"स्वप्नपुर्ती" च वर्ष....

 २०१० सरलं...नवीन वर्ष नवे संकल्प....आयुष्याच्या वाटेवर अशीच वर्षे सरत जातात पण त्यातील काही आयुष्यभरासाठी आपल्या मनावर कोरली जातात.कारण त्या वर्षात तुम्हाला जे हव ते मिळालेल असत किंवा नशीबाचं घोड चौखुर उधळल्यामुळे अवघी सुखं तुमच्या पायाशी लोळण घेत असतात.

आयुष्यातले स्ट्रगल्स, स्वप्न साकार करण्यासाठी अनुभवलेले कटु क्षण किंवा असा एक काळ असतो की प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला झगडाव लागत.अन जर तो संघर्ष मोठा असेल तर त्यानंतर मिळाणार्‍या यशाचं सुख हे अवर्णनीय असतं.

असच काहीसं या वर्षात झाल...माझ्यासाठी तर २०१० म्हणजे स्वप्नपुर्तीच वर्ष आहे.या वर्षाने मला खुप अविस्मरणीय अशा आठवणी दिल्या आहेत.

या वर्षात मला माझ्या आयुष्याची जोडीदार मिळाली...करीअर मध्ये बर्‍याच स्ट्रगल नंतर मला हवा असणारा माइल स्टोन गाठता आला..अन याहुन सर्वात मोठ म्हणजे माझ लहानपणापासुन पाहिलेल स्वप्न तब्बल अडीच वर्षांच्या धडपडीनंतर साकार झाल ते म्हणजे माझ्या आइ बाबांसा्ठीच घर.

माझ्या आई अन बाबांनी अवघ्या १० बाय १० च्या खोलीत तब्बल १८ वर्षे संसार केला. तेव्हाच लहानपणी मनाशी निश्चय केला होता आई - बाबांसाठी एक घर भेट देईन. अन त्या घराच नाव असेन स्वप्नपुर्ती

आज आम्ही भावंड जे काही आहोत ते केवळ आई अन बाबांमुळेच ...आयुष्यात त्यांनी आमच्यासाठी खुप सार्‍या तडजोडी स्वीकारल्या त्याही अगदी आनंदाने.लहान असताना त्याच महत्व कधीच कळाल नाही पण जस जस मोठ होत गेलो व्यवहाराची जाण आली तस त्यांच्या सारख्या तडजोडी करण्यासाठी किती धैर्य लागत याची जाणीव झाली.

१५ मे ला म्हणजे माझ्या लग्नाच्या एक दिवस अगोदर जेव्हा आई-बाबांनी गृहप्रवेश केला तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावरील असलेलं समाधान पाहिल अन भरुन पावलो.त्या संपुर्ण दिवस जेव्हा जेव्हा त्यांचे शिक्षक सहकारी घर पाहण्यासाठी यायचे तेव्हा डोळ्यात माझ्यासाठी असलेला अभिमान ,चेहर्‍यावरील समाधान ही माझ्या आज पर्यंतच्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाइ होती.तेव्हा मनात एकच भावना होती आई बाबा ही फ़क्त सुरुवात आहे ....आजपर्यंत आमच्यासाठी तुम्ही जी काही सुख नाकारली ते प्रत्येक सुख मी तुम्हाला देइन.अजुन खुप करायच आहे तुमच्यासाठी...तुम्ही माझ्यासाठी जे कष्ट घेतलेत त्यापुढे माझ हे कर्तृत्व खुप कमी आहे.

घराच स्वप्न साकारायला मी डिसेंबर २००७ मध्ये सुरुवात केली होती. सुरुवातीला अगदी सोप वाटणार काम किती कठीण आहे एका आठवड्यात लगेच समजल कारण माझ्या समोरील प्लॉट वाल्याने अतिक्रमणाची खोटी केस लावली.ते प्रकरण निस्तरायला मला सहा महिने गेले.कधी नव्हे ते कोर्टाची पायरी चढलो.आता तरी काम पटकन होईल अस वाटत असताना बांधकाम कंत्राटदाराने त्रास द्यायला सुरुवात केली. मी फ़क्त शनिवार -रविवार साईट वर जायचो इतर दिवशी गावाकडील मित्र त्यांना शक्य होइल त्याप्रमाणे साइटवर जायचे याचाच त्याने गैरफ़ायदा घेउन त्रास द्यायला सुरुवात केली.चांगुलपणाची सर्व कपडे उतरवुन जेव्हा धतिंगपणा केला तेव्हा कुठे तो नीट काम करायला लागला.

त्यातही काम करताना मी भरपुर वेळा तोडफ़ोड केली.सोमवार ते शुक्रवार तो काम करायचा अन शनिवार-रविवार मी गेल्यावर बर्‍याचदा त्याला तोडायला लावायचो.कारण मी दिलेल डीजाइन दिलेल एक असायच अन त्याने बांधलेल वेगळच असायच. अस तोड फ़ोडीत काम आपल चालु होत.अशे २-३ महिने गेले अन मी वैतागुन नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.दुसर्‍या चांगल्या कंपनीत कमी पगारावर जॉइन केल. अर्थात सहा महिन्यानंतर मला हवी असलेली सॅलरी मिळेल या अटीवर.

जुन्या कंपनीमध्ये जिथे मी अगदी पोटतिडकीने काम करुन कंपनी वाढवली त्यांनीच माझे सर्व पैसे बुडवले.आर्थिक दृष्ट्या तो मला खुप जोरात झटका बसला.आता नवीन जॉब असल्यामुळे कर्ज पण नाही हक्काची कमाइ पण नाही.पुन्हा एकदा सहा महिने काम बंद करण्याची वेळ आली.

नव्या कंपनीत प्रोबेशन पुर्ण केल अन लगेच कर्जासाठी अर्ज केला.नव्या कंपनीने सुध्दा त्यांचा शब्द पाळला नाही.त्या दरम्यान मंदी असल्यामुळे माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता.परत काम चालु करायला मला दोन महिने लागले.कासवाच्या गतीने मी घराच काम सुरु केल.ऎन पावसाळा असल्याने काम तस हळु हळु चालु होत.२००९ च्या दिवाळीपर्यंत  स्लॅब अन सर्व बांधकाम झाल आता फ़िनीशिंग चालु होणार तेव्हाच मला तीन महिन्यासाठी इजिप्तला  जाव लागंणार होत.त्या दरम्यानच माझी विकेट पण पडली.सर्व गोष्टी एका वेळीच सुरुवात झाली होती. पण फ़क्त काही झाल तरी हरायच नाही अन खचायच तर बिलकुल नाही हेच फ़क्त मनात होत.

हे काय कमी होत..पुढ अजुन एक मोठ संकट माझ्या समोर उभ राहिल...मी कैरोला असताना बाबांना अ‍ॅटॅक आला अन त्यांची अ‍ॅन्जिओप्लास्टी करावी लागली.आता मात्र मी खचलो होतो.माझ्यासाठी तो खुप कठीण काळ होता.तेव्हा केवळ मित्रांच्या आधारामुळेच उभा राहु शकलो.यावर ही पोस्ट पण लिहली होती.

या सर्व घटनातच २००९ संपल अन २०१० सुरु झाल अन सार काही बदलल....जानेवारी मध्ये मी परत आलो.....आर्थिक अडचण पण सुटली होती त्यामुळे काहीच अडथळा नव्हता...पुन्हा एकदा नव्या जोमाने काम सुरु केल...अवघ्या तीन महिन्यात मी संपुर्ण घर पुर्ण केल. . . १६ मे ला लग्न झाल. . . .मग माझ्यासाठी माझ जगच बदलुन गेल.

जुलै मध्ये कंपनीवाल्यांना उपरती झाली अन माझ्याबाबतीत झालेली चुक मान्य करीत माझ पॅकेज अनपेक्षीत रितीने अपडेट केल.सार कस सुरळीत झाल. . . .मागच्या वर्षातील दिवस आठवले की खुप समाधान मिळत.
थोडक्यात काय "घर पाहाव बांधुन अन लग्न पाहाव करुन" अशे दोन्ही पण अनुभव मी एकाच वेळी घेतले. :)

तुमचा पण एक दिवस असतो...कधीही सतत दुःख किंवा सतत सुख अस कधीच नसत....दुःख तुम्हाला पचवता आल पाहिजे अन सुख जमिनीवर पाय ठेवुन जगता आल पाहिजे.(ही भाषा खुप गोड वाटते ना...अहो सुख मिळाल की माज करायचा नाही. . आता समजल ना ;) )

आता २०११ च स्वागत करायच पुन्हा एक नव स्वप्न,नवी उमेद , नवी आशा घेउन. . . . अन अर्थात मनमौजी पणे आयुष्याचा प्रत्येक क्षण जगयाच.

पुण्यात गाडी चालवायची आहे का????

प्रसंग क्रमांक १:

स्थळ : कात्रज सर्पोद्यान.

मी आणि मित्र पुण्याच्या बी.आर.टी. वर बौ्द्धिक करत चाललो होतो. सर्पोद्याना समोरील चौकात गतिरोधक आल्यामुळे मित्राने दुचाकीचा वेग कमी केला. अन क्षणात पाठीमागुन येणार्‍या एका महान दुचाकीस्वाराने धडक दिली. काही समजायच्या आत मी रस्त्यावर अन मित्र दुचाकी सोबत घसरत पुढे जाउन पडला.आमची काही चुक नसतानाही आम्हाला न मागता चांगलाच प्रसाद मिळाला होता.

प्रसंग क्रमांक २

स्थळ : के.के. मार्केट चौक

सकाळी नेहमीप्रमाणे हाफ़िसात निघालो होतो..के.के.मार्केटच्या चौकात बिबवेवाडीकडे जाण्यासाठी लाल दिवा पेटल्याने थांबलो.हिरवा दिवा पेटताच उजवीकडे वळुन मी आपला मार्गस्थ झालो. तोच समोर एक काकु सिग्नल तोडुन माझ्यासमोर  आली. धडक वाचवण्यासाठी मी ब्रेक लावले तोच पा्ठीमागुन येणार्‍या चा्रचाकी वाल्याने माझ्या गाडीच हलकसंच चुंबन घेतल.एवढ होऊनही काकु काहीही न घडल्याच्या अविर्भावात साळसुदपणे निघुन गेल्या.

हे मागील काही महिन्यातील मला आलेले अनुभव...तसा गाडी चालवण्याच्या बाबतीत मी म्हणजे कासव आहे.आमचा स्पीड ४०-४५ च्या पुढे कधीच जात नाही.

एकदंरीत आता तुमच्या लक्षातच आल असेल पुण्यात गाडी चालवण म्हणजे सर्वात मोठ दिव्य आहे. एकवेळ तुमच्याकडे गाडी चालवण्याचा परवाना नसला तरी चालेल पण अष्टांगअवधानी असणं अत्यंत गरजेचे आहे.कारण फ़क्त आभाळातुन सोडल तर इतर कोणत्याही दिशेने ्म्हणजे समोरुन, पाठीमागुन, उजवीकडुन, डावीकडुन अन असतील नसतील त्या फ़टीतुन कधी कोण घुसेल हे कोणीच सांगु शकत नाही.

पुण्यातील वाहनचालकांच्या काही सवयी व समज :

१. रस्त्यावरील सिग्नल म्हणजे हे केवळ रस्ता सजावटीसाठी आहे.
२. ३० सेकंदाचा सिग्नल जर पाळला तर महाप्रलय होऊ शकतो त्यामुळे पिवळा/लाल सिग्नल दिसताक्षणी शक्य तितक्या वेगाने मिळेल त्या फ़टीतुन दुचाकी ही पळवलीच पाहिजे.
३.बी.आर.टी. ट्रॅक किंवा सायकल ट्रॅक यामधुन गाडी चालवणे हा त्यांचा जन्मसिध्द हक्क आहे.
४. समोर वाहतुकीची कोंडी झालेली आहे मार्ग निघु शकत नाही अश्या वेळी आजुबाजुच्या जनतेच्या मनोरंजनासाठी आपल्या दुचाकीचा भोंगा जोरात वाजवलाच पाहिजे.
५. झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे गाडी थांबवणे हे अतिशय कमीपणाचे अन अडाणीपणाचे लक्षण आहे त्यामुळे गाडी ही झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे किंवा त्यावरच थांबवली गेली पाहिजे.
६.सिग्नलला थांबल्यानंतर एकाजागी सिग्नल सुटण्याची वाट पाहण्याऎवजी मिळेल त्या कोपर्‍यातुन आपली गाडी काढण्याचा प्रयत्न करायचा.
७.एका कानाला मोबाईल लावुन,मान तिरकी करुन गाडी चालवण्यात खर शौर्य आहे.
८. नो एन्ट्रीचा फ़लक दिसत असला तरी त्यातुन गाडी घातलीच पाहिजे त्यात खर थ्रिल आहे अन वर कोणी एखादा ओरडला तर त्याच्यावरच शिरजोरी करायची.
९.जर चारचाकी असेल तर मध्ये रस्त्यातच उभी करुन चितळेंच्या किंवा तत्सम दुकानात जाउन निवांतपणे खरेदी करायची भले तिकडे कितीही ट्रॅफ़िक जॅम झाला तरी चालेल.
१०.हेल्मेट हे फ़क्त फ़ट्टु किंवा भित्री लोक वापरतात.

पुण्यात गाडी चालवताना यांच्यापासुन सावधान:

१. पी.एम.टी. : गाडी चालवताना पी.एम.टी. जेव्हा कधी पुढे किंवा मागे येते तेव्हा मला नेहमी ती एका अजस्त्र अजगरासारखी वाटते की जो भुकेला आहे अन कधीही तुमची शिकार करु शकतो. शक्यतो गाडी चालवताना पी.एम.टी.च्या जवळपास पण भटकु नका कधी तुमची शिकार होइल हे सांगता येणार नाही. पी.एम.टी. अगदी सन्मानाने जाउन द्यायच अन मग आपण निघायच.

२. पुणेरी काकु (यात मुली सुध्दा आल्या बरं का) : यांना इंडीकेटर, हॉर्न या प्रकारांची अ‍ॅलर्जी असते. त्यामुळे या जर आजुबाजुला असतील तर कधी टर्न करतील हे साक्षात ब्रम्हदेवपण सांगु शकत नाही. यांनी चुकुन कधी इंडीकेटर दिला तरी जरा जपुनच कारण डावीकडचा इंडीकेटर देउन उजवीकडे वळण्याचा पराक्रम फ़क्त पुण्यातच होतो.

३.रिक्षावाले: पुणेकर रिक्षावाले काका हे पुण्यातील रस्तांचे अनिभिषक्त सम्राट म्हणा किंवा वतनदार म्हणल तरी चालेल.स्वतः चुक करतील अन वर तुम्हालाच सुनावतील.हे पण रस्त्यात प्रवाशी घेण्यासाठी किंवा प्रवाशी उतरवण्यासाठी केव्हाही थांबु शकतात. सिग्नल पाळण्याच कोणतही बंधन यांच्यावर नसतं.रस्ता कोणताही असो त्याचे मालक हे हेच असतात.

४.पुणेरी खड्डे: पुणे तिथे काय उणे या उक्तीनुसार पुण्यातील रस्त्यांवर खड्ड्यांची कमतरता नाही. पुण्यात असा एकही रस्ता नाही की ज्यावर खड्डा नाही.पुण्यात एकसारखा सलग रस्ता तुम्हाला सापडुच शकत नाही, सतरा पक्षांची खिचडी करुन ज्याप्रमाणे सरकार उभारणी साठी आघाडी केली जाते त्याप्रमाणेच पुण्यात पण अशेच रस्ते आढळतील. कॉंक्रीट, डांबरी, पेवांग ब्लॉक अश्या सर्व प्रकारचे रस्ते एकाच वेळी तुम्हाला आढळतील.त्यामुळे शक्यतो खड्ड्यांमधुन जो काही थोडा फ़ार रस्ता असतो त्यावरुन गप गुमान आपली गाडी चालवायची.

५.पुणेकर पादचारी: चौकातुन गाडी चालवताना यांच्यापासुन जरा जपुनच राहयच.एखाद्या बगीच्यामध्ये आपण ज्याप्रमाणे फ़ेरफ़टका मारतो अगदी त्याप्रमाणेच रहदारीच्या रस्त्यावर हे मुकतपणॆ बागडत असतात.चुकुनही यांच्या मार्गात येउ नका (ते तुम्हाला आडवे आले तरी) नाही तर अस्सल पुणेरी फ़टके मिळतील.अन अश्यावेळी तुमच्यावर तोंडसुख घ्यायला हौशे,गवशे,नवशे अशे सगळे सामील होतील.

थोडक्यात काय तर पुण्यात गाडी चालवायची असेल तर तुम्हीच तुमच्या जीवनाचे रक्षक हे लक्षात ठेवा नाही तर कधी तुम्हाला मुक्ती मिळेल हे कोणी सांगु शकत नाही.