Showing posts with label अनुभव. Show all posts
Showing posts with label अनुभव. Show all posts

यक्ष प्रश्न ?


यक्ष प्रश्न म्हणजे नक्की काय असत अस मला नेहमी वाटायच.यक्ष प्रश्न कसा असु शकतो याचा प्रत्यय मला माझ्या भाचीने दिला.आता सुट्टी आली तेव्हा सतत नवीन प्रश्न अन त्यांची उत्तर देता देता माझी नाकी नऊ आली होती.एवढ सुचत तरी कस ते देव जाणो.

रोज एक नवीन गोष्ट सांगावी लागायची.गोष्ट सांगताना पण अगदी विचार करुन बोलाव लागायच कारण प्रत्येक गोष्टीतुन इतके “का” निर्माण व्हायचे की बस्स. त्या “का” ची समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत माझा पिट्टा पडलेला असायचा.

या सर्वातुन सुटका व्हावी म्हणून म्हणलं चला हिला आपण मराठी मुळाक्षर शिकवु या.त्यासाठी कार्यालयातुन येताना मराठी मुळाक्षरांच पुस्तक घेउन आलो.आज गोष्ट नको त्याऐवजी आपण मुळाक्षर शिकु या अस म्हणुन तिला मुळाक्षर कस गिरवायच हे सांगितल अन मी आपल उर्ध्वपटामध्ये डोक खुपसल. हुश्श...आज बाकी आपली सुटका झाली अश्या अविर्भावात असतानाच उर्वीने भलामोठ्ठा बॉम्ब टाकला.


उर्वी: मामा, अ च्या डोक्यावरच का रेष द्यायची?

मी:बेटु, असच लिहतात.,तिथ पुस्तकात वर बघ त्यांनी अ च्या फ़क्त डोक्यावरच रेष दिली आहे नं. (च्यायला आजपर्यंत मला हा कधीच प्रश्न पडला नव्हता त्यामुळे याच उत्तर माहिती असण्याचा प्रश्नच नव्हता. याला म्हणता “आगीतुन फ़ुफ़ाट्यात पडणे” )

उर्वी: त्यांनी अस का लिहल ? त्यांना कोणी सांगितल?

मी:पिल्लु,सर्वजण असच लिहतात अन बघ त्याच्या डोक्यावर रेष दिली की अक्षर छान दिसत. असच लिहायच बर आता.

(मी शक्य तितक समजवायचा प्रयत्न करत होतो.पण भाची ने अस काय यॉर्कर टाकला होता की माझी दांडी गुल झाली होती)

आता मी अस बोलल्यावर बिचारी काही न बोलता गुपचुप मुळाक्षर गिरवायला लागली. मला पण हायसे वाटले.चला सुटलो एकदाचा अस म्हणुन मी परत माझ्या कामाला लागलो.

पाच-दहा मिनीटांच्या शांततेनंतर पुन्हा आवाज आला मामाSSSSSSSSSSS…

उर्वी: मामा, हे बघ मी खाली पण रेष दिली आहे अन हेच सुंदर दिसतय.

मी: नाही बेटु पण अस नाही लिहीत फ़क्त अक्षराच्या वरच रेष द्यायची असते.

उर्वी: नाही...मी खाली पण देणार तेच मला आवडलय.

मी: बर ठीक आहे तसच लिहुन काढ.

पांढर निशाण दाखवुन मी माघार घेतलेली असते.पण कुठे तरी मनात याच उत्तर काय असु शकते हाच विचार मनात घोळत असतो.त्या विचारात असतानाच परत पुन्हा एकदा आवाज येतो अन छातीत पुन्हा धस्स होत कारण परत एकदा यॉर्कर आहे हे माहितच आहे त्यामुळे हा आता टोलवता येणार की पुन्हा दांडी गुल हे येणारा प्रश्नच ठरवणार होता.
 
उर्वी: मामा अरे मी A,B,C लिहताना तर नाही देत रेष मग अ, आ,इ  लिहताना का बर द्यायची?

आता मात्र मला उर्वी मध्ये मलिंगा दिसु लागतो.त्याच्याहुन भारी यॉर्कर टाकणार कोणी असेल तर हीच अशी माझी खात्री पटलेली असते.ह्या पण प्रश्नाच उत्तर नसल्यामुळे वेळ मारुन नेण गरजेचं असतं.

मी: मला नाही माहित,मी एक काम करतो उद्या माझ्या टीचरला विचारतो अन तुला सांगतो .ठीक आहे.

यादरम्यानच बोलता बोलता उजव्या हाताने लिहता लिहता नकळतच तिने डाव्या हाताने लिहायला सुरुवात केलेली असते.आता या प्रश्नापासुन सुटका करायची म्हणुन..

मी: उर्वी, डाव्या हाताने लिहु नये उजव्या हाताने लिहीत जा बर.
 
उर्वी: का बर? डाव्या हाताने का लिहायच नाही....लिहील तर काय होईल?

आजपर्यंत नेहमी काही चांगल असेल तर उजवा अन वाईट असेल तर डावा असाच समज...दोघांमध्ये भेद हा चुकीचा आहे हे माहीत असुन ही उजव्याचाच हट्ट का हे मात्र मलाही माहित नाही. 

आता तुम्हाला जर या  प्रश्नांची उत्तर मिळाली तर मला जरुर कळवा.

१.     मराठी मुळाक्षर लिहताना त्याच्या डोक्यावरच रेष द्यायची?
२.     इंग्रजी अक्षरांच्या वर रेष का नाही द्यायची?
३.     आपण नेहमी उजव्यालाच का प्राधान्य देतो?

पहिल बक्षीस..

दोन ऑक्टोबर ...गांधी जयंती....प्रथेप्रमाणे शाळेत सर्वजण जयंती साजरी करण्यासाठी जमले होते.मुख्याध्यापकांच्या हस्ते गांधीजींच्या प्रतिमेची पुजा झाली.त्यानंतर शाळेने भाषण स्पर्धा आयोजित केली होती.



या स्पर्धेमध्ये सर्वात छोटा स्पर्धक मीच होतो.माझ नाव पुकारल्यानंतर मी भाषणासाठी उठलो अन ते पाच ते सात ओळींच भाषण ठोकुन आलो.भाषण पण अगदी टिपीकल होतं...

"अध्यक्ष महोदय,गुरुजन वर्ग अन जमलेल्या बंधु भगिनींनो मी जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती.म.गांधीचे पुर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते.त्यांचा जन्म २ ऑक्टोबर रोजी पोरबंदर येथे झाला.प्रेमाने त्यांना सर्वजण बापु म्हणत.एवढे बोलुन मी माझे भाषण संपवतो.जयहिंद.जय महाराष्ट्र."

हे आयुष्यातील माझ पहिलं भाषण.आजही हे भाषण माझ्या कस लक्षात आहे हे मला पण ठावुक नाही.

यानंतर निकालाच्या वेळी माझ नाव पुकारण्यात आल...माझा नंबर आला होता.... मला बक्षीस मिळाल होत...आयुष्यातील मला मिळालेलं पहिल बक्षीस...किती होत माहित आहे का??? २५ पैसे.



अन हे बक्षीस मला मुख्याध्यापकांच्या हस्ते मिळाल होत त्यामुळे जाम खुष झालो होतो.कारण तेव्हा मुख्याध्यापक म्हणजे एकदम सगळ्यात भारी अन त्यांनी बक्षीस दिल म्हणजे कॉलर टाईट.

मला अजुनही आठवतय ते २५ पैसे मिळाल्यानंतर मला मी जगातील सर्वात श्रीमंत माणुस वाटत होतो.मी कितीतरी दिवस ते तशेच जपुन ठेवले होते.घरी कोणी आल की मी माझ बक्षीस दाखवायचो.

त्यानंतर जसा मोठा होत गेलो तसा बर्‍याच वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला बर्‍याच वेळा बक्षीस मिळवली पण २५ पैश्याच्या बक्षीसात जी मजा होती ती कशालाच नाही.

आजही त्या पहिल्या बक्षीसाच मुल्य होऊच शकत नाही. :)

"स्वप्नपुर्ती" च वर्ष....

 २०१० सरलं...नवीन वर्ष नवे संकल्प....आयुष्याच्या वाटेवर अशीच वर्षे सरत जातात पण त्यातील काही आयुष्यभरासाठी आपल्या मनावर कोरली जातात.कारण त्या वर्षात तुम्हाला जे हव ते मिळालेल असत किंवा नशीबाचं घोड चौखुर उधळल्यामुळे अवघी सुखं तुमच्या पायाशी लोळण घेत असतात.

आयुष्यातले स्ट्रगल्स, स्वप्न साकार करण्यासाठी अनुभवलेले कटु क्षण किंवा असा एक काळ असतो की प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला झगडाव लागत.अन जर तो संघर्ष मोठा असेल तर त्यानंतर मिळाणार्‍या यशाचं सुख हे अवर्णनीय असतं.

असच काहीसं या वर्षात झाल...माझ्यासाठी तर २०१० म्हणजे स्वप्नपुर्तीच वर्ष आहे.या वर्षाने मला खुप अविस्मरणीय अशा आठवणी दिल्या आहेत.

या वर्षात मला माझ्या आयुष्याची जोडीदार मिळाली...करीअर मध्ये बर्‍याच स्ट्रगल नंतर मला हवा असणारा माइल स्टोन गाठता आला..अन याहुन सर्वात मोठ म्हणजे माझ लहानपणापासुन पाहिलेल स्वप्न तब्बल अडीच वर्षांच्या धडपडीनंतर साकार झाल ते म्हणजे माझ्या आइ बाबांसा्ठीच घर.

माझ्या आई अन बाबांनी अवघ्या १० बाय १० च्या खोलीत तब्बल १८ वर्षे संसार केला. तेव्हाच लहानपणी मनाशी निश्चय केला होता आई - बाबांसाठी एक घर भेट देईन. अन त्या घराच नाव असेन स्वप्नपुर्ती

आज आम्ही भावंड जे काही आहोत ते केवळ आई अन बाबांमुळेच ...आयुष्यात त्यांनी आमच्यासाठी खुप सार्‍या तडजोडी स्वीकारल्या त्याही अगदी आनंदाने.लहान असताना त्याच महत्व कधीच कळाल नाही पण जस जस मोठ होत गेलो व्यवहाराची जाण आली तस त्यांच्या सारख्या तडजोडी करण्यासाठी किती धैर्य लागत याची जाणीव झाली.

१५ मे ला म्हणजे माझ्या लग्नाच्या एक दिवस अगोदर जेव्हा आई-बाबांनी गृहप्रवेश केला तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावरील असलेलं समाधान पाहिल अन भरुन पावलो.त्या संपुर्ण दिवस जेव्हा जेव्हा त्यांचे शिक्षक सहकारी घर पाहण्यासाठी यायचे तेव्हा डोळ्यात माझ्यासाठी असलेला अभिमान ,चेहर्‍यावरील समाधान ही माझ्या आज पर्यंतच्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाइ होती.तेव्हा मनात एकच भावना होती आई बाबा ही फ़क्त सुरुवात आहे ....आजपर्यंत आमच्यासाठी तुम्ही जी काही सुख नाकारली ते प्रत्येक सुख मी तुम्हाला देइन.अजुन खुप करायच आहे तुमच्यासाठी...तुम्ही माझ्यासाठी जे कष्ट घेतलेत त्यापुढे माझ हे कर्तृत्व खुप कमी आहे.

घराच स्वप्न साकारायला मी डिसेंबर २००७ मध्ये सुरुवात केली होती. सुरुवातीला अगदी सोप वाटणार काम किती कठीण आहे एका आठवड्यात लगेच समजल कारण माझ्या समोरील प्लॉट वाल्याने अतिक्रमणाची खोटी केस लावली.ते प्रकरण निस्तरायला मला सहा महिने गेले.कधी नव्हे ते कोर्टाची पायरी चढलो.आता तरी काम पटकन होईल अस वाटत असताना बांधकाम कंत्राटदाराने त्रास द्यायला सुरुवात केली. मी फ़क्त शनिवार -रविवार साईट वर जायचो इतर दिवशी गावाकडील मित्र त्यांना शक्य होइल त्याप्रमाणे साइटवर जायचे याचाच त्याने गैरफ़ायदा घेउन त्रास द्यायला सुरुवात केली.चांगुलपणाची सर्व कपडे उतरवुन जेव्हा धतिंगपणा केला तेव्हा कुठे तो नीट काम करायला लागला.

त्यातही काम करताना मी भरपुर वेळा तोडफ़ोड केली.सोमवार ते शुक्रवार तो काम करायचा अन शनिवार-रविवार मी गेल्यावर बर्‍याचदा त्याला तोडायला लावायचो.कारण मी दिलेल डीजाइन दिलेल एक असायच अन त्याने बांधलेल वेगळच असायच. अस तोड फ़ोडीत काम आपल चालु होत.अशे २-३ महिने गेले अन मी वैतागुन नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.दुसर्‍या चांगल्या कंपनीत कमी पगारावर जॉइन केल. अर्थात सहा महिन्यानंतर मला हवी असलेली सॅलरी मिळेल या अटीवर.

जुन्या कंपनीमध्ये जिथे मी अगदी पोटतिडकीने काम करुन कंपनी वाढवली त्यांनीच माझे सर्व पैसे बुडवले.आर्थिक दृष्ट्या तो मला खुप जोरात झटका बसला.आता नवीन जॉब असल्यामुळे कर्ज पण नाही हक्काची कमाइ पण नाही.पुन्हा एकदा सहा महिने काम बंद करण्याची वेळ आली.

नव्या कंपनीत प्रोबेशन पुर्ण केल अन लगेच कर्जासाठी अर्ज केला.नव्या कंपनीने सुध्दा त्यांचा शब्द पाळला नाही.त्या दरम्यान मंदी असल्यामुळे माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता.परत काम चालु करायला मला दोन महिने लागले.कासवाच्या गतीने मी घराच काम सुरु केल.ऎन पावसाळा असल्याने काम तस हळु हळु चालु होत.२००९ च्या दिवाळीपर्यंत  स्लॅब अन सर्व बांधकाम झाल आता फ़िनीशिंग चालु होणार तेव्हाच मला तीन महिन्यासाठी इजिप्तला  जाव लागंणार होत.त्या दरम्यानच माझी विकेट पण पडली.सर्व गोष्टी एका वेळीच सुरुवात झाली होती. पण फ़क्त काही झाल तरी हरायच नाही अन खचायच तर बिलकुल नाही हेच फ़क्त मनात होत.

हे काय कमी होत..पुढ अजुन एक मोठ संकट माझ्या समोर उभ राहिल...मी कैरोला असताना बाबांना अ‍ॅटॅक आला अन त्यांची अ‍ॅन्जिओप्लास्टी करावी लागली.आता मात्र मी खचलो होतो.माझ्यासाठी तो खुप कठीण काळ होता.तेव्हा केवळ मित्रांच्या आधारामुळेच उभा राहु शकलो.यावर ही पोस्ट पण लिहली होती.

या सर्व घटनातच २००९ संपल अन २०१० सुरु झाल अन सार काही बदलल....जानेवारी मध्ये मी परत आलो.....आर्थिक अडचण पण सुटली होती त्यामुळे काहीच अडथळा नव्हता...पुन्हा एकदा नव्या जोमाने काम सुरु केल...अवघ्या तीन महिन्यात मी संपुर्ण घर पुर्ण केल. . . १६ मे ला लग्न झाल. . . .मग माझ्यासाठी माझ जगच बदलुन गेल.

जुलै मध्ये कंपनीवाल्यांना उपरती झाली अन माझ्याबाबतीत झालेली चुक मान्य करीत माझ पॅकेज अनपेक्षीत रितीने अपडेट केल.सार कस सुरळीत झाल. . . .मागच्या वर्षातील दिवस आठवले की खुप समाधान मिळत.
थोडक्यात काय "घर पाहाव बांधुन अन लग्न पाहाव करुन" अशे दोन्ही पण अनुभव मी एकाच वेळी घेतले. :)

तुमचा पण एक दिवस असतो...कधीही सतत दुःख किंवा सतत सुख अस कधीच नसत....दुःख तुम्हाला पचवता आल पाहिजे अन सुख जमिनीवर पाय ठेवुन जगता आल पाहिजे.(ही भाषा खुप गोड वाटते ना...अहो सुख मिळाल की माज करायचा नाही. . आता समजल ना ;) )

आता २०११ च स्वागत करायच पुन्हा एक नव स्वप्न,नवी उमेद , नवी आशा घेउन. . . . अन अर्थात मनमौजी पणे आयुष्याचा प्रत्येक क्षण जगयाच.

पुण्यात गाडी चालवायची आहे का????

प्रसंग क्रमांक १:

स्थळ : कात्रज सर्पोद्यान.

मी आणि मित्र पुण्याच्या बी.आर.टी. वर बौ्द्धिक करत चाललो होतो. सर्पोद्याना समोरील चौकात गतिरोधक आल्यामुळे मित्राने दुचाकीचा वेग कमी केला. अन क्षणात पाठीमागुन येणार्‍या एका महान दुचाकीस्वाराने धडक दिली. काही समजायच्या आत मी रस्त्यावर अन मित्र दुचाकी सोबत घसरत पुढे जाउन पडला.आमची काही चुक नसतानाही आम्हाला न मागता चांगलाच प्रसाद मिळाला होता.

प्रसंग क्रमांक २

स्थळ : के.के. मार्केट चौक

सकाळी नेहमीप्रमाणे हाफ़िसात निघालो होतो..के.के.मार्केटच्या चौकात बिबवेवाडीकडे जाण्यासाठी लाल दिवा पेटल्याने थांबलो.हिरवा दिवा पेटताच उजवीकडे वळुन मी आपला मार्गस्थ झालो. तोच समोर एक काकु सिग्नल तोडुन माझ्यासमोर  आली. धडक वाचवण्यासाठी मी ब्रेक लावले तोच पा्ठीमागुन येणार्‍या चा्रचाकी वाल्याने माझ्या गाडीच हलकसंच चुंबन घेतल.एवढ होऊनही काकु काहीही न घडल्याच्या अविर्भावात साळसुदपणे निघुन गेल्या.

हे मागील काही महिन्यातील मला आलेले अनुभव...तसा गाडी चालवण्याच्या बाबतीत मी म्हणजे कासव आहे.आमचा स्पीड ४०-४५ च्या पुढे कधीच जात नाही.

एकदंरीत आता तुमच्या लक्षातच आल असेल पुण्यात गाडी चालवण म्हणजे सर्वात मोठ दिव्य आहे. एकवेळ तुमच्याकडे गाडी चालवण्याचा परवाना नसला तरी चालेल पण अष्टांगअवधानी असणं अत्यंत गरजेचे आहे.कारण फ़क्त आभाळातुन सोडल तर इतर कोणत्याही दिशेने ्म्हणजे समोरुन, पाठीमागुन, उजवीकडुन, डावीकडुन अन असतील नसतील त्या फ़टीतुन कधी कोण घुसेल हे कोणीच सांगु शकत नाही.

पुण्यातील वाहनचालकांच्या काही सवयी व समज :

१. रस्त्यावरील सिग्नल म्हणजे हे केवळ रस्ता सजावटीसाठी आहे.
२. ३० सेकंदाचा सिग्नल जर पाळला तर महाप्रलय होऊ शकतो त्यामुळे पिवळा/लाल सिग्नल दिसताक्षणी शक्य तितक्या वेगाने मिळेल त्या फ़टीतुन दुचाकी ही पळवलीच पाहिजे.
३.बी.आर.टी. ट्रॅक किंवा सायकल ट्रॅक यामधुन गाडी चालवणे हा त्यांचा जन्मसिध्द हक्क आहे.
४. समोर वाहतुकीची कोंडी झालेली आहे मार्ग निघु शकत नाही अश्या वेळी आजुबाजुच्या जनतेच्या मनोरंजनासाठी आपल्या दुचाकीचा भोंगा जोरात वाजवलाच पाहिजे.
५. झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे गाडी थांबवणे हे अतिशय कमीपणाचे अन अडाणीपणाचे लक्षण आहे त्यामुळे गाडी ही झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे किंवा त्यावरच थांबवली गेली पाहिजे.
६.सिग्नलला थांबल्यानंतर एकाजागी सिग्नल सुटण्याची वाट पाहण्याऎवजी मिळेल त्या कोपर्‍यातुन आपली गाडी काढण्याचा प्रयत्न करायचा.
७.एका कानाला मोबाईल लावुन,मान तिरकी करुन गाडी चालवण्यात खर शौर्य आहे.
८. नो एन्ट्रीचा फ़लक दिसत असला तरी त्यातुन गाडी घातलीच पाहिजे त्यात खर थ्रिल आहे अन वर कोणी एखादा ओरडला तर त्याच्यावरच शिरजोरी करायची.
९.जर चारचाकी असेल तर मध्ये रस्त्यातच उभी करुन चितळेंच्या किंवा तत्सम दुकानात जाउन निवांतपणे खरेदी करायची भले तिकडे कितीही ट्रॅफ़िक जॅम झाला तरी चालेल.
१०.हेल्मेट हे फ़क्त फ़ट्टु किंवा भित्री लोक वापरतात.

पुण्यात गाडी चालवताना यांच्यापासुन सावधान:

१. पी.एम.टी. : गाडी चालवताना पी.एम.टी. जेव्हा कधी पुढे किंवा मागे येते तेव्हा मला नेहमी ती एका अजस्त्र अजगरासारखी वाटते की जो भुकेला आहे अन कधीही तुमची शिकार करु शकतो. शक्यतो गाडी चालवताना पी.एम.टी.च्या जवळपास पण भटकु नका कधी तुमची शिकार होइल हे सांगता येणार नाही. पी.एम.टी. अगदी सन्मानाने जाउन द्यायच अन मग आपण निघायच.

२. पुणेरी काकु (यात मुली सुध्दा आल्या बरं का) : यांना इंडीकेटर, हॉर्न या प्रकारांची अ‍ॅलर्जी असते. त्यामुळे या जर आजुबाजुला असतील तर कधी टर्न करतील हे साक्षात ब्रम्हदेवपण सांगु शकत नाही. यांनी चुकुन कधी इंडीकेटर दिला तरी जरा जपुनच कारण डावीकडचा इंडीकेटर देउन उजवीकडे वळण्याचा पराक्रम फ़क्त पुण्यातच होतो.

३.रिक्षावाले: पुणेकर रिक्षावाले काका हे पुण्यातील रस्तांचे अनिभिषक्त सम्राट म्हणा किंवा वतनदार म्हणल तरी चालेल.स्वतः चुक करतील अन वर तुम्हालाच सुनावतील.हे पण रस्त्यात प्रवाशी घेण्यासाठी किंवा प्रवाशी उतरवण्यासाठी केव्हाही थांबु शकतात. सिग्नल पाळण्याच कोणतही बंधन यांच्यावर नसतं.रस्ता कोणताही असो त्याचे मालक हे हेच असतात.

४.पुणेरी खड्डे: पुणे तिथे काय उणे या उक्तीनुसार पुण्यातील रस्त्यांवर खड्ड्यांची कमतरता नाही. पुण्यात असा एकही रस्ता नाही की ज्यावर खड्डा नाही.पुण्यात एकसारखा सलग रस्ता तुम्हाला सापडुच शकत नाही, सतरा पक्षांची खिचडी करुन ज्याप्रमाणे सरकार उभारणी साठी आघाडी केली जाते त्याप्रमाणेच पुण्यात पण अशेच रस्ते आढळतील. कॉंक्रीट, डांबरी, पेवांग ब्लॉक अश्या सर्व प्रकारचे रस्ते एकाच वेळी तुम्हाला आढळतील.त्यामुळे शक्यतो खड्ड्यांमधुन जो काही थोडा फ़ार रस्ता असतो त्यावरुन गप गुमान आपली गाडी चालवायची.

५.पुणेकर पादचारी: चौकातुन गाडी चालवताना यांच्यापासुन जरा जपुनच राहयच.एखाद्या बगीच्यामध्ये आपण ज्याप्रमाणे फ़ेरफ़टका मारतो अगदी त्याप्रमाणेच रहदारीच्या रस्त्यावर हे मुकतपणॆ बागडत असतात.चुकुनही यांच्या मार्गात येउ नका (ते तुम्हाला आडवे आले तरी) नाही तर अस्सल पुणेरी फ़टके मिळतील.अन अश्यावेळी तुमच्यावर तोंडसुख घ्यायला हौशे,गवशे,नवशे अशे सगळे सामील होतील.

थोडक्यात काय तर पुण्यात गाडी चालवायची असेल तर तुम्हीच तुमच्या जीवनाचे रक्षक हे लक्षात ठेवा नाही तर कधी तुम्हाला मुक्ती मिळेल हे कोणी सांगु शकत नाही.

मुस्कान...

मुस्कान....टपोरे डोळे...गोरी पान...चेहर्‍यावर अतिशय गोड हसु... अवघी ९ वर्षाची चिमुरडी.. अगदी बाहुली सारखी.. पाहिल्याबरोबर कोणीही प्रेमात पडेल इतकी गोड...परवाच्या दिवशी लिलावती हॉस्पीटलमध्ये भेटली.पोटाचा कॅन्सर झाल्यामुळे त्यावरील उपचार सध्या तिथे चालु आहे...अवघ्या काही महिन्यांची सोबती आहे.

सतत काही ना काही बडबडत असते. पुर्ण वॉर्डमध्ये सर्वांसोबत काही ना काही गप्पा चालु असतात.प्रत्येक नर्स, वॉर्ड बॉयला हुकुम सोडत असते.एका हाताला टोचलेल्या सुया तश्याच घेउन सगळीकडे फ़िरत असते. आपल्याला काही तरी असाध्य असा रोग झालाय याची तिळमात्रही कल्पना नसलेली...स्वतःच्या एक वेगळ्या अश्या विश्वात रमलेली...प्रत्येकाच्याच चेहर्‍यावर काही क्षण का होइना सर्व दुःख विसरायला लावुन "आनंद" देणारी ही मुस्कान.

आपण काही महिन्यांचेच सोबती आहोत याची तिला कल्पना सुद्धा नाही...जीवन म्हणजे काय अन मृत्यु म्हणजे काय??हे समजण्या्चही तिच वय नाही. अश्या वयातच तिच्या नशिबी हे भोग आले आहेत.तिची आइ हे सार दुःख पचवुन ही उभी आहे.कारण बाप नसलेल्या मुस्कान ला फ़क्त तिचाच काय तो आधार आहे.
परवाच्या रात्री तिला रक्ताच्या बॉटल अन इंजेक्शन देताना पाहिल अन मन अगदी सुन्न झाल.तिच्या छोटुकल्या हातांवर जेव्हा सुया टोचत होते तेव्हा मनाला असंख्य अश्या वेदना होत होत्या.मी नाही पाहु शकलो हे सार....तिथुन उठुन थेट बाहेर येउन बसलो ते असंख्य अशे प्रश्न घेउनच की ज्यांची उत्तर मला कधीच मिळणार नाहीत.


ती संपुर्ण रात्र मी खुर्चीवर बसुन काढली...चेहर्‍यावर समोर फ़क्त मुस्कानचाच चेहरा होता...सकाळी  तिच्या चेहर्‍यावर असणार गोड हसु उपचारादरम्यान अगदी कोमेजुन गेल होत.

तिला डेअरी मिल्क खुप आवडत म्हणुन दुसर्‍या दिवशी सकाळी कॅडबरी घेउन आलो. तिला जेव्हा ती कॅडबरी दिली तेव्हा ती इतकी आनंदी झाली की बस्स....एका छोट्याश्या कॅडबरीतही एवढा आनंद सामावलेला असतो हे मला तेव्हाच समजला.जगातला सर्वात मोठ सुख मिळाल्याचा आनंद होता तो....त्या एका क्षणाने मी अंतःर्मुख झालो.
तिच्या अगदी समोरच्याच बेडवर एक अंदाजे ८०-८५ वर्षांचे आजोबा अगदी जर्जर अवस्थेत पडले होते.प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना दुसर्‍यावर अवलंबुन राहव लागत होत.होणार्‍या प्रत्येक वेदना त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडच्या होत्या.पडल्या जागीच ते हे सर्व सहन करत होते. समोरच त्यांच्या ह्या वेदना अन त्यांची ही अवस्था पाहणारा त्यांचा हतबल असा मुलगा होता.
हे किती विचित्र आहे ना. . . . जिला आयुष्याचा अर्थ पण समजला नाही किंवा अजुन आयुष्य जगल पण नाही अशी मुस्कान अजुन जगायला मिळाव म्हणुन मृत्युशी लढते आहे कदाचित यात लवकरच तिची हार होणार आहे न दुसरीकडे मनसोक् युष्य जगलेले आजोबा आहेत की ज्यांना आजाराच्या वेदना असह्य होऊन ते मृत्युची वाट पाहत आहेत पण तो काही येत नाही.
हे अस का असत???
खरच ह्या विश्वात देवाच अस्तित्व आहे का???
असेल तर तो असा न्याय का करतो???

सौजन्याच्या आयला ......

आजच्या युगात जर तुम्ही जास्त सौजन्य दाखवुन जर तुम्ही कोणाची कीव केली तर तुमचा जीव घेतील.असाच अनुभव मी दोन दिवसांपुर्वी घेतला.

घरी टी.वी. नसल्यामुळे तो खरेदी करायचा असा निर्णय झाला.कोण म्हणायच LED घे तर कोणी म्हणायच LCD घे.प्रत्येकाचा वेगवेगळा सल्ला.....शेवटी सर्वात म्ह्त्वाचा म्हणजे खिश्याचा सल्ला घेतला अन बजेट नुसार LCDच घेउ या असा निर्णय झाला.आता LCD कोणत्या कंपनीचा, किती इंची घ्यावा यावर काथ्याकुट सुरु झाला...(किती चिकित्सक...किती अभ्यास करतोय...किती शहाणं ते लेकरु...शाब्ब्बास)....कोणत्याही कंपनी शो रुमला जाण्याऐवजी इलेक्ट्रॉनिक्स मॉलला जाऊन घेउ या म्हणजे सर्व ब्रॅंड पाहता येतील ह्या हेतुने सातारा रोडवरील "विजय सेल्सला" गेलो.

तिथे प्रवेश करताच अगदी हसतमुखाने स्वागत झाले...(नवीन बकरा आला आहे...चला कापु या...असाच काहीसा अविर्भाव सेल्समनच्या चेहर्‍यावर होता...त्याबरोबरच काउंटवरील कन्या "आता ह्याच काही खर नाही सेल्समन याला बरोबर घेणार" या विचाराने गालातल्या गालात खदाखदा (गालातल्या गालात खदाखदा कस??? जेव्हा खरेदी जाल ना तेव्हा समजेल हे) हसत होती)प्रत्येक मॉडेलला तो चांगलच म्हणुन साधारण आमचा अंदाज घेत होता..म्हणजे हे फ़क्त वेळ घालवायला आले आहेत की खरोखर टी.वी. घ्यायचा आहे याची चाचपणी चालु होती.

त्यातच त्याने ललॉईड नावाचा एक भारतीय बनावटीचा LCD दाखवला...थोडे त्याचे गुणगान गाउन हाच टी.वी. सध्या किती उत्तम आहे हे पटवत होता...(च्यायला मेरे कु येडा समझ रहा था...उस कु क्या पता मैं भी बारा पिंपळ का मुंज्या है..)मग त्याला चांगलाच घेतला...हो सर थोडी पिक्चर क्वालीटी कमी...साउंड पण बरा आहे...उसबी चालत नाही..HD इनबिल्ट नाही...अरे मग आहे काय यात??

त्यांनतर सॅमसॅंग अन एल.जी.चे मॉडेल पाहयला सुरुवात केली...थोड्यावेळापुर्वी भारतीय बनावटीच्या LCDचे गुणगान गाणारा आता हेच LCD बेश्ट आहे हे पटवत होता...त्याची इतकी वटवट (आपला सत्यवान नव्हे) चालु होती...(आयला हा झोपेत पण हेच बरळत असणार)...मी आपला मनोभावे श्रवणभक्ती करत होतो...एवढ सार पाहुन म्हणजे ऐकुन मला मनासारखा LCD  मिळत नव्हता. जीजुंना मात्र सॅमसंगचा आवडला होता..

तुमच्या कडे सोनी चे टी.वी. नाही आहेत काय??? म्या पामराने त्याला प्रश्न केला....माझ्याकडे पाहुन आहे की पण त्यांच्या किंमती फ़िक्स आहेत तिथे कमी जास्त होणार नाही (हे अगदी हलक्या आवाजात)...चालेल मला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही दाखवा मला सोनी चे टी.वी....(अरे पावट्या कुठे बार्गेन करायच हे मला माहित आहे...ते तु नको शिकवु..हे मनात) अस म्हणुन आता सोनीच्या मॉडेल्सवर काथ्याकुट चालु केला...आता सेल्समन नी सोनीचे गुणगान सुरु केल...जिकडं खोबर तिकडं चांगभल...या म्हणीचा प्रत्यय तेव्हा आला....शेवटी सोनीच एक मॉडेल आवडल मग जास्त विचार न करता तेच अंतिम करुन टाकलं.

पेमेंटसाठी ५०% आता अन ५०% टक्के उद्या देतो अन टी.वी. आजच घेऊन जातो असा पर्याय मी ठेवला..हा ते मान्य नाही करणार हे माहित होत पण तरीही उगाचच आपला शहाणपणा करत होतो...इतका वेळ आमच्या मागे पुढे फ़िरणारा आमची सर्विस किती चांगली आहे...तुम्ही इथेच खरेदी करा यासाठी पटवणारा सेल्समन निर्णय अंतिम झाल्यावर गायब झाला होता....त्यानी त्याच काम साधल होतं.

आम्ही पेमेंट करुन संध्याकाळी ४ वाजेपर्यंत टी.वी.घरपोच मिळेल अस आश्वासन घेउन (सामान्य माणसाच्या पदरात नेहमी हेच मिळतं) आनंदातच घरी पोहचलो...घड्याळाचा काटा जसा पुढे जात होता तशी उत्सुकता वाढत होती...पाच वाजले तरी न त्यांचा काही फ़ोन आला नव्हता...त्यांनी दिलेल्या नंबरवरही कोणी फ़ोन घेत नव्हत...शेवटी खुप वेळाने फ़ोन घेतला...इकडे-तिकडे अस चार पाच ठिकाणी ट्रान्सफ़र होऊन शेवटी योग्य विभागात फ़ोन पोहचला. अर्ध्या तासात टी.वी. पोहचेल अस सांगुन मी काही बोलायच्या आत पलीकडुन फ़ोन आपटला गेला.

शेवटी एकदाचा सात वाजता विजय सेल्सचा माणुस टी.वी.घेउन पोहचला...बॉक्स पाहण्याअगोदर अगदी घाईत ओपन केला...फ़िटींग वगैरे सुरु केली...तेव्हाच काहीतरी गडबड आहे याची शंका आली...म्हणुन पीस पाहिला तर तो पुर्णतः धुळीने माखला होता...बाजुची पॅकींगची टेप निघालेली होती...नीट पाहिल्यावर कळल त्यांनी शो रुमचा लुज पीस नवा पीस म्हणुन पाठवला होता...च्यायला मुर्ख समजतात की काय?? डिलीवरी घेउन आलेल्या तो पीस न घेताच त्याला तिथुन पिटाळल अन मी शो रुमला निघालो...सकाळी हसुन स्वागत करणार्‍या सेल्समन आता मात्र त्रासिक मुद्रेने.... काय झाल??? डिलीवरी मिळाली ना??? मी शक्य तितक्या सबुरीने त्याला सगळ रामायण सांगितल....ते ऐकुन त्याने त्याच्या मॅनेजरला बोलावुन आम्हाला त्याच्याकडे स्वाधीन करुन कल्टी मारली...मी आपला तेवढ्याच कळकळीने झालेला प्रकार सांगितला...तर यावर अस होण शक्य नाही आम्ही नवीनच पीस दिला आहे...इ..इ..सुरु केल...शेवटी वाद नको म्हणुन मी आपली माघार घेतली अन त्याला म्हणल मला हा पीस नको दुसरा द्या...तब्बल अर्धा तास वाट पाहिल्यावर तो परत आला....आज दुसरा पीस देण काही शक्य नाही...उद्या नक्की देतो..चला एका रात्रीने काय फ़रक पडणार आहे असा विचार करुन मी तिथुन निघालो.

आता दिवस दुसरा....दुपार पर्यंत विजय सेल्स कडुन काहीच संपर्क झाला नाही...म्हणुन मग मीच त्या मॅनेजरला फ़ोन केला...एका तासात डिलीवरी नक्की मिळेल..काळजी नका करु...पाठवतो म्हणजे पाठवतो... टिपीकल बोलबच्चन टाकला...मी आपला बर बाबा ठीक आहे...दुसर काय करणार... अडला हरी गाढवाचे पाय धरी...एका तासाचे दोन तासात झाले तरी घरी डिलीवरी पोहचली नव्हती...या दरम्यान त्याला खुपदा फ़ोन केला पण त्याने काही अटेंड केला नाही....त्यात हाफ़िसात नेमका मेजर प्रॉब्लेम आला...मग अजुनच चिड चिड होत होती....अखेरीस सहाच्या दरम्यान त्यानेच फ़ोन केला....तुमची डिलीवरी पाठवत आहे...नवीन पीस आहे...व्यवस्थित पाहुन घ्या...मी हाफ़िसात अडकलो होतो त्यामुळे ठीक आहे अस जुजबी उत्तर देउन फ़ोन बंद केला..घरी फ़ोन करुन मावसभावाला टी.वी. व्यवस्थित पाहुन घे अस बजावुन मी आपला कामाला जुंपलो....हाफ़िसातलं काम संपवुन घरी निघालो तोच भावाचा फ़ोन आला आज पण कालचा पीस परत पाठवला आहे.... हे ऐकल्यावर मात्र संयम संपला त्याला तो पीस परत कर घेउ नकोस अस सांगुन मी थेट विजय सेल्स गाठल...ह्यांच्याशी आता सौजन्य सोडुनच बोलाव लागणार होत...मनातल्या मनात सगळ्या शिव्यांची रिवीजन केली..

दुकानात घुसल्याबरोबर मॅनेजरला गाठल....अन जे सुरु झालो की बस्स....क्षणात सगळ स्टोअर माझ्या बाजुने गोळा झाल होतं (राउंड टेबल झाल होत...मध्ये फ़क्त मी अन तो मॅनेजर होतो)...मी हाफ़िसाचा सगळा वैताग त्याच्यावर काढत होतो...हे किडमड काय बोलु शकतो??....एकदम पप्पु आहे...असा त्याचा समज होता...पण जेव्हा त्याने माझा तो रुद्रावतार पाहिला तेव्हा त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता...सोबत आलेला मित्र मला थांबवत होता...तो काय म्हणतोय ते तर ऐकुन घे....पण मी काहीच ऐकण्याच्या मनस्थिती मध्ये नव्हतो....मी आपला सुरुच होतो...शेवटी मित्राने मला बाजुला घेतल म्हणाला अरे थोडा शांत हो...तो काय म्हणतोय ते तरी बघु....मी केलेल्या राड्याचा योग्य तो परीणाम साधला गेला होता...आता सगळे सुतासारखे सरळ झाले होते...झालेली चुक मान्य करुन उद्याचा दिवस द्या ...उद्या तुम्हाला नवीन पॅक पीस देतो..तो नाही आवडला तर रिफ़ंड देईल या अटीवर मी तिथुन निघालो....जाम डोक दुखत होत....बाहेर पडल्याबरोबर जवळच्याच अमृततुल्य मध्ये चहा मारला.

तिसर्‍या दिवशी मी आज पुन्हा राडा करायचा अन पैसे परत घ्यायचे याची पुर्ण तयारी केली होती....संध्याकाळी हाफ़िसातुन थेट स्टॊअरवर पोहचलो....आज स्वागत मात्र अगदी सौजन्याने झाल...स्टोअर मधील सगळ्यांच्या नजरा माझ्यावर खिळल्या होत्या....अरे हा तो कालचाच रे...आता आज हा काय करतोय याकडेच लक्ष होत.....मॅनेजरने मला आलेला नवीन पीस दाखवला...आज मात्र अगदी नवीन अन व्यवस्थीत पीस होता....तो पाहिल्यानंतर मग खुष झालो.

पुन्हा व्यवस्थित पॅक करुन स्वतःच डिलीवरी घेउन आलो....तिथुन निघल्यावर तो मॅनेजर मला बाहेर पर्यंत सोडवायला आला...परत काही खरेदी करायच असेल तर अगदी निश्चिंत या...मी  म्हणल "घंटा" (मनात)

यातुन एक धडा घेतला जास्त सौजन्य दाखवल तर हे गेंडा कातडी लोक तुम्हाला दाद देणार नाही....अरे ला कारे केल की आपोआप वठणीवर येतात....कदाचित त्यांना खळ्ळ-फ़ट्याक ची भाषा अवगत असल्यामुळे सौजन्याचं अपचन होत असेल.

येळकोट..येळकोट...जय मल्हार!!!

कुलाचार,कुलधर्म,कुलदैवत या सर्व प्रकारांशी लग्नापुर्वी दुर दुर पर्यंत संबंध नव्हता.गुरुवारी "स्वामी समर्थ मठ" सोडला तर बाकी इतर कोणत्याच ठिकाणी मी काही फ़िरकत नाही.आइ बाबा जातात म्हणुन प्रत्येक नवरात्रात निमगिरी ला आमच्या कुलदेवीला जायचो.ते पण मला तो परीसर खुप आवडतो म्हणुन अन सर्वात महत्वाच म्हणजे घरचे सर्व जण एकत्र असतात त्यामुळे मस्त मजा येते.तुळजापुर, जेजुरी इथे लहानपणी कधी तरी गेल्याच आठवतय.

लग्नानंतर कुलधर्माप्रमाणे जेजुरी इथ जाण क्रमप्राप्त होत.आपण फ़क्त जेजुरी ला न जाता कडेपठारला पण जाउ या असा प्लॅन झाला.ठरल्याप्रमाणे पहाटे घरुन जेजुरीच्या दिशेने प्रयाण केल.सकाळी लवकरच आम्ही कर्‍हा नदीवर पोहचलो.स्वागताला पार्किंगची पावती घेउन उभा होता.
 मी : हे पार्किंग देवस्थानच की सरकारच?
 तो:  हे खाजगी पार्किंग आहे.
 मी: अरे पण हे तर नदी पात्र खाजगी कस?
 तो:(च्यायला लय शहाण दिसतय...मनात) ओ तुम्हाला जायच असेल तर पावती फ़ाडावी लागेल नाही तर जाता येणार नाही.
एकंदरीत सर्वांचा राग रंग पाहुन गुपचुप पावती फ़ाडली.प्रश्न पैश्यांचा नव्हता पण याला फ़ुकट पैसे का द्यायचे हा होता.असो गरजवंताला अक्कल नसते.

नदी पात्रात अन परीसरात घाणीच साम्राज्य होत.प्रचंड प्रदुषण होत.अश्या पाण्यात आंघोळ करावी लागणार होती.बिलकुल चिडचिड न करता त्यातल्या त्यात बर्‍यापैकी स्वच्छ असणारी जागा शोधुन आंघोळ उरकुन घेतली.त्यानंतर लगेच गोंधळी तयारच होता ठरलेली पुजा, नैवेद्य इ. सोपस्कार उरकुन घेतले.आता वेळ आली दक्षिणा द्यायची.मी आपले रु.१०१ काढुन ठेवले (मला तर ते ही जास्त वाटत होते) पण रु.५०१ च्या कमी घ्यायला काही तयार होइना.त्याच गिर्‍हाइक वाढत होत त्यामुळ त्याला घाइ होती. "अहो भाउ लग्न एकदाच होत. ५०० नी तुम्हाला काय फ़रक पडणार आहे.खंडोबाच्या नावानं द्या की"..अस म्हणत त्यान मोर्चा बायकोकडे वळवला "अवो वहिनी तुम्ही सांगा की ऐकतील तुमच"....च्यामारी लय वांड दिसतय..(मनातल्या मनात)...चल घे बाबा ५०१ तर ५०१...अस म्हणुन ५०० ची नोट त्याच्या हातावर टेकवली...(घे लग्न करायची खुप हौस होती ना..अस उगीच कोणी तरी म्हणल्याचा मला भास झाला)

आता आम्ही कडेपठारच्या दिशेने निघालो.पायथ्याशी पोहचल्यावर कडेपठार पाहुनच खुप दमछाक होणार याचा अंदाज आला होता.आम्ही सर्व जण मस्त मजा करत हळु हळु गड चढायला सुरुवात केली उन्हाळा असल्यामुळे सकाळच्या कोवळ्या उन्हात पण त्याची तीव्रता भासत होती.नवीन लग्नाची जोडी म्हणुन आजु बाजुची जनता आमच्याकडे नवलाइने पाहत होती.मजल दरमजल करत आम्ही अखेर गडावर पोहचलो.गडाचा परीसर,मंद थंडगार वारा याने सगळा थकवा आपोआप गळुन गेला.थोडा वेळ आराम करुन मग आम्ही पुजेसाठी मंदीरात निघालो.मंदीर खुप सुंदर आहे.दीपमाळ, जुनं दगडी बांधकाम तर निव्वळ अप्रतिम आहे.

आम्ही जोडीने आत मध्ये प्रवेश करताच एखाद्या शिकार्‍याला सावज सापडल्यानंतर जसा आनंद होतो तसा काहीसा भाव मला तिथल्या पुजार्‍यांच्या चेहर्‍यावर वाटला.इथे पण आपल्याला कापणार आहेत याची मला नकळत जाणीव झाली.नवपरीणीत जोडप्यांसाठी असणारी पुजा अगदी सराइतपणे त्याने उरकुन घेतली.पुजा काय केली हे मात्र काही समजल नाही.तो काही तरी मंत्र पुटपुटत होता...काय ते त्यालाच त्याच माहित.(मी मंदीराच अंतर्गत बांधकाम न्याहळ्याणतच गुंग होतो अधे मधे तो काही तरी मंत्र बोलायला लावायचा तेवढे फ़क्त म्हणायचो) अखेरीस पुजेचे सोपस्कार पार पडले नेहमीप्रमाणे दक्षिणा देण्याची वेळ आली.मी पैसे देण्याअगोदरच त्याने रु.१००० ची मागणी केली. मी ऐकुनच हादरलो ...याने १००० रुपये देण्याइतपत अशी पुजा केली तरी काय? नेहमीप्रमाणेच मी आपला वाद विवादाला सुरुवात केली.शेवटी कसा बसा तो ५००वर तयार झाला.(च्यायला ४ वर्ष इंजिनिअरिंग करण्या पेक्षा पुजारी झालो असतो तर बर झाल असत.)

आता कडेपठार वरुनच जेजुरी गडावर जायच होत.अंतर खुप होत.जेजुरी गडावर जाइपर्यंत खुप दमछाक होणार होती.त्यात भाची कडेवर होती त्यामुळे हळु हळु चालाव लागत होत.शेवटी एकदाच जेजुरी गडावर पोहचलो.लग्न सराइ असल्यामुळे दर्शनासाठी प्रचंड गर्दी होती.रांगेत उभ राहिलो तर दर्शनासाठी ३ ते ४तास लागणार होते.त्यामुळे दर्शन पासाची काही सोय आहे का हे पाहयला गेलो.अवघ्या प्रत्येकी ५० रुपयात फ़क्त तीन मिनीटात दर्शन अस ट्रस्टच्या वतीने लावलेल्या बुथवर एकजण बोंब ठोकत होता.पटकन दर्शन होइल या अपेक्षेने मी आम्हा सर्वांचे पास काढले अन मंदीरात आत मध्ये गेलो तिथे पाहिल तर   
पास असणार्‍यांसाठी वेगळी अशी रांग नव्हती.दर्शन रांग अन पास असणारे यांची सामाइकच रांग होती.तिथे असणार्‍या पुजार्‍याला या संदर्भात विचारल तर तो म्हणाला पास हा देवस्थान ट्रस्टचा आहे त्याच्याशी आमचा काही एक संबंध नाही तुम्हाला तक्रार करायची असेल तर ट्रस्टच्या कार्यालयात जा.शेवटी तब्बल अर्धा तास वाट पाहिल्यानंतर प्रचंड रेटा रेटीतुन आमचा नंबर आला.नवपरिणीत जोड्यांसाठी तिथे असणार्‍या पुजार्‍याने आम्हा दोघांना बाजुला घेउन कसली तरी पुजा केली, नाव घ्यायला लावली अन १०००रुपये दक्षिणा घेतली.तिथे वाद घालण्याची काही संधीच नव्हती कारण येणार्‍या प्रत्येक नव्या जोडप्याकडुन ते अश्याच रितीने पैसे घेत होते.ती पुजा आटोपुन निघतोय तोच अजुन एका पुजार्‍याने पकडले अभिषेक करावा लागतो म्हणुन त्याने ५००रुपये (इथे पण त्याने अभिषेकाचे रेट सांगितले होते...५०० हा सर्वात कमी रेट.) घेतले.ह्या लोकांची पद्धत अशी काही आहे की ते नवख्या लोकांना बचावाची काही संधीच देत नाही.

आतील दर्शन पुर्ण करुन बाहेर जात होतो तर तिथेच अजुन एक पुजारी भेटला, अहो बाशिंग उतरवल्याशिवाय जाता कुठे इकडे या असा जोरदार आवाज दिला.सुरुवातीला काय बोलतोय काही समजलच नाही.हा नक्की काय म्हणतोय हे पाहण्यासाठी त्याच्या जवळ गेलो.
पुजारी:लग्नात काय बांधल होत? मुंडावळी की बाशिंग
मी: बाशिंग
पुजारी: मग तुम्हाला बाशिंग उतरावयला लागेल.
मी: ते गृहप्रवेश झाल्यावरच उतरवलय
पुजारी: नाही तस नाही उतरवत ते इथच उतराव लागत.
मी: नाही उतरवल तर.
पुजारी: सांगितल ना कुलाचाराप्रमाणे ते इथे उतरावच लागत.

कुलाचार म्हणाल्यावर काय बोलणार??? उतरवल इथ बाशिंग (म्हणजे काही तरी पुजा केली...न समजणारे मंत्र म्हणाला) ....पुन्हा ५०० ला चंदन....मनातल्या मनात खुप चरफ़डत होतो पण करणार काय??? हे सार संपवुन झाल बाहेर आलो ...आता तरी सुटलो अस वाटत होत तोच तळी भरायची बाकी आहे..ती भरुन घेउ या...तीर्थरुपांनी आदेश दिला.त्यामुळे तळी भरायल गेलो.तिथे पण सगळीकडे भेटले तशेच तळी भरणारे तयारच होते. तळी भरली...(यांचे आत्ताच दोनाचे चार हात झालेत लवकरच सहा हात होऊ दे...असा आगाउपणा त्याने केला.)तळी,शिदा देणे अस मिळुन याने पण पाचशे घेतले.

अवघ्या काही मिनीटात मी ३५०० हजाराला कापलो गेलो होतो.खर तर या सगळ्या गोष्टींचा संताप येत होता.देवाच्या नावाखाली ढळढळीत लुट चालु होती पण यांना अडवणार कोणीच नव्हत.हाच आमचा खरा धर्म आहे का??एवढे पैसे घेउन पण गडावर सगळा आनंदी आनंद होता.चहु बाजुला प्रदुषण,सुविधांचा अभाव, भिकार्‍यांचा सुळसुळाट.सगळा भोंगळ कारभार आहे.दुर्दैवाने याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केलेल आहे.


या सगळ्यात मला देव कुठ भेटलाच नाही.मंदीरात गेल्यानंतर मनाला जे समाधान लाभत ते मात्र इथ आल्यावर मी हरवुन बसलो होतो.अस्वस्थ मनानेच जेजुरी सोडल तेव्हा दुरवर डोंगरावर गडापासुन दुर  माणसापुढे हतबल झालेला खंडोबा आपल्या परीवारासह आराम करत असल्याचा भास झाला.

सोन्याने मढवलेला किंवा पैश्यांचा बाजार मांडलेला देव मला खुप दीन दुबळा वाटतो.शिर्डी किंवा तिरुपती यापेक्षा गडावर असलेल्या छोट्याश्या मंदीरात असणारा  देवच मला भावतो.तिथल्या वातावरणातच मला जास्त समाधान लाभत.

प्रेमातला मी!!!

लग्न जमलं अन् त्या नंतर माझ आयुष्यच बदलून गेल आहे. मनमौजी पणे भटकणारा मी टोळभैरव आता जरा जबाबदारीने वागायला लागलो आहे . .( म्हणजे खूप असा नाही पण थोडा थोडा). . .सगळ्यात मोठा बदल म्हणजे माझा दिनक्रम बदलला आहे.

इथून मागे दिवसाची सुरूवात घड्याळाच्या गजराने व्हायची ( बिचारा कोकलून कोकलून जीव द्यायचा अन् त्यानंतर आमची स्वारी जागी व्हायची) आता मात्र दिवसाची सुरूवात मात्र गुड मौर्निंग च्या मेसेजने होते. सकाळी नाश्ता केला का?? केला नाही तर थोडस रागावण असत पण ते ही प्रेमाने. मग दुपारी पुन्हा एखादा मेसेज किंवा फोन. जेवण झाल का?? काय करतोय?? काम खूप आहे का?? अस खूप काही. . .( सार लिहियालाच हव का??? समजून घ्या की) अस थेट रात्री झोपेपर्यंत चालू असत.

तुम्हाला सांगतो सुरुवातीला हे सार जरा जडच गेल. . अहो हे पहिलच प्रेम आहे ना?? इथून मागे आयुष्यात कॅड, रेवीट, सिवील ३डी अशे सगळे सॉफ्टवेअर अन् त्यांचे प्रॉब्लेम होते. त्यामुळे ह्या नवीन बदलामुळे थोड अजीर्ण झाल पण आता ठीक आहे. पुर्वी मी माझ्या धुंदीत जगायचो.वाटेल तेव्हा जेवण, वाटेल तेव्हा भटकणे. मनाला जे वाटेल तेच करायचो.

तुम्हाला सांगतो हाफिसात असताना जर मला फोनवर कोणी काय करतो आहे अस विचारल तर मी त्याला अगदी पुणेरी उत्तर द्यायचो पण आता उत्तर असत " काही नाही तुझ्या फोनची वाट पाहत होतो" , " तुझाच विचार करत होतो ई. उत्तर देतो". :) ( द्यावी लागतात अशी उत्तर. . .आता शिकलो आहे मी पण!!!)

तसा मी शुद्ध शाकाहारी पण माझ्या मोबाईलचा इनबॉक्स मात्र शुद्ध मांसाहारी. त्यामुळे सुरुवातीला आमची मेसेज पाठवायची बोंब होती. पण ह्यावेळी पण नेहमी प्रमाणे आपला गुगल बाबा मदतीला आला. चांगले मेसेज शोधून दिले गुगल बाबाने. आता इनबॉक्स बराचसा शाकाहारी झाला आहे.

ह्या २-३ महिन्याच्या अनुभवातून मी एक गोष्ट अगदी खात्री ने सांगतो. . . बायको ने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणे याहून अवघड काही असूच शकत नाही. जो कोणी अगदी बायकोला आवडेल अशी म्हणजे तिच्या दृष्टीने योग्य अशी उत्तर देईल तो जगातील कोणतीही पझल सोडवू शकतो.

आता आमच्या मधील काही प्रश्नोत्तर सांगतो.

१. सध्या घराच काम चालू आहे त्यामुळे खर्च भरपुर चालू आहे. त्यावरील प्रश्न

ती: आपल्या घराच काम चालू आहे खूप खर्च झाला असेल ना???
मी: हो झाला. . .करावा तर लागणार नाही तर घर कस होईल.

आता तुम्ही मला सांगा इथे मी काय चुकीच उत्तर दिल?? तिच्या नुसार ह्या प्रश्नाच उत्तर म्हणजे किती पैसे खर्च झाला हे मी सांगाव. आता मी गरीब बिचारा हेच लक्षात ठेवल...खर्च खूप झाला असेल ना?? असा प्रश्न आला की सरळ रक्कम सांगुन द्यायची. अन् त्याप्रमाणे काही दिवसा नंतर असा प्रश्न आल्यावर मी प्रामाणिक पणे रक्कम सांगुन टाकली तर म्हणे मी तुला हिशोब थोडी विचारला आहे, तू असा का वागतोस, इ.इ.

आता काय बोलाव कपाळ??

२. ती: (बोटातील एंगेजमेंट रिंग दाखवत) कशी दिसते आहे???
मी: छान आहे.

आता याहून वेगळ काय बोलू शकतो मी?? या नंतर तिच्या दृष्टीने मला कौतुक करता येत नाही. मी व्यवस्थित प्रतिक्रिया देऊ शकत नाही किंवा मला रिअॅक्ट करायला जमत नाही. यापासून धडा घेतला अन् पुढच्या वेळी अगदी चांगल भर भरून कौतुक केल पण ते जरा जास्तच झाल. यावर माझ काय झाल असेल ते आता तुमच्या लक्षात आलच असेल.

३. ती जर म्हणाली ह्या इथे आईस क्रीम छान मिळत हं आपण येऊ या एकदा . . .तर आपण समजून घ्यायच आता आईस क्रीम खायचा मूड आहे. म्हणजे हे फक्त मी उदाहरणादाखल दिल अशे खूप सारे प्रसंग असतात आता तिथ समय सूचकता दाखवून रिअॅक्ट कस व्हायच ते ही अगदी बायकोच्या मनासारख. . .इथेच तुमच खर कौशल्य आहे.

थोडक्यात काय तर सध्या माझा अभिमन्यू झाला आहे!!!

( पण खर सांगु यात पण मजा आहे. . . फक्त ती मजा आपण घ्यायला शिकल पाहिजे.)

विकेट पडली!!!!!

2009 मधील सर्वात अविस्मरणीय घटना म्हणजे माझी विकेट पडली. नाही समजलात अहो जिच्या शोधात जे काही भन्नाट कांदे पोहे पचवले ती अखेरीस सापडली.दिवाळी पाडव्याच्या दिवशीच आमची विकेट पडली अन् ती ही अगदी नाट्यमयरीत्या. तशी ही पोस्ट मी त्या दरम्यानच करणार होतो पण म्हणल एवढी महत्वाची ही घटना वर्षाअखेरीस ब्लॉगवर टाकु या. (महेन्द्र काका कस वाटल ब्लॉग न लिहीण्याच कारण ?? :) )

दिवाळी ला समस्त कामगार वर्ग सुट्टी ला गेल्यामुळे स्लॅबवर पाणी मारण्याच काम माझ्याकडे आल होत. दिवाळी पाडाव्याच्यादिवशी अभ्यंग स्नान झाल्यावर नेहमीप्रमाणे पाणी मारण्यासाठी मी साईटवर पोहचलो, तोच ताई चा फोन आला " तू तिथेच थांब तुला घ्यायला माई (माझी मोठी बहीण)व जीजु येत आहेत अन् त्याच्यासोबत तुला मुलगी पाहायला जायचाय."मी काही प्रतिक्रिया देइपर्यंत पुढील वाक्य अस बाबानी सांगितलय. बस तीर्थरुपांचा आदेश म्हणल्यावर काय बोलणार आम्ही??? बाबा कुठे आहेत विचारल तर ते पुढे गेलेत तुम्हाला ते तिथेच भेटतील. . .आता मात्र जाण्याशिवाय काही पर्याय नव्हता.

स्लॅबवर पाणी मारायला आलो असलो तरी पण योगा योगाने जरा ठीक ड्रेस होता त्यामुळे अवतार जरा बरा होता.थोड्याच वेळात जीजू आले अन् आम्ही निघालो. साइटपासुन साधारण 15 की.मी. वर तीच गाव होत. आम्ही तिथे जाण्यागोदर रस्त्यात बाबा अन् काका ( ज्यानी हे स्थळ सुचवल ते ) हे भेटले, त्यांच्याकडुन समजल की अजुन अर्धा तास थांबाव लागेल कारण तिथे अगोदरच दुसरे पाहुणे पाहण्यासाठी आलेले होते. थोड्या मिस कम्युनिकेशन मुळे हा गोंधळ झाला होता.त्यांना पण खूप चुकीच वाटत होत पण ते तरी करणार काय?? ते पाहुणे गेले की सांगा मग आम्ही येतो अस सांगुन आम्ही आमच्या परीचयाचे एक स्नेही तिथे जवळच राहतात तिकडे गेलो.

बाबा थोडे बाजूला जाताच ,आमचा मराठी बाणा जागा झाला. माई जवळ थोडासा राग म्हणजे निषेध व्यक्त केला (कसा केला असेल ते समजून घ्या). मी जातो, तुम्ही बघून घ्या, माझा मूड गेलाय, मी नकारच देणार ई.ई. . . .अस माझ चालू होत तोच आमचे तीर्थरुप आले फक्त त्यांनी माझ्याकडे पाहील अन् विचारल काय झाल काही अडचण आहे का?? थोडा समजूतदारपणा दाखव. . .बस्स संपल पुन्हा एकदा बोलती बंद, ढान्या वाघाच मांजर झाल होत!!!

तब्बल पाउन तासाने त्यांचा फोन आला मग आम्ही निघालो. तो पर्यंत ब्लॉगवर यावर काय खरडायच याचाच विचार करत होतो.ह्या मुलीला नकार द्यायचा असा दृढ निश्चय करून निघालो. फक्त केलाच नाही तर तो माई अन् जीजू जवळ बोलून पण दाखवला.

शेवटी आम्ही त्यांच्या घरी पोहचलो माझा मूड नसल्यामुळे मी अगदी शांत होतो. सुरुवातीला कश्यामुळे गोंधळ झाला, तसदीबद्दल क्षमस्व,आमची ओळख परेड इ. झाल. त्यानंतर मग मुलीला बोलवल. . .आलोच आहे तर बघू या. . . .अश्या प्रामाणिक हेतूने एक चोरटा कटाक्ष टाकला. . बस्स काय झाल माहीत नाही लेकीन आपून के दिल की घंटी बजी!!!
मनातून अस वाटल यार हीच ती!! जिला आपण शोधतोय ती हीच. . .(आता झाली का गोची!!! :)) आयुष्यात पहिल्यांदा अस फिलींग आल होत.

बाबा अन् जीजू यांनी थोडे प्रश्न विचारले, आता वेळ होती माझी. . .मी काय विचारू?? अगदी भोळा भाव दाखवून मी म्हणालो ( मनातून तर मला फक्त तिच्याशीच बोलायच होत) शेवटी तुम्ही दोघे बोला आम्ही सगळे बाहेर जातो अस सांगुन सर्व जण बाहेर पडले. . मनातून तर लाडू फुटत होते. . चला आता बोलता येईल अस वाटल. . . पण हा आनंद फार काळ नाही टिकला. . कारण तिचा भाउ अन् तिचे काका हे समोरच येऊन बसले अन् त्यानंतर ही आली.

आता काय बोलणार?? तिच्याशी बोलण्याअगोदरच बंधुराज सुरू झाले काय करता, डिग्री कुठे झाली. कॅड मॅनेजर आहे म्हणल्यावर मग आमच्या त्यावरच जास्त गप्पा झाल्या.तिच्याशी फक्त एकदाच बोललो. साधारण 15-20 मिनिटानी आमच्या गप्पा संपल्या अन् ते ही तिच्याशी काही न बोलता.

आम्ही बाहेर पडताना माझा दृढ निश्चय अगदी कोलमडून पडला होता. बाबा, माई, जीजू गालातल्या गालात हसत होते कारण आता त्यांना मी सापडलो होतो.निघाल्यानंतर थोड्यावेळाने तीर्थरुप म्हणाले तर मग काय नकार कळवुन टाकतो. तू तर तेच ठरवल होत ना?? यावर मी शांत झालो खाली मान खालून आपला गप्प बसलो. . .काही बोलाव म्हणून वर पाहील तर सगळेजण हसत होते. . . माझी विकेट पडली होती!!!

साधारण 2 दिवसांनी त्यांचा पण पसंतीचा फोन आला. त्याच वीक मध्ये मला कैरोला निघायच होत त्यामुळे माझी गडबड होती म्हणून तुम्ही बोलणी करून घ्या फक्त फायनल निर्णय होण्यापूर्वी मला मुली ला भेटायचाय, त्यानंतरच आपला निर्णय द्या अस मी बाबांना सांगुन दिल.

मला कैरो ला लगेच जायच होत त्यामुळे भेटायच कस हा प्रश्न होता कारण ती मुंबईत मी पुण्यात . . . भेटणार कस?? सुट्टी मिळणं पण अवघड. ह्या सगळ्यात शेवटी जाताना विमानतळावर भेटू या अस ठरवल.

माझी सकाळी 9.00 ची फ्लाईट होती त्यामुळे पुण्याहून मी रात्रीच निघणार होतो. पहाटे 5.30 ला भेटू या अस नक्की झाल. ठरल्याप्रमाणे मी 5.30 मी टर्मिनल 2 ला पोहचलो. पण अजुन ही लोक काही पोहचली नव्हती. एकटी येते की सारा परीवार घेऊन येते, काय बोलू, काय विचारू,वेळेवर येईल का?? खूप सारे प्रश्न मनात येत होते.

शेवटी 5.45 ला तिचा भाउ अन् ती आले अन् मी सुटकेचा निश्वास सोडला. चला आता तरी किमान मी बोलू शकेन अस वाटत होत. पण बाहेर उभ राहून कस बोलणार ?? म्हणून मी चेक इन करून तर ही दुसर्‍या गेट ने अरायव्हल ला येईल मग तिथे बोलू या अस सांगुन मी अरायवलला गेलो. तिथे जाउन पाहतो तर काय. . .तिथे मध्ये बॅरीकेड होत त्यामुळे. मी टर्मीनल 2 मधून अरायवल ला जाउ शकत नव्हतो. झाल पुन्हा एकदा पोपट!!!

ती पलीकडे अन् मी अलीकडे अश्याच आम्ही गप्पा मारल्या. अन् त्या बॅरीकेडच्या साक्षीणेच मी तिला लग्नासाठी विचारल.
आमच्या दोघांचा पण निर्णय झाला. तेवढ्यात तिचा भाउ सॅण्डविच घेऊन आला ते खाउन आम्ही निरोप घेतला.लगेच बाबांना फोन करून निर्णय देऊन टाकला. अन् त्यांनतर 2 आठवाड्याने आमच लग्न नक्की झाल.

त्या दिवशी निघताना मी संदीप खरेचं " हे भलते अवघड असते. . . . " हे गान मी फील करत होतो. मुंबई विमानतळावरील तो अरायवल सेक्शन आम्ही दोघेपण कधीच विसरू शकणार नाही.

हे कशे योगा योग असतात ना??? पाहा. . . मी नकार द्यायचा अस ठरवून गेलो होतो त्या मुलीलाच होकार दिला.अन् सर्वात महत्वाच सांगायच राहिलं, "मी मुंबईच्या मुलीशी कोणत्याही परीस्थीतीत लग्न करणार नाही अस ठरवल होत पण शेवटी मला मुंबईचीच मुलगी मिळाली." (समस्त मुंबईकर मुलींची माफी मागून. . .होणारी बायकोसुद्धा आली त्यात!!)

चला अजुन 5 महिने तरी बॅचलर लाइफ जगून घेतो.!!!

पोरका...

सध्या कैरोमध्ये पुन्हा मी हॉस्टेल लाइफ अनुभवतोय.सध्या कामाचा ताण तसा कमीच आहे. त्यामुळे फिरणं भरपूर चालू आहे.हॉस्टेलला जसा ग्रूप करून मस्ती करायचो तेच सध्या आम्ही करतोय.आज जी पोस्ट करतोय ती आमच्या मस्तीवर किंवा फिरण्यावर नाही तर थोडी वेगळी आहे.

खुपदा अस होत की एखाद्या माणसाच्या वागण्यावरून आपण त्याचा स्वभाव ठरवून टाकतो.म्हणजे बघा एखाद्याने पैसे खर्च करताना खूप विचार केला तर वाटत यार हा पक्का कंजुस आहे, कधी कोणी जास्त स्पष्ट बोलल तर तो फटकळ. अस खूप सार वर्गीकरण केलेल असत आपण.पण आपण कधी हा विचार करत नाही ह्या व्यक्तीचा स्वभाव असा का झाला असेल?? अशी कोणती परिस्थिती याने अनुभवली असेल की ज्यामुळे याचा स्वभाव असा झाला.माझ तर अस मत आहे की कोणतीही व्यक्ती ही त्याने अनुभवलेल्या परीस्थीतीतून घडत जाते.

आमच्या कंपनीत असाच एक आर्किटेक्ट मित्र आहे की जो कोणतीही गोष्ट करताना अगोदर पैश्याचा विचार करतो. मग तुम्ही ते भाजी खरेदी जा किंवा कोठे फिरायला जायचा प्लान करा.याला विचारायच म्हणजे याचा नेहमीचा प्रश्न किती पैसे लागतील??अन् मग त्यावरून त्याचा निर्णय होनार. कधी कधी हे आम्हाला सगळ्याना खूप त्रासदायक वाटत. त्यामुळे कसलाही प्लान असला की त्याला कोण विचारणार अन् मग त्याला त्यासाठी तयार कोण करणार हा सगळ्यात गहन प्रश्न!! कारण ग्रूप मध्ये एकट्याला सोडून जाणं. पण बुद्धीला पटत नाही. तसा त्याला पगारपाणी पण चागला.राहणीमान पण टापटीप.अस सार असताना हा असा का वागतो याच कोड आम्हाला सगळ्याना असायच.

काल रात्री कार्यालायातच आमचा गप्पाचा फड जमला होता. आमच्या ह्या मित्राचा प्रेम विवाह त्यामुळे आम्ही त्याला त्याची प्रेम कहाणी विचारली.कुठे भेटलास, कोणी प्रपोज केल ई. नेहमीचे साचेबद्ध प्रश्न. हे सांगताना त्याने त्याच्या आयुष्याची कहाणीच आमच्या पुढे ठेवली.अन् ते ऐकून आम्ही सारे स्तब्ध झालो.

माझा हा मित्र अन् त्याचा भाउ हा एवढाच याचा परीवार. याची आई लहानपणीच वारली. अन् हा 12वीला असताना याचे वडील वारले. अश्या या अनाथ भावाडांना त्याच्या दूरच्या मामाने आसरा दिला. दोघांमध्ये हा थोरला असल्याने आता लहान भाउ, स्वतःच शिक्षण, भावाच शिक्षण अशी दुहेरी जबाबदारी याच्यावर आली.

याने पार्ट टाइम जॉब करत बी.आर्क पूर्ण केल तर भावाला कॉम्प्यूटर इंजिनीअर केल. हे सार करताना परीस्थीतीने आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्याची परीक्षा घेतली. ह्या जगात आई बापाच छ्त्र हरवाल्यानंतर जगणं किती कठीण असत हेच त्याने अनुभवल.
त्याच्या महाविद्यालयीन मैत्रीणी बरोबरच याने लग्न केल. हा महाराष्ट्रीयन तर ती उत्तर प्रदेशची.त्यावेळी लग्न करायाच म्हणजे सगळ्यात मोठा प्रश्न होता बोलणी करणार कोण?? हा तर सगळ्यात मोठा अन् भाउ तर तेव्हा शिकत होता.जवळच अस कोणीच नाही.
शेवटी मनाच धाडस करून हा अन् याचा लहान भाउ अशे दोघेच जण लखनौला तिच्या घरी गेले. तोपर्यात तिने सुद्धा घरी या सगळ्याची पूर्व कल्पना दिली होती. नशीबाने , याला पाहिल्यानंतर तिच्या घरून काहीच विरोध झाला नाही. यानंतर लग्नाच्या गोष्टी ठरवण्यासाठी मोठ कोणी तरी असाव म्हणून तो याच्या दूरच्या त्या मामाला घेऊन आला अन् मग याच लग्न झाल.
नुकताच त्याने अन् त्याच्या भावाने मिळून पुण्यात फ्लॅट घेतलाय. 3-4 महिन्यापुर्वीच त्याला मुलगा झालाय.त्याच घर चालत ते फक्त पगारावर.

हे सार ऐकल्यावर मला तरी वाटल की अरे यार जर एवढ्या जबाबदारीच्या ओझ्याखाली माणूस असेल तर तो जे काही वागतो ते माझ्या मते तरी योग्यच आहे. प्रत्येक वेळी जर खर्च करताना तो पैश्याचा विचार करत असेल तर त्यात गैर अस काहीच नाही.कारण शेवटी त्याला शून्यातून विश्व निर्माण करायाच आहे अन् ते ही कोणाच्याही आधाराशिवाय!!!

आज ही जेव्हा जेव्हा मला खूप बोअर होत किवा खूप टेन्शन येत तेव्हा मी माझ्या बाबांशी बोलतो.त्यांच्याशी बोलल की खूप बर वाटत. आई बाबा आहेत ही भावना जे सुख देते, ते सुख तुम्हाला कुठेच मिळू शकत नाही.

मी स्वतः माझ्या आई बाबं शिवाय?? . . .याची कल्पना सुद्धा करवत नाही. आपल्याकडे काही नसल तरी चालेल पण आई वडीलाच छत्र हे आपल्या डोक्यावर असायलाच हव!!!

खरी कमाई!!!

2 दिवसांपुर्वी भानस यांच्या ब्लॉगवर "खरी कमाई" ही पोस्ट वाचली अन् त्यावरून ही पोस्ट लिहतोय.

गेले 2 महिने मी प्रोजेक्टसाठी कैरोला आहे, ताई पुण्यात अं आई बाबा दोघे पण गावी आहेत.
बाबांना गुरुवारी संध्याकाळी अचानक चक्कर आली, त्यामुळे आई ने लगेच घराशेजारील दवाखान्यात नेल. चेक अप केल्यानंतर लक्षात आल की त्यांचा बी.पी लो आहे व हृदयाचे ठोके पण कमी झालेत अन् त्यात त्यांना हृदयविकाराचा त्रास त्यामुळे त्वरीत मोठ्या हॉस्पीटल ला नेणं गरजेच होत. कारण हृदयविकाराचा झटका येण्याची पण शक्यता होती. त्यामुळे प्राथमिक उपचारानंतर ताई त्यांना चेक अप ला पुण्यात घेऊन आली.

शनीवारी पुण्यातील डॉ. हिरेमठ यांच्याकडे चेक अप केल्यावर त्यांनी त्वरीत ऐंजिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला.
यासाठी साधारण 2 .25 लाख खर्च होणार होता अन् थोडी रक्कम अगोदर भरावी लागणार होती. त्या क्षणी ताइने मला फोन करून कळवलं. आता माझ्यापुढे प्रश्न होता तो फक्त पैश्यांचा. शनिवार असल्यामुळे मला ट्रान्सफर पण करता येणार नव्हते.

मी विचारात होतो अन् मनात नकळत स्वांमी समर्थांचा जप करत होतो, तेवढ्यात सच्याचा मेसेज आला. (सच्या माझा एकदम जिवलग मित्रा आम्ही इंजिनिअरिंगचे पासूनचे मित्र.) " तू काळजी करू नकोस मी आहे."त्याच्या फक्त एका मेसेजाने मला खूप रिलीफ मिळाला.
त्यानंतर त्याने अवघ्या तासात 1,60,000 जमा केले. आमच्या सगळ्या ग्रुपने अगदी क्षणाचाही विचार न करता आप आपली खाती रिकामी केली.त्यात रोहिणी म्हणून माझ्या मैत्रीणीची मैत्रीण तिने पण मदत केली,की जिला फक्त 1 ते 2 वेळा भेटलो असेल.

या नंतरच्या भावना व्यक्त करण्यासाठी खर तर माझ्याकडे शब्दच नाहे आहेत. खर सांगायच तर या भावना शब्दात व्यक्तच होऊ शकत नाही.

पण फक्त एवढच नाही तर प्लास्टी होऊन डिस्चार्ज होइपर्यंत सगळेजण आई अन् ताई सोबत थांबले होते. या दरम्यान आई किंवा ताई यांना कधीच मी त्यांच्यासोबत नाही अस वाटल नाही इतका सारा आधार या सर्वांनी दिला.

मी यासाठी माझ्या मित्रांना धन्यवाद म्हणणार नाही किंवा हे उपकार आहेत अस पण म्हणणार नाही. मी म्हणेन ही फक्त मैत्री आहे अन् ही मैत्री आयुष्यभर अशीच असावी.

अन् सगळ्यात महत्वाच म्हणजे डॉ. हिरेमठ, बाबांचे ब्लॉकेज जास्त होते म्हणून ताई ला वाटत होत की आता बहुतेक बायपास करावी लागेल पण त्यांनी ऐंजिओप्लास्टी करा असा सल्ला दिला.
जेव्हा त्यांना समजल की भारताबाहेर आहे अन् ताई व आई शिवाय घरातील दुसर कोणी नाही तेव्हा त्यांनी आपुलकीने पैसे कसे जमा करणार, काही अडचण आहे का?? चौकशी केली.त्या क्षणी त्यांनी डॉक्टर म्हणून दिलेला आधार ताई व आई ला मानसिक बळ देऊन गेला

मला वाटत मी कधीही न पाहिलेले डॉ. हिरेमठ , 1-2 वेळाच भेटलेली रोहिणी किंवा आमच्या ग्रुपची मैत्री हीच खरी कमाई आहे!!!

व्हेज पुलाव आठवणीतला!!!!

माझ खाण्यावर अगदी मनापासून प्रेम आहे.तसा मी शुद्ध शाकाहारी पण हाडाचा खादाडी आहे. व्हेज मध्ये निरनिराळे प्रकार नेहमीच ट्राय करत असतो. त्यामुळे पुण्यात आल्यानंतर पुण्याच मेसच जेवण काही आमच्या पचनी पडायच नाही. शेवटी मी अन् आमचे परममित्र जोगळेकर ( की जो अट्टल मांसाहारी. . .फक्त नावात "कर" आहे) आम्ही रुमवरच जेवण तयार करायाच अस ठरवल. त्यानंतर मात्र मग रोज नाना प्रकार करून खाउ लागलो. नवीन नोकरी असल्यामुळे रोज यायला उशीर. . .त्यानंतर आमचा स्वयंपाक म्हणजे फक्त भाजी, कोशिंबीर करायचो पोळ्या मात्र बाहेरून आणायचो.
एक दिवस व्हेज पुलाव करायचा असा बेत झाला. . .जोगळ्याने फोन करून नेहमीप्रमाणे सारी साधन सामग्री आणायला सांगितली. सुरुवातीला आम्ही कर्वे नगराला रूम राहत होतो त्यामुळे ताज्या भाज्या लगेच मिळून जायच्या. त्या दिवशी जोगळ्या येई पर्यंत सारी तयारी करून ठेवली. तो आल्यावरच पुलाव करू म्हणजे मग गरमा गरम हाणता येईल हा हेतू. . . ( खर कारण म्हणजे एकदा पुलाव झाला असता तर त्याची वाट बघत कोण बसल असत???? त्या अगोदरच सगळा सुपडा साफ झाला असता. . म्हणून वाट पाहायची) . . .त्या दिवशी नेमक त्याला यायला ११.०० वाजले.. . आम्ही तो पर्यंत कच्च्या भाज्यांवर आडवा हात आणला त्यामुळे भूक बर्‍यापैकी कंट्रोल मध्ये होती.
रात्री ११.०० नंतर मग आमचा पुलाव गॅसवर चढला. . . त्यानंतर मात्र मग पोटातील कावळ्यांनी चांगलीच बोंब मारायला सुरूवात केली. . . . कधी पुलाव शिजतोय यावरच सारख लक्ष होत.. . .५ मिनिट सुद्धा युगासारखे वाटत होते. . .तोच आमच्या गॅसने अर्धवट पुलाव झाल्या नंतर जीव सोडला. . . .वेळ रात्रीचे ११.४५-१२.०० ची पुलाव अर्धवट . . .जोराची भूक लागली होती. . .आता करायच काय??? पुलाव शिजवायचा कसा?? मोठा यक्ष प्रश्न. शेजारच्या काकू पण झोपल्या होत्या. . . भुके मुळे डोक पण चालेनास झाल होत. तोच आमच्या दोघांची नजर पेपरच्या रद्दीवर गेली. . .दोघांनाही न सांगताच मार्ग सापड्ला होता. . .गरज होती ती फक्त ३ दगडांची. . . आमची रूम साधीच होती त्यामुळे फरशी खराब झाली तरी साफ करता येऊ शकत होती. . . बाहेरून बाजूच्या पडलेल्या कंपाउंड वॉल चे दगड घेऊन आलो.मस्त पैकी ३ दगडांची चूल केली अन् सरपण म्हणून पेपरची रद्दी होतीच. . . .सारी रद्दी जाळून कसा बसा पुलाव आम्ही शिजवला. . . पण आता नवीनच प्रश्न आला होता. . रद्दीमुळे सगळी कडे प्रचंड धूर झाला होता. . त्यामुळे मागील बाजूची खिडकी उघडली. . त्याच्या वासाने वरच्या मजल्यावर राहणारे मालक जागे झाले. . .आता मात्र आमची वाट लागली होती. . काकांना समजल तर चंबु गबालं आवरून निघाव लागल असत. . शेवटी डोक चालवल सर्व लाइट बंद करून बाहेर निवांत गप्पा मारत बसलो. . .अंदाजाप्रमाने काका खाली आलेच. . त्यांना कस तरी कट्वल. . .नशीब ते लवक्र गेले. . त्यांना वाट्ल की मागील बाजुकडील कोणीतरी कचरा पेट्वतय त्यामुळे ते निघून गेले अन् हे पटवून द्यायला आमच्यासारखे अत्यंत विश्वासू भाडेकरू होतेच. . . . जाताना लाइट बंद करून झोपा हे सांगायला ते विसरले नाही. .आता आम्ही लाइट पण चालू ठेवू शकत नव्हतो. . .लाइट चालू राहिली तर काका परत खाली यायला बसले. . .आता जेवायच कस??? नशीबाने १ मेणबत्ती सापडली. . .मग काय. . .मेणबत्तीच्या प्रकाशात रद्दीवर शिजवलेल्या पुलावावर आडवा हात मारत होतो. . ते झाल्या नंतर जळालेल्या रद्दीची योग्य ती वाट लावली.. . पण खराब झालेली फरशी साफ करताना मात्र वाट लागली होती.
तर अस हे आमच कॅन्ड्ल लाइट डिनर झाल होत!!!! अशी डेट पुन्हा होणे नाही. . . बाकी पुलाव एकदम झॅक झाला होता बगा!!!!