यक्ष प्रश्न ?


यक्ष प्रश्न म्हणजे नक्की काय असत अस मला नेहमी वाटायच.यक्ष प्रश्न कसा असु शकतो याचा प्रत्यय मला माझ्या भाचीने दिला.आता सुट्टी आली तेव्हा सतत नवीन प्रश्न अन त्यांची उत्तर देता देता माझी नाकी नऊ आली होती.एवढ सुचत तरी कस ते देव जाणो.

रोज एक नवीन गोष्ट सांगावी लागायची.गोष्ट सांगताना पण अगदी विचार करुन बोलाव लागायच कारण प्रत्येक गोष्टीतुन इतके “का” निर्माण व्हायचे की बस्स. त्या “का” ची समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत माझा पिट्टा पडलेला असायचा.

या सर्वातुन सुटका व्हावी म्हणून म्हणलं चला हिला आपण मराठी मुळाक्षर शिकवु या.त्यासाठी कार्यालयातुन येताना मराठी मुळाक्षरांच पुस्तक घेउन आलो.आज गोष्ट नको त्याऐवजी आपण मुळाक्षर शिकु या अस म्हणुन तिला मुळाक्षर कस गिरवायच हे सांगितल अन मी आपल उर्ध्वपटामध्ये डोक खुपसल. हुश्श...आज बाकी आपली सुटका झाली अश्या अविर्भावात असतानाच उर्वीने भलामोठ्ठा बॉम्ब टाकला.


उर्वी: मामा, अ च्या डोक्यावरच का रेष द्यायची?

मी:बेटु, असच लिहतात.,तिथ पुस्तकात वर बघ त्यांनी अ च्या फ़क्त डोक्यावरच रेष दिली आहे नं. (च्यायला आजपर्यंत मला हा कधीच प्रश्न पडला नव्हता त्यामुळे याच उत्तर माहिती असण्याचा प्रश्नच नव्हता. याला म्हणता “आगीतुन फ़ुफ़ाट्यात पडणे” )

उर्वी: त्यांनी अस का लिहल ? त्यांना कोणी सांगितल?

मी:पिल्लु,सर्वजण असच लिहतात अन बघ त्याच्या डोक्यावर रेष दिली की अक्षर छान दिसत. असच लिहायच बर आता.

(मी शक्य तितक समजवायचा प्रयत्न करत होतो.पण भाची ने अस काय यॉर्कर टाकला होता की माझी दांडी गुल झाली होती)

आता मी अस बोलल्यावर बिचारी काही न बोलता गुपचुप मुळाक्षर गिरवायला लागली. मला पण हायसे वाटले.चला सुटलो एकदाचा अस म्हणुन मी परत माझ्या कामाला लागलो.

पाच-दहा मिनीटांच्या शांततेनंतर पुन्हा आवाज आला मामाSSSSSSSSSSS…

उर्वी: मामा, हे बघ मी खाली पण रेष दिली आहे अन हेच सुंदर दिसतय.

मी: नाही बेटु पण अस नाही लिहीत फ़क्त अक्षराच्या वरच रेष द्यायची असते.

उर्वी: नाही...मी खाली पण देणार तेच मला आवडलय.

मी: बर ठीक आहे तसच लिहुन काढ.

पांढर निशाण दाखवुन मी माघार घेतलेली असते.पण कुठे तरी मनात याच उत्तर काय असु शकते हाच विचार मनात घोळत असतो.त्या विचारात असतानाच परत पुन्हा एकदा आवाज येतो अन छातीत पुन्हा धस्स होत कारण परत एकदा यॉर्कर आहे हे माहितच आहे त्यामुळे हा आता टोलवता येणार की पुन्हा दांडी गुल हे येणारा प्रश्नच ठरवणार होता.
 
उर्वी: मामा अरे मी A,B,C लिहताना तर नाही देत रेष मग अ, आ,इ  लिहताना का बर द्यायची?

आता मात्र मला उर्वी मध्ये मलिंगा दिसु लागतो.त्याच्याहुन भारी यॉर्कर टाकणार कोणी असेल तर हीच अशी माझी खात्री पटलेली असते.ह्या पण प्रश्नाच उत्तर नसल्यामुळे वेळ मारुन नेण गरजेचं असतं.

मी: मला नाही माहित,मी एक काम करतो उद्या माझ्या टीचरला विचारतो अन तुला सांगतो .ठीक आहे.

यादरम्यानच बोलता बोलता उजव्या हाताने लिहता लिहता नकळतच तिने डाव्या हाताने लिहायला सुरुवात केलेली असते.आता या प्रश्नापासुन सुटका करायची म्हणुन..

मी: उर्वी, डाव्या हाताने लिहु नये उजव्या हाताने लिहीत जा बर.
 
उर्वी: का बर? डाव्या हाताने का लिहायच नाही....लिहील तर काय होईल?

आजपर्यंत नेहमी काही चांगल असेल तर उजवा अन वाईट असेल तर डावा असाच समज...दोघांमध्ये भेद हा चुकीचा आहे हे माहीत असुन ही उजव्याचाच हट्ट का हे मात्र मलाही माहित नाही. 

आता तुम्हाला जर या  प्रश्नांची उत्तर मिळाली तर मला जरुर कळवा.

१.     मराठी मुळाक्षर लिहताना त्याच्या डोक्यावरच रेष द्यायची?
२.     इंग्रजी अक्षरांच्या वर रेष का नाही द्यायची?
३.     आपण नेहमी उजव्यालाच का प्राधान्य देतो?