्यावर मी हरवुन बसलो होतो.अस्वस्थ मनानेच जेजुरी सोडल तेव्हा दुरवर डोंगरावर गडापासुन दुर माणसापुढे हतबल झालेला खंडोबा आपल्या परीवारासह आराम करत असल्याचा भास झाला.
सोन्याने मढवलेला किंवा पैश्यांचा बाजार मांडलेला देव मला खुप दीन दुबळा वाटतो.शिर्डी किंवा तिरुपती यापेक्षा गडावर असलेल्या छोट्याश्या मंदीरात असणारा देवच मला भावतो.तिथल्या वातावरणातच मला जास्त समाधान लाभत.