काही समज - न झेपलेले!!

आपल्या समाजात जश्या पारंपारिक रूढी आहेत त्याप्रमाणेच काही समज पण आहेत...(खर तर गैरसमज म्हणल तरी चालेल की जे मला कधी झेपलेच नाही.).ज्यांना काहीच आधार नाही. आधार काय तो एवढाच की आपल्या वडील माणसांनी या समजांना मान्यता दिली आहे. (मोठ्यांनी मान्यता दिली म्हणल्यावर आपण काय बोलणार डोंबल??) या समजांविषयी खर तर मला खूप कुतुहुल आहे. हे अशे समज करून देण्यामागे काय कारण असु शकत. कोणाच्या सुपीक डोक्यातून हे सगळ बाहेर पडल आहे ते देव (देव काका नव्हे) जाणो.. आता अशेच काही समज पहा.

१. उचकी: कोणी तरी आठवण काढली की उचकी लागली असा एक समज. आता उचकी अन् आठवण यांचा कसा काय संबंध??? हे मला तरी समजण्या पलीकडे आहे. (अस असल तर काजोल ला सारख्याच उचक्या लागल्या पाहिजे....मला तिची नेहमी आठवण येते.) उचकी वरुन पिंजरा मध्ये लिहलेल गाण तर माहीतच असेल.
जेव्हा छाती व पोट यामधील पडदा आणी बरगड्यांमधील स्नायू यांचे आकुंचन होते,  डायफ्रामच्या आकुंचनामुळे फुफ्फुसातील हवा श्वासनलिकेतुन बाहेर टाकल्या जाते व व्होकल कॉर्ड जवळ-जवळ आल्यामुळे आवाज होतो. हीच उचकी होय. हे जर त्याच शास्त्रीय कारण असेल तर हा समज नक्की कुठुन आला???

२. शिंक: कोणी काही बोलत असेल अन् त्या दरम्यान कोणी शिंकल तर लगेच माणूस नकळत बोलून जातो बघ.."सत्य है.."
आता जर शिंक देण्यावरून जर किंवा खोट ठरणार असेल तर न्यायालयात पुराव्यांची गरज नाही. जबानी देताना जर शिंक आली किंवा नाही आली यावरून सार सिद्ध करायच. फक्त कल्पना करा शिंक या गोष्टीवर जर न्यायालये चालायला लागली तर काय धमाल येऊन जाईल.

३. तीन तिघाड काम बिघाड : अस म्हणतात महत्वाच्या कामाला जाताना तिघांनी जाउ नये नाही तर काम होत नाही. तीन तिघाड काम बिघाड....हे अगदी लहानपणा पासून मनावर बिंबवल आहे. अगदी नाइलाज असेल अन् तिघांना जावा लागत असेल तर खिशात सोबतीला एक लहानसा दगड ठेवायचा म्हणजे मग चार जण असा त्याला तोडगा. पण हा तोडगा करताना त्याला अट आहे ती म्हणजे हा दगड एकाने दोघांना समजणार नाही या पद्धतीने गुपचुप उचलायचा. ( हा समज आमच्या भागात भरपुर आहे बाकी कुठे आहे की नाही याची कल्पना नाही)
आता या मध्ये तीन लोक असल्यावरच काम का होत नाही??? चार किंवा दोन असतील तर का काम होत.यामागच लॉजिक काय माहीत नाही. (बहुतेक ज्यानी समज करून दिला त्याला ३ बायका होत्या बहुतेक.एकवेळी दोघी सांभाळु शकतो पण  तीन कश्या सांभाळणार म्हणून हा समज करून दिला असेल..)

४.डोळा लवणे/ फ़डफ़डणे:पुरुषाचा उजवा डोळा अन स्त्रीचा डावा डोळा लवणे हा आपल्याकडे शुभ किंवा शकुन मानला जातो. डोळा उजवा लवला तर चांगली घटना अन डावा लवला तर वाइट घटना घडणार हे पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी याच्या अगदी विरुद्ध. हे अस का हे पण माहित नाही.

५. तळहाताला खाज सुटणे: हाताच्या तळव्याला खाज सुटणे हे पैसा य़ेणार याची पुर्वसुचना आहे असा समज आहे.
अहो अस जर असेल तर अंबानी बंधुंना तर दिवस रात्र तळहात खाजवत बसायला लागेल.

आता पर्यंत आपण अवयवनिष्ट समज पाहिले आता जरा पक्षी निष्ठ पाहु या...

१.मांजर आडवे जाणे:मला वाटत हा सर्वात प्रसिद्ध असा समज आहे.या विषयी न बोलणे उत्तम.बिचार मांजर बदनाम झाल आहे या कारणा मुळं.

२.कुत्रा इवळणे:अहो बरोबर लिहलय...कुत्रा भुंकतो मान्य आहे....मग हे इवळणे काय??? खुपदा कुत्रा भुंकण्याऐवजी विचित्र आवाज काढतो त्याला इवळणे अस म्हणतात. जर कुत्रा कधी अस ओरडायला लागला तर कोणी तरी ओळखीच म्रुत्यु पावणार आहे असा समज आहे. आता यात किती तथ्य आहे हे ठावुक नाही. कधी कधी तरी केवळ योगा योग म्हणुन असे प्रसंग घडले पण असतील पण यावरुन त्याबद्दलची सत्यता सिद्ध होत नाही.

३.पाल:पाल अंगवार पडली तर तो अपशकुन मानतात. पण हीच पाल जर अक्षय त्रुतीयेला दिसली तर तो शुभ शकुन मानला जातो.काही लोकांच्या म्हणण्यानुसार अक्षय त्रुतीयेला कधीच पाल दिसत नाही. अगदी प्रयत्न करुन पण पाल दिसणार नाहीच अस म्हणतात.

४.टिटवी: टिटवी जर रात्री ओरडायला लागली तर तो अपशकुन मानला जातो.आमच्या आजी ला टिटवी ओरडायला लागली की जाम टेन्शन येत. तिचा या गोष्टीवर खुप विश्वास आहे.याच्या विषयी चर्चा करण्याच माझ कधी धाडस झाल नाही.

या सारखेच समज जो पर्यंत माणसाच्या जीवावर बेतत नाही तो पर्यंत ठीक आहे पण या अश्याच समजातुन जेव्हा नरबळी सारखे प्रकार घडतात तेव्हा मन विषण्ण होत.

हे समज आपल्या पुर्वजांपासुन चालत आले आहेत.हे बनवले गेले म्हणजे या मागे नक्कीच काहीतरी हेतु असणार आहे. हे सार कश्यासाठी.....का????

हा "का" नावाचा भुंगा नेहमीच खुप त्रास देतो....असो याच उत्तर तर काही मिळणार नाही...त्यामुळे जास्त विचार न करता आपल शांत बसाव..(आ....क.......छी.........शिंकलो पहा....सत्य है!!)