मुस्कान...

मुस्कान....टपोरे डोळे...गोरी पान...चेहर्‍यावर अतिशय गोड हसु... अवघी ९ वर्षाची चिमुरडी.. अगदी बाहुली सारखी.. पाहिल्याबरोबर कोणीही प्रेमात पडेल इतकी गोड...परवाच्या दिवशी लिलावती हॉस्पीटलमध्ये भेटली.पोटाचा कॅन्सर झाल्यामुळे त्यावरील उपचार सध्या तिथे चालु आहे...अवघ्या काही महिन्यांची सोबती आहे.

सतत काही ना काही बडबडत असते. पुर्ण वॉर्डमध्ये सर्वांसोबत काही ना काही गप्पा चालु असतात.प्रत्येक नर्स, वॉर्ड बॉयला हुकुम सोडत असते.एका हाताला टोचलेल्या सुया तश्याच घेउन सगळीकडे फ़िरत असते. आपल्याला काही तरी असाध्य असा रोग झालाय याची तिळमात्रही कल्पना नसलेली...स्वतःच्या एक वेगळ्या अश्या विश्वात रमलेली...प्रत्येकाच्याच चेहर्‍यावर काही क्षण का होइना सर्व दुःख विसरायला लावुन "आनंद" देणारी ही मुस्कान.

आपण काही महिन्यांचेच सोबती आहोत याची तिला कल्पना सुद्धा नाही...जीवन म्हणजे काय अन मृत्यु म्हणजे काय??हे समजण्या्चही तिच वय नाही. अश्या वयातच तिच्या नशिबी हे भोग आले आहेत.तिची आइ हे सार दुःख पचवुन ही उभी आहे.कारण बाप नसलेल्या मुस्कान ला फ़क्त तिचाच काय तो आधार आहे.
परवाच्या रात्री तिला रक्ताच्या बॉटल अन इंजेक्शन देताना पाहिल अन मन अगदी सुन्न झाल.तिच्या छोटुकल्या हातांवर जेव्हा सुया टोचत होते तेव्हा मनाला असंख्य अश्या वेदना होत होत्या.मी नाही पाहु शकलो हे सार....तिथुन उठुन थेट बाहेर येउन बसलो ते असंख्य अशे प्रश्न घेउनच की ज्यांची उत्तर मला कधीच मिळणार नाहीत.


ती संपुर्ण रात्र मी खुर्चीवर बसुन काढली...चेहर्‍यावर समोर फ़क्त मुस्कानचाच चेहरा होता...सकाळी  तिच्या चेहर्‍यावर असणार गोड हसु उपचारादरम्यान अगदी कोमेजुन गेल होत.

तिला डेअरी मिल्क खुप आवडत म्हणुन दुसर्‍या दिवशी सकाळी कॅडबरी घेउन आलो. तिला जेव्हा ती कॅडबरी दिली तेव्हा ती इतकी आनंदी झाली की बस्स....एका छोट्याश्या कॅडबरीतही एवढा आनंद सामावलेला असतो हे मला तेव्हाच समजला.जगातला सर्वात मोठ सुख मिळाल्याचा आनंद होता तो....त्या एका क्षणाने मी अंतःर्मुख झालो.
तिच्या अगदी समोरच्याच बेडवर एक अंदाजे ८०-८५ वर्षांचे आजोबा अगदी जर्जर अवस्थेत पडले होते.प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना दुसर्‍यावर अवलंबुन राहव लागत होत.होणार्‍या प्रत्येक वेदना त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडच्या होत्या.पडल्या जागीच ते हे सर्व सहन करत होते. समोरच त्यांच्या ह्या वेदना अन त्यांची ही अवस्था पाहणारा त्यांचा हतबल असा मुलगा होता.
हे किती विचित्र आहे ना. . . . जिला आयुष्याचा अर्थ पण समजला नाही किंवा अजुन आयुष्य जगल पण नाही अशी मुस्कान अजुन जगायला मिळाव म्हणुन मृत्युशी लढते आहे कदाचित यात लवकरच तिची हार होणार आहे न दुसरीकडे मनसोक् युष्य जगलेले आजोबा आहेत की ज्यांना आजाराच्या वेदना असह्य होऊन ते मृत्युची वाट पाहत आहेत पण तो काही येत नाही.
हे अस का असत???
खरच ह्या विश्वात देवाच अस्तित्व आहे का???
असेल तर तो असा न्याय का करतो???

तिकोना ट्रेक...

सिंहगड,विसापुर मागच्या वेळी असे दोन्ही पण ट्रेक चुकले होते त्यामुळे ह्या वेळी काही करुन जायचचं असं ठरवल होत.ट्रेकला शनिवारी की रविवारी जायचच यावरुन मतदान झाल त्यात शनिवारला (२५ सप्टे.)बहुमत मिळाल.इथेच मोठी गोची झाली कारण २५ ला मला सुट्टी नव्हती त्यामुळे सुट्टीसाठी काहीतरी जुगाड कराव लागणार होतं.सुदैवाने तस झाल पण सुट्टी मिळुन गेली. पण तरीही काही तरी काम निघुन ऐनवेळी  हाफ़िसला जाव लागल तर?? अजुन काही अडचण झाली तर?? एक ना अनेक अश्या खुप शंका मनात येत होत्या.

पुण्याहुन येणारे आम्ही पाच लोक होतो त्यामुळे गाडी करुन जाउ या अस अगोदर ठरल होत परंतु गाडी पेक्षा बाईकवर जाणं जास्त सोयीच राहिल त्यामुळे मी अन सागर. अनिकेत, अभिजीत अन विकास अशे पाच जण मिळुन तीन बाईकवर जाउ या अस ठरल.

आता महत्वाच काम म्हणजे बाईक शोधायच ती जबाबदारी सागर सदगुणी मुलावर दिली.भरपुर प्रयत्न करुनही त्याला बाईक मिळाली नाही.तरी पण पठ्ठ्याने प्रयत्न सोडले नव्हते....शुक्रवारी रात्री मी साधारण ८.३० ला या सासमु ला फ़ोन केला तेव्हा आमचा झालेला संवाद असा..
मी: अरे काय झाल...मिळाली का बाईक??
सासमु: नाही रे...मित्राची बाइक नाही मिळत आहे.
मी: बर ठीक आहे...आपण स्कुटीवर जाउ रे...टेन्शन घेउ नकोस
सासमु: चालेल...बघु रात्री १२ वाजता मी मित्राकडे जाउन येतो...त्याने दिली तर बघु या.
(आता रात्री १२ ला कोणत्या मित्राकडे गेला होता हे विचारु नका...तो सदगुणी आहे)
मी:वक्के...फ़क्त मला तस कळव.

एकुणच रागरंग पाहुन मी स्कुटीवर जाव लागणार याची तयारी सुरु केली...अपेक्षेप्रमाणेच सासमु चा सकाळी ६.३० ला समस आला बाईक मिळाली नाही तुझी स्कुटी घेऊन ये...आपण स्कुटीवरच जाउ या....त्याला ७.१५ला वाकडला पोहच असा रिप्लाय धाडुन दिला.

मी साधारण ७.४५ ला वाकडला पोहचलो तत्पुर्वीच अनिकेत आणि मंडळी पोहचली होती.मला उशीर होण्याच कारण म्हणजे...वारजेच्या पुलावरुन थोड पुढे आल्यानंतर भटक्या वाजला म्हणुन रस्त्याच्या कडेला थांबलो होतो तोच तिथे एक काका पाठीमागुन आले...त्यांच्या बाईकमधील पेट्रोल संपल होतं..एकंदरीत त्यांची अवस्था पाहुन बर्‍याच दुरुन गाडी ढकलत आले आहेत अस दिसत होत...त्यांना थोड पेट्रोल हव होत...मी टाकी नुकतीच संपुर्ण भरली होती त्यामुळे मला पेट्रोल द्यायला काहीच अडचण नव्हती पण स्कुटीमधुन पेट्रोल काढायच कस हाच प्रश्न होता...थोडा फ़ार प्रयत्न केला पण यश काही मिळाल नाही...मलाही वेळ होत होता त्यामुळे त्यांनी तु जा मी बघतो अस म्हणल्यावर मी तिथुन निघालो....वाकडला पोहचलो तर सासमु सोडुन सगळे पोहचले होते. सासमु ला फ़ोन केला तर साहेब अजुनही होस्टेलवरच होते... "अरे तुम्ही पोहचलात काय???तुमच्याच फ़ोनची वाट पाहत होतो...१५ मिनीटे थांबा आलोच मी." अस उत्तर मिळाल्यावर आम्ही समजुन घेतल स्वारी लवकर काही येत नाही त्यामुळे तिथे बाजुलाच गाड्या लावुन आम्ही गप्पा टप्पा चालु केल्या. अखेरीस सासमु आठ वाजता पोहचला....त्यानंतर आम्ही कामशेतच्या दिशेने मार्गस्थ झालो.

माझी स्कुटी असल्याने...अनिकेत अन अभिजीत दोघांनाही अगदी निवांत बाइक चालावायला लागत होती.मला वाटत प्रथमतःच त्यांनी महामार्गावर एवढी निवांत बाइक चालवली असेल.आम्ही वाटेत असतानाच सुहासचा "आम्ही लोणावळ्यात नाश्ता करतो अहोत तुम्ही पण नाश्ता करुन घ्या" असा फ़ोन येउन गेला.रस्तामध्ये कुठे चांगले हॉटेल दिसल नाही त्यामुळे थेट कामशेतलाच नाश्ता करण्यासाठी थांबलो..कामशेतमध्ये मी पहिल्यांदाच अशी मिसळ खाल्ली की जी मध्ये मटकी व्यतिरिक्त मसुरची डाळ अन हरभरे होते.असो तिथे आमचा नाश्ता होईपर्यंत मुंबई वरुन येणार्‍यांपैकी महेंद्रकाकांची गाडी पोहचली होती.

महेंद्र काका व सुरेश (अरे आपल ते देवेंद्र) या बझकरांना भेटण्याची ही पहिलीच वेळ...याअगोदर फ़क्त बझवरची ओळख...महेंद्र काका म्हणजे चांगलच वजनदार (भारदस्त) व्यक्तीमत्व आहे ;) मग सेनापतींची गाडी आली...सेनापतींना पण प्रथमच भेटलो...आता राहिलेल्या एका गाडीची वाट पाहत होतो...एकुणच आजचा ट्रेक चांगला धमाल होणार आहे याची जाणीव झाली होती.

 तिसरी गाडी मार्ग चुकली होती त्यामुळे त्यांना घ्यायला मी,अनिकेत व सासमु महामार्गावर जाउन थांबलो.तिसरा ग्रुप आल्यानंतर आम्ही तिकोन्याच्या दिशेने मार्गस्थ झालो.पवनानगर पर्यंत आम्ही अगदी व्यवस्थित पोहचलो...तिथे गेल्यावर सासमुला सुहासला फ़ोन करु रस्ता विचारयला सांगितल अन इथेच गडबड झाली...आता भरकटायची वेळ आमच्या दोघांची होती.पवनानगरच्या थोड पुढे आल्यावर डावीकडे वळुन मग सरळ यायच होत त्याऐवजी आम्ही एकदम सरळ निघालो...धरणापासुन खुप पुढे आलो तरी आम्हाला तिकोना येण्याच काही चिन्ह दिसेना..मला तर प्रत्येक डोंगर तर तिकोनाच आहे की काय असा भास व्हायचा...बराच वेळ झाल्यावर मग जाणवल की आपण रस्ता भरकटलो आहोत.तोपर्यंत सर्वजण तिकोन्याच्या पायथ्याशी पोहचले होते....संपुर्ण रस्त्यावर फ़क्त आम्हीच होतो त्यामुळे रस्ता विचारायचा तरी कोणाला?? थोड अंतर मागे फ़िरल्यावर एक मावशी भेटल्या मग त्यांनी व्यवथित मार्ग सांगितला...आम्हाला पवना ध्ररणाच्या सुरुवातीला परत जावा लागणार होत...शेवटी एकदाच आम्ही तिकोन्याच्या पायथ्याला पोहचलो तोपर्यंत ११.३० झाले होते.
सर्वांची ओळख झाल्यावर रोहन ने सर्व सुचना दिल्या त्यानंतर गडाच्या दिशेने सर्व लोक निघाले.उन भरपुर होत त्यामुळे चांगलीच दमछाक होणार होती.आजुबाजुचे डोंगर हिरवाइने नटले होते....समोरच पवना धरणाचा जलाशय दिसत होता.एकंदरीतच सर्व वातावरण अगदी मस्त होत.फ़ोटोगिरी अन गप्पा टप्पा करत आम्ही सर्वजण गडावर पोहचलो.

एवढ सगळ भटकुन झाल्यावर आता चांगली भुक लागली होती.आता जरा खादाडी सुरु असतानाचे फ़ोटो पहा.
खादाडी झाल्यावर पुन्हा थोड भटकलो अन मग आम्ही परतीच्या मार्गावर निघालो...जाताना अनुजा.देवेंद्र,सुहास यांना मी बकरा मिळालो होतो त्यामुळे चांगलाच टाइमपास झाला.(आता माझा बकरा का झाला व्हता हे म्या आज्याबात सांगणार नाय.)

खाली पोहचलो तर अजुन समस्या आमची वाटच पाहत होती...माझ्या स्कुटीचं मागच चाक पंक्चर झाल होत.पवनानगर शिवाय पंक्चर काढुन मिळणार नव्हत त्यामुळे अंदाजे ५-६ कि.मी.कसरत करुन पोहचायला लागणार होत.पंक्चरच्या दुकानापर्यंचा प्रवास अगदी अविस्मरणीय असा होता.कामशेतला सर्वांसोबत चहा घेउन मग आम्ही पुन्हा पुण्याच्या दिशेला रवाना झालो.सुदैवाने तिथुन परतताना काही अडचण आली नाही.
महेंद्र काका,श्रीताइ,आका,अनुजा, देवेंद्र,सेनापती,सासमु,सपा,सुझे,भामुं यांच्याशी फ़क्त आंजावरच बझ किंवा ब्लॉगच्या माध्यमातुन भेट व्हायची...पण शनिवारी या सर्वांना भेटुन खुप छान वाटल...यांच्यासोबत अजुनही नवीन मित्र मंडळी भेटली.

या ट्रेक मध्ये बझवरील इतर कट्टेकरी हेरंब,विभि,आप,देवकाका,श्रेता,अपर्णा,तन्वी ताय,मीणल यासर्वांना खुप मिस केल.

खरतर खादाडी काय काय केली याचा उल्लेख मी वर केला नाही...पण तो केला नाही तर तुम्हाला सर्वांना खुप वाईट वाटेल त्यामुळे खाली देत आहे.

थेपले,भाकरी,बटाट्याची भाजी,चटणी,बाकरवडी,थालीपीठ,,सामोसे,अळुवडी,मोसंबी,सफ़रचंद,बेसनलाडु.

अरे सर्वात महत्वाच म्हणजे अनुजाने आणलेल टांग....आता ही टांग काय आहे...हे जर मी असच सांगितल तर त्याच महत्व नाय कळणाय त्याच महत्व कळायच असेल तर त्यासाठी पुढ्च्या ट्रेकला याव लागणार.

टीप:
१. पोस्ट खुप घाइत खरडली आहे तवा चु.भु.दे.घे.
२. ब्लॉगर बहुतेक गंडल आहे त्यामुळे फ़ोटु टाकता आले नाहीत. :(

आठवणीतले खेळ -१

रोज मी हाफ़िसातुन घरी येतो त्यावेळी आमच्या सोसायटीमधील बच्चे कंपनी खाली जमलेली असतात (अर्थात मम्मी पण सोबत असतेच) अन क्रिकेट खेळणे किंवा घोळका करुन कसल्या तरी गप्प ठोकत बसणे हेच चालु असत.मी जेव्हा त्या मुलांकडे पाहतो तेव्हा खर तर खुप वाईट वाटत....ते त्यांच बालपण हरवुन बसली आहेत याची प्रकर्षाने जाणीव होती.त्यांचे खेळ,त्यांची मस्ती सार काही कोमेजुन गेलय.....त्यांनी अकाली प्रौढत्व आलय अस वाटत....बालपण कस अवखळ,अल्लड,दंगेखोर असल पाहिजे....योग्य त्या वयात योग्य तेच कराव... (आवरा...आवरा...बाबागिरी सुरु झाली...पोस्ट भरकटते आहे)

त्यांच्याकडे पाहुन मला माझ बालपण आठवल...बालपणीच्या अश्याच काही हरवलेल्या खेळांविषयी खरडणार आहे....की ज्यांची उणीव मला नेहमीच भासते....लहानपणी प्रत्येक खेळाचा एक सिझन असायचा ...जसा मौसम बदलायचा त्याप्रमाणे खेळ पण बदलायचा.

असाच एक प्रचंड आवडीचा खेळ : विट्टी दांडु.
विट्टी-दांडु चा मौसम आला की तयारी चालु व्हायची ती म्हणजे तो तयार करण्यापासुन...आम्ही राहत असलेल्या वाड्यासमोरच लाकडाची वखार होती...तिथले औटी बाबा म्हणजे आमच हक्काच माणुस...फ़क्त त्यांना जाउन सांगायच ...आम्हाला विट्टी दांडु करायचा आहे लाकुड द्या...(म्हणजे अगदी तीर्थरुपांचीच वखार आहे असा अविर्भाव असायचा)...अर्थात हे सगळ चकटफ़ु असायचं...(विट्टी दांडुला लाकुड विकत घ्यायच म्हणजे ही त्या काळात अशक्य वाटणारी कल्पना होती)... त्यानंतर बाळु मिस्त्री होताच....त्याला एवढा त्रास देउन पण बिच्चारा आम्हाला असला भन्नाट विट्टी दांडु करुन द्यायचा की बस्स...तेव्हा तो जगातला सगळ्यात भारी माणुस वाटायचा...

वि्ट्टी दांडु मधील कोली अन रिंगण-रिंगण हे दोन प्रकार आम्ही सर्वात जास्त खेळायचो...रिंगण-रिंगण मध्ये जर एखाद्यावर राज्य तंगला की तो कधी कधी दोन दोन दिवस चालायचा....शाळेत विट्टी दांडु घेउन जायच म्हणजे सर्वात मोठ दिव्य असायच ...जर चुकुन सरांच्या नजरेस पडल तर मग काही खैर नसायची वर घरापर्यंत बातमी पोहचायची...त्यामुळे शाळेच्या मैदानाजवळ (आमची शाळा गावाबाहेर असल्यामुळे मैदानाच्या आजुबाजुला सगळ माळरानच होत) असलेल्या झुरीत आम्ही लपवायचो...मग काय दुपारच्या सुट्टीत तेवढ एकच काम.

कोली खेळताना भिडुने कोललेली विट्टी झेलताना खुपदा हाताच्या बोटांना जखम व्हायची...अन हाताची जखम घरी लपवायची म्हणजे अशक्यातली अशक्य गोष्ट...ते लक्षात आल की घरात मग काय आमच्या नावाने सत्यनारायणच व्हायचा. .  . . मग यापासुन वाचण्यासाठी  आम्ही गांधी टोपीचा वापर करायला लागलो (पांढरा शर्ट, अर्धी खाकी चड्डी अन गांधी टोपी हा आमचा गणवेष होता)....गांधी टोपीचा आजतागायत तरी कोणी असा वापर केला नसेल . :)

असा हा विट्टी दांडु फ़ीवर विट्टी -दांडु पाणी तापवायच्या बंबात गेल्याशिवाय उतरायचा नाही.....म्हणायला तो पर्यंत आमच मनोसक्त खेळुन झालेल असायचं त्यानंतर मौसम असायचा "गोट्यांचा".

विट्टी दांडु हा खेळ आता जवळपास नामशेष झाला आहे...शहरात सोडा गावाकडे पण आता कोणी हा खेळ खेळताना दिसत नाही...हा खेळ सध्या तरी इतिहास जमा झाल्यासारखाच आहे.

सौजन्याच्या आयला ......

आजच्या युगात जर तुम्ही जास्त सौजन्य दाखवुन जर तुम्ही कोणाची कीव केली तर तुमचा जीव घेतील.असाच अनुभव मी दोन दिवसांपुर्वी घेतला.

घरी टी.वी. नसल्यामुळे तो खरेदी करायचा असा निर्णय झाला.कोण म्हणायच LED घे तर कोणी म्हणायच LCD घे.प्रत्येकाचा वेगवेगळा सल्ला.....शेवटी सर्वात म्ह्त्वाचा म्हणजे खिश्याचा सल्ला घेतला अन बजेट नुसार LCDच घेउ या असा निर्णय झाला.आता LCD कोणत्या कंपनीचा, किती इंची घ्यावा यावर काथ्याकुट सुरु झाला...(किती चिकित्सक...किती अभ्यास करतोय...किती शहाणं ते लेकरु...शाब्ब्बास)....कोणत्याही कंपनी शो रुमला जाण्याऐवजी इलेक्ट्रॉनिक्स मॉलला जाऊन घेउ या म्हणजे सर्व ब्रॅंड पाहता येतील ह्या हेतुने सातारा रोडवरील "विजय सेल्सला" गेलो.

तिथे प्रवेश करताच अगदी हसतमुखाने स्वागत झाले...(नवीन बकरा आला आहे...चला कापु या...असाच काहीसा अविर्भाव सेल्समनच्या चेहर्‍यावर होता...त्याबरोबरच काउंटवरील कन्या "आता ह्याच काही खर नाही सेल्समन याला बरोबर घेणार" या विचाराने गालातल्या गालात खदाखदा (गालातल्या गालात खदाखदा कस??? जेव्हा खरेदी जाल ना तेव्हा समजेल हे) हसत होती)प्रत्येक मॉडेलला तो चांगलच म्हणुन साधारण आमचा अंदाज घेत होता..म्हणजे हे फ़क्त वेळ घालवायला आले आहेत की खरोखर टी.वी. घ्यायचा आहे याची चाचपणी चालु होती.

त्यातच त्याने ललॉईड नावाचा एक भारतीय बनावटीचा LCD दाखवला...थोडे त्याचे गुणगान गाउन हाच टी.वी. सध्या किती उत्तम आहे हे पटवत होता...(च्यायला मेरे कु येडा समझ रहा था...उस कु क्या पता मैं भी बारा पिंपळ का मुंज्या है..)मग त्याला चांगलाच घेतला...हो सर थोडी पिक्चर क्वालीटी कमी...साउंड पण बरा आहे...उसबी चालत नाही..HD इनबिल्ट नाही...अरे मग आहे काय यात??

त्यांनतर सॅमसॅंग अन एल.जी.चे मॉडेल पाहयला सुरुवात केली...थोड्यावेळापुर्वी भारतीय बनावटीच्या LCDचे गुणगान गाणारा आता हेच LCD बेश्ट आहे हे पटवत होता...त्याची इतकी वटवट (आपला सत्यवान नव्हे) चालु होती...(आयला हा झोपेत पण हेच बरळत असणार)...मी आपला मनोभावे श्रवणभक्ती करत होतो...एवढ सार पाहुन म्हणजे ऐकुन मला मनासारखा LCD  मिळत नव्हता. जीजुंना मात्र सॅमसंगचा आवडला होता..

तुमच्या कडे सोनी चे टी.वी. नाही आहेत काय??? म्या पामराने त्याला प्रश्न केला....माझ्याकडे पाहुन आहे की पण त्यांच्या किंमती फ़िक्स आहेत तिथे कमी जास्त होणार नाही (हे अगदी हलक्या आवाजात)...चालेल मला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही दाखवा मला सोनी चे टी.वी....(अरे पावट्या कुठे बार्गेन करायच हे मला माहित आहे...ते तु नको शिकवु..हे मनात) अस म्हणुन आता सोनीच्या मॉडेल्सवर काथ्याकुट चालु केला...आता सेल्समन नी सोनीचे गुणगान सुरु केल...जिकडं खोबर तिकडं चांगभल...या म्हणीचा प्रत्यय तेव्हा आला....शेवटी सोनीच एक मॉडेल आवडल मग जास्त विचार न करता तेच अंतिम करुन टाकलं.

पेमेंटसाठी ५०% आता अन ५०% टक्के उद्या देतो अन टी.वी. आजच घेऊन जातो असा पर्याय मी ठेवला..हा ते मान्य नाही करणार हे माहित होत पण तरीही उगाचच आपला शहाणपणा करत होतो...इतका वेळ आमच्या मागे पुढे फ़िरणारा आमची सर्विस किती चांगली आहे...तुम्ही इथेच खरेदी करा यासाठी पटवणारा सेल्समन निर्णय अंतिम झाल्यावर गायब झाला होता....त्यानी त्याच काम साधल होतं.

आम्ही पेमेंट करुन संध्याकाळी ४ वाजेपर्यंत टी.वी.घरपोच मिळेल अस आश्वासन घेउन (सामान्य माणसाच्या पदरात नेहमी हेच मिळतं) आनंदातच घरी पोहचलो...घड्याळाचा काटा जसा पुढे जात होता तशी उत्सुकता वाढत होती...पाच वाजले तरी न त्यांचा काही फ़ोन आला नव्हता...त्यांनी दिलेल्या नंबरवरही कोणी फ़ोन घेत नव्हत...शेवटी खुप वेळाने फ़ोन घेतला...इकडे-तिकडे अस चार पाच ठिकाणी ट्रान्सफ़र होऊन शेवटी योग्य विभागात फ़ोन पोहचला. अर्ध्या तासात टी.वी. पोहचेल अस सांगुन मी काही बोलायच्या आत पलीकडुन फ़ोन आपटला गेला.

शेवटी एकदाचा सात वाजता विजय सेल्सचा माणुस टी.वी.घेउन पोहचला...बॉक्स पाहण्याअगोदर अगदी घाईत ओपन केला...फ़िटींग वगैरे सुरु केली...तेव्हाच काहीतरी गडबड आहे याची शंका आली...म्हणुन पीस पाहिला तर तो पुर्णतः धुळीने माखला होता...बाजुची पॅकींगची टेप निघालेली होती...नीट पाहिल्यावर कळल त्यांनी शो रुमचा लुज पीस नवा पीस म्हणुन पाठवला होता...च्यायला मुर्ख समजतात की काय?? डिलीवरी घेउन आलेल्या तो पीस न घेताच त्याला तिथुन पिटाळल अन मी शो रुमला निघालो...सकाळी हसुन स्वागत करणार्‍या सेल्समन आता मात्र त्रासिक मुद्रेने.... काय झाल??? डिलीवरी मिळाली ना??? मी शक्य तितक्या सबुरीने त्याला सगळ रामायण सांगितल....ते ऐकुन त्याने त्याच्या मॅनेजरला बोलावुन आम्हाला त्याच्याकडे स्वाधीन करुन कल्टी मारली...मी आपला तेवढ्याच कळकळीने झालेला प्रकार सांगितला...तर यावर अस होण शक्य नाही आम्ही नवीनच पीस दिला आहे...इ..इ..सुरु केल...शेवटी वाद नको म्हणुन मी आपली माघार घेतली अन त्याला म्हणल मला हा पीस नको दुसरा द्या...तब्बल अर्धा तास वाट पाहिल्यावर तो परत आला....आज दुसरा पीस देण काही शक्य नाही...उद्या नक्की देतो..चला एका रात्रीने काय फ़रक पडणार आहे असा विचार करुन मी तिथुन निघालो.

आता दिवस दुसरा....दुपार पर्यंत विजय सेल्स कडुन काहीच संपर्क झाला नाही...म्हणुन मग मीच त्या मॅनेजरला फ़ोन केला...एका तासात डिलीवरी नक्की मिळेल..काळजी नका करु...पाठवतो म्हणजे पाठवतो... टिपीकल बोलबच्चन टाकला...मी आपला बर बाबा ठीक आहे...दुसर काय करणार... अडला हरी गाढवाचे पाय धरी...एका तासाचे दोन तासात झाले तरी घरी डिलीवरी पोहचली नव्हती...या दरम्यान त्याला खुपदा फ़ोन केला पण त्याने काही अटेंड केला नाही....त्यात हाफ़िसात नेमका मेजर प्रॉब्लेम आला...मग अजुनच चिड चिड होत होती....अखेरीस सहाच्या दरम्यान त्यानेच फ़ोन केला....तुमची डिलीवरी पाठवत आहे...नवीन पीस आहे...व्यवस्थित पाहुन घ्या...मी हाफ़िसात अडकलो होतो त्यामुळे ठीक आहे अस जुजबी उत्तर देउन फ़ोन बंद केला..घरी फ़ोन करुन मावसभावाला टी.वी. व्यवस्थित पाहुन घे अस बजावुन मी आपला कामाला जुंपलो....हाफ़िसातलं काम संपवुन घरी निघालो तोच भावाचा फ़ोन आला आज पण कालचा पीस परत पाठवला आहे.... हे ऐकल्यावर मात्र संयम संपला त्याला तो पीस परत कर घेउ नकोस अस सांगुन मी थेट विजय सेल्स गाठल...ह्यांच्याशी आता सौजन्य सोडुनच बोलाव लागणार होत...मनातल्या मनात सगळ्या शिव्यांची रिवीजन केली..

दुकानात घुसल्याबरोबर मॅनेजरला गाठल....अन जे सुरु झालो की बस्स....क्षणात सगळ स्टोअर माझ्या बाजुने गोळा झाल होतं (राउंड टेबल झाल होत...मध्ये फ़क्त मी अन तो मॅनेजर होतो)...मी हाफ़िसाचा सगळा वैताग त्याच्यावर काढत होतो...हे किडमड काय बोलु शकतो??....एकदम पप्पु आहे...असा त्याचा समज होता...पण जेव्हा त्याने माझा तो रुद्रावतार पाहिला तेव्हा त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता...सोबत आलेला मित्र मला थांबवत होता...तो काय म्हणतोय ते तर ऐकुन घे....पण मी काहीच ऐकण्याच्या मनस्थिती मध्ये नव्हतो....मी आपला सुरुच होतो...शेवटी मित्राने मला बाजुला घेतल म्हणाला अरे थोडा शांत हो...तो काय म्हणतोय ते तरी बघु....मी केलेल्या राड्याचा योग्य तो परीणाम साधला गेला होता...आता सगळे सुतासारखे सरळ झाले होते...झालेली चुक मान्य करुन उद्याचा दिवस द्या ...उद्या तुम्हाला नवीन पॅक पीस देतो..तो नाही आवडला तर रिफ़ंड देईल या अटीवर मी तिथुन निघालो....जाम डोक दुखत होत....बाहेर पडल्याबरोबर जवळच्याच अमृततुल्य मध्ये चहा मारला.

तिसर्‍या दिवशी मी आज पुन्हा राडा करायचा अन पैसे परत घ्यायचे याची पुर्ण तयारी केली होती....संध्याकाळी हाफ़िसातुन थेट स्टॊअरवर पोहचलो....आज स्वागत मात्र अगदी सौजन्याने झाल...स्टोअर मधील सगळ्यांच्या नजरा माझ्यावर खिळल्या होत्या....अरे हा तो कालचाच रे...आता आज हा काय करतोय याकडेच लक्ष होत.....मॅनेजरने मला आलेला नवीन पीस दाखवला...आज मात्र अगदी नवीन अन व्यवस्थीत पीस होता....तो पाहिल्यानंतर मग खुष झालो.

पुन्हा व्यवस्थित पॅक करुन स्वतःच डिलीवरी घेउन आलो....तिथुन निघल्यावर तो मॅनेजर मला बाहेर पर्यंत सोडवायला आला...परत काही खरेदी करायच असेल तर अगदी निश्चिंत या...मी  म्हणल "घंटा" (मनात)

यातुन एक धडा घेतला जास्त सौजन्य दाखवल तर हे गेंडा कातडी लोक तुम्हाला दाद देणार नाही....अरे ला कारे केल की आपोआप वठणीवर येतात....कदाचित त्यांना खळ्ळ-फ़ट्याक ची भाषा अवगत असल्यामुळे सौजन्याचं अपचन होत असेल.