रोज मी हाफ़िसातुन घरी येतो त्यावेळी आमच्या सोसायटीमधील बच्चे कंपनी खाली जमलेली असतात (अर्थात मम्मी पण सोबत असतेच) अन क्रिकेट खेळणे किंवा घोळका करुन कसल्या तरी गप्प ठोकत बसणे हेच चालु असत.मी जेव्हा त्या मुलांकडे पाहतो तेव्हा खर तर खुप वाईट वाटत....ते त्यांच बालपण हरवुन बसली आहेत याची प्रकर्षाने जाणीव होती.त्यांचे खेळ,त्यांची मस्ती सार काही कोमेजुन गेलय.....त्यांनी अकाली प्रौढत्व आलय अस वाटत....बालपण कस अवखळ,अल्लड,दंगेखोर असल पाहिजे....योग्य त्या वयात योग्य तेच कराव... (आवरा...आवरा...बाबागिरी सुरु झाली...पोस्ट भरकटते आहे)
त्यांच्याकडे पाहुन मला माझ बालपण आठवल...बालपणीच्या अश्याच काही हरवलेल्या खेळांविषयी खरडणार आहे....की ज्यांची उणीव मला नेहमीच भासते....लहानपणी प्रत्येक खेळाचा एक सिझन असायचा ...जसा मौसम बदलायचा त्याप्रमाणे खेळ पण बदलायचा.
असाच एक प्रचंड आवडीचा खेळ : विट्टी दांडु.
विट्टी-दांडु चा मौसम आला की तयारी चालु व्हायची ती म्हणजे तो तयार करण्यापासुन...आम्ही राहत असलेल्या वाड्यासमोरच लाकडाची वखार होती...तिथले औटी बाबा म्हणजे आमच हक्काच माणुस...फ़क्त त्यांना जाउन सांगायच ...आम्हाला विट्टी दांडु करायचा आहे लाकुड द्या...(म्हणजे अगदी तीर्थरुपांचीच वखार आहे असा अविर्भाव असायचा)...अर्थात हे सगळ चकटफ़ु असायचं...(विट्टी दांडुला लाकुड विकत घ्यायच म्हणजे ही त्या काळात अशक्य वाटणारी कल्पना होती)... त्यानंतर बाळु मिस्त्री होताच....त्याला एवढा त्रास देउन पण बिच्चारा आम्हाला असला भन्नाट विट्टी दांडु करुन द्यायचा की बस्स...तेव्हा तो जगातला सगळ्यात भारी माणुस वाटायचा...
वि्ट्टी दांडु मधील कोली अन रिंगण-रिंगण हे दोन प्रकार आम्ही सर्वात जास्त खेळायचो...रिंगण-रिंगण मध्ये जर एखाद्यावर राज्य तंगला की तो कधी कधी दोन दोन दिवस चालायचा....शाळेत विट्टी दांडु घेउन जायच म्हणजे सर्वात मोठ दिव्य असायच ...जर चुकुन सरांच्या नजरेस पडल तर मग काही खैर नसायची वर घरापर्यंत बातमी पोहचायची...त्यामुळे शाळेच्या मैदानाजवळ (आमची शाळा गावाबाहेर असल्यामुळे मैदानाच्या आजुबाजुला सगळ माळरानच होत) असलेल्या झुरीत आम्ही लपवायचो...मग काय दुपारच्या सुट्टीत तेवढ एकच काम.
कोली खेळताना भिडुने कोललेली विट्टी झेलताना खुपदा हाताच्या बोटांना जखम व्हायची...अन हाताची जखम घरी लपवायची म्हणजे अशक्यातली अशक्य गोष्ट...ते लक्षात आल की घरात मग काय आमच्या नावाने सत्यनारायणच व्हायचा. . . . मग यापासुन वाचण्यासाठी आम्ही गांधी टोपीचा वापर करायला लागलो (पांढरा शर्ट, अर्धी खाकी चड्डी अन गांधी टोपी हा आमचा गणवेष होता)....गांधी टोपीचा आजतागायत तरी कोणी असा वापर केला नसेल . :)
असा हा विट्टी दांडु फ़ीवर विट्टी -दांडु पाणी तापवायच्या बंबात गेल्याशिवाय उतरायचा नाही.....म्हणायला तो पर्यंत आमच मनोसक्त खेळुन झालेल असायचं त्यानंतर मौसम असायचा "गोट्यांचा".
विट्टी दांडु हा खेळ आता जवळपास नामशेष झाला आहे...शहरात सोडा गावाकडे पण आता कोणी हा खेळ खेळताना दिसत नाही...हा खेळ सध्या तरी इतिहास जमा झाल्यासारखाच आहे.